नमन एका सुधारक, तपस्वी कर्मयोद्ध्याला

महर्षी धोंडो केशव कर्वे (१८ एप्रिल १८५८ - ९ नोव्हेंबर १९६२) हे एक समाजसुधारक होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांनी १९०७ मध्ये हिंगणे(पुणे) येथे मुलींची शाळा सुरू केली आणि १९१६ मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. तत्पूर्वी ३१ डिसेंबर १८९३ रोजी त्यांनी पुण्यात 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी' स्थापन करून त्याद्वारे विधवा पुनर्विवाहासाठी जागृती मेळावे आयोजित केले. आपल्या पत्नीचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी एका विधवेशी (आनंदीबाई) पुनर्विवाह केला व समाजासमोर एक कृतिशील आदर्श ठेवला.
समविचारी मंडळींसह काम करताना अण्णांनी ‘संस्थेचे चारित्र्य प्रथम’ हे सूत्र ध्यानी ठेवत, संस्थात्मक कामातील मूल्ये, व्यवहारातील पारदर्शकता व विविध घटकांप्रती असलेले उत्तरदायित्व निगुतीने जपले व आजही त्यांची ही कार्यपद्धती जपली जाते हे विशेष. संस्थेच्या हितचिंतकांचा गुणाकार होत रहावा, या विचाराने तत्कालीन आजन्म सेवक स्व. गो. म. चिपळूणकर यांनी १९१९ मध्ये ‘सामाजिक भाऊबीज' ही संकल्पना समाजात रुजविली. कुटुंबातील बहिणीसह संस्थेतील एका मुलीस 'बहीण' म्हणून कुटूंबांनी भाऊबीज द्यावी, ही संकल्पना समाजाने मनोमन स्वीकारली व आज अगदी शंभर वर्षानंतरही ही योजना; तिचे सातत्य व पवित्र्य राखून आहे. विविध वयोगटातील स्वयंसेवक भाऊबीज निधी संकलनात सातत्यपूर्ण हातभार लावीत आहेत. मुख्य म्हणजे नियमितपणे आपली भाऊबीज देणारी असंख्य कुटुंबे या निमित्ताने संस्थेशी जोडली गेली.
संस्था उभारणी करताना, स्त्री सबलीकरणाचे अनेक अभिनव व पथदर्शी उपक्रम अण्णांनी राबविले. महिलांचे विद्यापीठ, नोकरदार महिलांकरिता वसतिगृह, कमवा व शिका या संकल्पनेतून कौशल्य विकसन उपक्रम ही यातील काही ठळक उदाहरणे. आत्मनिर्भरतेपूर्वी आत्मसन्मान जपण्यास शिकविणाऱ्या 'कमवा व शिका' या योजनेने अनेक गरजू मुलींना ससन्मान मदतीचा हात दिला.
मागील बारा दशकात संस्थेमार्फत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व अध्यापक विद्यालय, तसेच श्री सिध्दीविनायक महिला महाविद्यालयाची स्थापना करून उच्च शिक्षणांतर्गत अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन, माहिती/तंत्रज्ञान, व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्य विकास, परिचारिका, प्रशिक्षण, अध्यापिका प्रशिक्षण अशा अनेक अंगाने संस्था विस्तारतच गेली. आज पुणे, सातारा, वाई, नागपूर, रत्नागिरी व कामशेत या ठिकाणी एकूण ७५ शाखा सर्व स्तरांतील महिलांसाठी कार्यरत आहेत. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना सक्षम करण्यासाठी (कौशल्ये विकसन) दहावी-बारावीनंतर करता येतील, असे विविध अभ्यासक्रम ही संस्थेमार्फत चालविले जातात.
एकीकडे मोठ्या प्रमाणावर संस्थेचा कार्यविस्तार होत असताना, संस्थेची मूळ उद्दिष्टे आणि मूल्ये 'जैसे थे' राखण्यात आजपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्याचे मोठेच योगदान राहिले आहे. काळ बदलत असताना, आधुनिक काळातील स्पर्धात्मक व टोकदार आव्हाने समजून घेत नाविन्यपूर्ण प्रकल्प उभे करण्यासाठी अनेक देणगीदारांचा सहयोग सातत्याने मिळत राहणे, हादेखील संस्थेच्या ध्येयनिष्ठ व सातत्यपूर्ण कार्यशैलीची पोचपावतीच म्हणावी लागेल.
आजही पारंपरिक विचारसरणीतून अथवा फसव्या आधुनिकतेच्या आड वाढीस लागलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांमुळे अनेक स्त्रियांचे मूलभूत अधिकार नाकारले जातात. दुर्दैवाने स्त्रीकेंद्रित आव्हाने आज अधिक टोकदार होत असताना या प्रश्नांवर सर्वसमावेशक उत्तरे सापडेपर्यंत महर्षी कर्वे यांचे 'स्त्री सबलीकरणाचे' स्वप्न पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा असून यासाठी अनेक समविचारी लोकांचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे.
महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव म्हणून १९५५ मधे पद्मविभुषण व वयाच्या शंभराव्या वर्षी (१९५८) त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले. दि. ९ नोव्हेंबर १९६२ रोजी एका समर्पित कर्मयोद्ध्याने या जगाचा निरोप घेतला. आज महर्षी कर्वे हयात नाहीत, पण हिंगण्याच्या माळावर उभ्या असलेल्या एका शैक्षणिक तीर्थस्थळावरील त्यांचे समाधीस्थान अगणित मुली व स्त्रियांना एक समृद्ध व आत्मनिर्भर आयुष्य जगण्याची उर्मी व प्रेरणा देत आहे.
अण्णांच्या १६८ व्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
स्मिता कुलकर्णी
9822752056
---लेखिका कर्वे संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत---