•  06 Oct 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

झाडवाल्या ताई - मधुरा खाडिलकर

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 3 days ago
भाष्य  

 उपासना नारीशक्तीची 
 झाडवाल्या ताई - मधुरा खाडिलकर

   आजच्या रंगीबेरंगी फॅशनच्या बेगडी दुनियेमध्ये एखाद्या ताईला ‘झाडवाल्या ताई’ असं जर कोणी ओळखत असेल, तर ती थोडी अचंबित करणारीच गोष्ट आहे, नाही का! होय, पिंपरी चिंचवड भागात पर्यावरणासाठी छोट्या छोट्या उपक्रमांमधून फार मोठी जनजागृती करणाऱ्या सौ. मधुरा मिलिंद खाडिलकर या त्यांच्या भागामध्ये ‘झाडवाल्या ताई’ म्हणूनच ओळखल्या जातात. 
  कोरोनाच्या काळात जिथे माणसांचं आयुष्य क्षणभंगुर झालं होतं, अशावेळी मधुराताईंनी साडेपाचशे झाडांना पाणी घालत एक अख्खी बाग हिरवीगार केली. सकाळी फिरायला जाताना एक एक लिटरच्या पाच बाटल्या सेटमध्ये त्या घेऊन जातात आणि प्रत्येक झाडाला थोडं थोडं करत पाणी घालून जगवायचा प्रयत्न करतात. चांगल्या कामासाठी नेहमीच सज्जनांचा पाठिंबा असतो आणि त्यामुळेच त्यांच्याबरोबर अनेकांनी या उपक्रमाला सुरुवात केली. साडेपाचशे झाडांची एक बागच मधुराताईंनी दत्तक घेतली. वृक्षारोपण करणं सोपं आहे पण त्यानंतर त्या झाडांचे संगोपन करणे यासाठी फार मोठी चिकाटी असावी लागते. 

  डोंबिवली  माहेर असणाऱ्या मधुराताईंच्या घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णवेळ प्रचारकांचं येणं असे. लहानपणापासून या वातावरणाचे संस्कार असल्यामुळे त्यांच्याही मनात ‘राष्ट्रय स्वाहा’ ही ऊर्जा निर्माण झाली.  जायगव्हाण सारख्या खेडेगावात विवाहा नंतर आल्यावर मधुराताईंनी आपल्या शिक्षणाचा उपयोग तिथल्या मुलांना शिकवण्यासाठी केला. ‘नापास मुलांना पास करणारा क्लास’ म्हणून मधुराताईंचा क्लास पालकांमध्ये लोकप्रिय होता. पण शालेय मुलं फक्त शिकवणीपूर्ती यायची नाहीत; त्यांच्या घरांमधल्या अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन रोज आठ दहा मुलं रात्री झोपायलाच मधुराताईंच्या घरी असायची. पुढे पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी एम आर म्हणून नोकरी केली. संसारिक व्याप तर प्रत्येकालाच असतात, पण त्यातून थोडी जरी मोकळीक मिळाली तरी मी माझा वेळ, माझी ताकद आणि माझी बुद्धी समाजासाठी वापरली पाहिजे ही जाणीव असणारी फार थोडी माणसं असतात. मधुराताईंनी ही जाणीव मनोमन जोपासली आणि विविध पातळ्यांवर वैयक्तिकपणे काम करायला सुरुवात केली. 
  पर्यावरणासाठी भस्मासुर ठरत असलेल्या प्लास्टिकचं संकलन आणि नागरी कचऱ्याचे व्यवस्थापन या दोन समस्यांवर त्यांनी मुळापासून काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी घरोघरी जाऊन प्लास्टिकबद्दलचं प्रबोधन त्या करत असतात. त्यांच्या प्रेरणेने जवळजवळ २५० घरांमधलं प्लास्टिक संकलित केलं जातं. अगदी स्वतःच्या घरचं दळण आणताना गिरणीत मुद्दाम थांबून मधुराताई तिथे येणाऱ्या महिलांना प्लास्टिकचे दुरुपयोग सांगून स्वतःकडची एखादी कापडी पिशवी आवर्जून देतात. तीच गोष्ट भाजी आणायला जातात तेव्हाही त्या करतात. आजच्या इन्स्टंट जीवन पद्धतीमध्ये कापडी पिशवी घेऊन बाजारातून भाजी आणण्याचं प्रमाणच कमी झालेलं आहे. अशावेळी घाईघाईने प्लास्टिकची पिशवी वापरणाऱ्या महिलांना एकदा स्वतःकडची कापडी पिशवी दिली, की मधुराताई म्हणतात, ‘पुढच्या वेळेला त्या महिला आठवणीने स्वतःची कापडी पिशवी घेऊन येतात असं माझं निरीक्षण आहे.’ 

  ‘हरितघर’ नावाचा एक प्रकल्प सध्या मधुराताईंनी हाती घेतलेला आहे. यासाठी त्या स्वतःच्या घरातल्या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतात. सहज म्हणून आसपासच्या घरांमध्ये जाताना ते खत कापडी पिशवीतून मुद्दाम घेऊन जातात आणि घरच्या स्त्रियांना या सगळ्याबद्दल समजावून सांगतात. आदर्श जीवनपद्धतीसाठी नैसर्गिक स्त्रोतांचं संवर्धन करणं किती आवश्यक आहे याची जाणीव करून देतात. आपल्या दैनंदिन वापरात एसीच्या पाईपमधून, आर्.ओ.च्या पाईपमधून अनावश्यक वाया जाणार्यात पाण्याचा पुनर्वापर करून घरापुरती फुलं, भाजीपाला पिकवणं, घरच्या बागेपुरतं खत तयार करणं अशा गोष्टी त्या मनावर बिंबवतात. 
  पीक कापणीनंतर शेतात राहिलेला कचरा, पाचट, पालापाचोळा या सगळ्यापासून भुसा तयार करणं आणि तो भुसा प्रेस करून त्यापासून काष्ठ म्हणजेच लाकूड तयार करणं ही निसर्ग संवर्धनामधली एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. कारण अंत्यसंस्कार करण्यासाठी येणारा खर्च आणि पंधरा ते वीस वर्षांच्या दोन झाडांची लाकडं ही होणारी पर्यावरणाची हानी आता आपल्याला खरोखरच परवडणारी नाही. मोठमोठ्या शहरांमध्ये विद्युत दाहिनी असली तरीही खेडेगावांमध्ये अजूनही पारंपारिक पद्धतीनेच अंत्यसंस्कार केले जातात. भुशापासून केलेली लाकडं आणि त्या मोक्षकाष्ठांपासून अग्निसंस्कार हा विचार मधुराताई खेडोपाड्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या मनात रुजवत आहेत. 
  नागपूर सारख्या शहरांमध्ये तीनशे घाटांवरती मोक्षकाष्ठ वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी मधुराताईंसारख्या अनेकांच्या प्रयत्नांमधून मिळालेली आहे. ‘निसर्गाने निसर्गाला दिलं’ हा मधुराताईंच्या आयुष्याचा मंत्र आहे आणि त्याच वाटेवरून चालण्याचा त्या निष्ठेने प्रयत्न करत आहेत. ब्लिंकिट सारख्या ॲपवरून सामान मागवताना येणाऱ्या कागदी पिशव्या एकत्र करून नेहेमीच्या भाजीवाल्याकडे देणं, ही गोष्ट दिसताना छोटी वाटत असली, तरी ती किती प्रत्ययकारी आहे याचा विचार आपण निश्चित करू शकतो. मधुराताईंच्या एकूणच व्यक्तिमत्वामधली नि:स्वार्थ भावना पुढच्या पिढीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव करून देणारी आहे. त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचे पती मिलिंद खाडिलकर हेही तेवढ्याच निष्ठेने सहभागी असतात, हे मधुराताई आवर्जून सांगतात. 
  सृष्टीच्या चैतन्याचा उत्सव म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावलं टाकणार्यार मधुराताई खाडिलकर या खरोखरच हरितदुर्गेचं एक चैतन्यरूप आहेत. त्यांच्या  वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा! 

 लेखक - आसावरी देशपांडे जोशी 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • भारतीय संस्कृती
  • पर्यावरण
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (118), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (7), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (3), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.