‘वंचित घटकांच्या विकासाशिवाय देश विश्वगुरू होणे अशक्य’ - सरसंघचालक
पारधी-आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी विशेष प्रयत्नांची गरज; खामगाव येथील क्रीडा संकुलांचे उद्घाटन

व्हीएसके वृत्तसेवा
खामगाव (जि. बुलढाणा) : "देशभरात ज्यांना आज भटके-विमुक्त म्हणून ओळखले जाते, तो समाज एकेकाळी ज्ञानाचा प्रसार करणारा समृद्ध समाज होता. समाजाला निःस्वार्थपणे ज्ञान देण्यासाठी हा समाज देशभर भ्रमंती करत राहिला. मात्र, ब्रिटिशांच्या राजवटीत स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण पारधी-आदिवासी समाजावर 'गुन्हेगार जमात' असा कलंक लावला गेला. या ऐतिहासिक अन्यायामुळे हा समाज मुख्य प्रवाहापासून तुटला व मागास राहिला. आज भारताला खऱ्या अर्थाने 'विश्वगुरू' बनवायचे असेल, तर अशा सर्व उपेक्षित व वंचित घटकांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणणे हे राष्ट्र उभारणीचे अत्यंत आवश्यक कर्तव्य आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी येथे केले.
खामगाव येथील श्री सद्गुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट संचलित पारधी-आदिवासी आश्रमशाळेत पुण्यातील ‘अमनोरा येस फाउंडेशन’च्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या तीन अत्याधुनिक क्रीडा संकुलांसह विविध अद्ययावत सुविधांचा लोकार्पण सोहळा डॉ. भागवत यांच्या हस्ते पार पडला. या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, श्री सद्गुरू ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. आयुषी देशमुख आणि सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
- ‘पारतंत्र्यातही संघर्ष सोडला नाही’
आपल्या भाषणात भारतीय समाजाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक प्रवासाचा वेध घेताना डॉ. भागवत म्हणाले, "प्राचीन काळात भारतीय समाज पूर्णपणे संघटित आणि समृद्ध होता. मात्र, लागोपाठ झालेल्या परकीय आक्रमणांमुळे समाजात विघटन घडून आले आणि त्यातूनच उपेक्षित घटकांची निर्मिती झाली. असे असूनही, या वंचित घटकांनी कधीही पारतंत्र्य किंवा गुलामी मानली नाही; त्यांनी स्वातंत्र्यासाठी सातत्याने संघर्ष केला. दुर्दैवाने इंग्रजांच्या कुटील नीतीमुळे त्यांना गुन्हेगार ठरवले गेले. पारधी आणि भटक्या समाजाच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी संघ गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे. भय्यूजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या आश्रमशाळेचा अमनोरा फाउंडेशनने केलेला कायाकल्प आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण केलेल्या सुविधा अत्यंत कौतुकास्पद आहेत."

- विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
सोहळ्यापूर्वी सरसंघचालकांनी आश्रमशाळेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली आधुनिक क्रीडांगणे, सुसज्ज भोजनशाळा, विद्यार्थ्यांनी स्वतः कष्टाने विकसित केलेली परसबाग आणि वसतिगृहाच्या व्यवस्थेचा समावेश होता. या वेळी त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडाविषयक प्रगतीचा आढावा घेतला.
- ‘स्वावलंबनाची उत्तुंग भरारी’
प्रास्ताविक करताना सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, "डॉ. मोहन भागवत यांच्या सूचनेनुसार अमनोरा येस फाउंडेशनने या आश्रमशाळेच्या विकासाचे व्रत हाती घेतले. आज पारधी-आदिवासी समाजातील मुले क्रीडा, शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर स्वावलंबनाची नवी शिखरे सर करत आहेत. वंचित घटकांच्या निरंतर विकासासाठी फाउंडेशन आगामी काळातही असेच उपक्रम राबवत राहील."
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी, राज्य सरकार पारधी आणि आदिवासी घटकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगून संस्थांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. तर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी, ही आश्रमशाळा केवळ खामगावचीच नव्हे तर संपूर्ण विदर्भाची मानचिन्ह बनली असून येथे वंचित मुलांचे आयुष्य घडवले जात असल्याचे नमूद केले.

- विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती व माजी विद्यार्थ्यांचा गौरव
या सोहळ्यात सरसंघचालकांच्या हस्ते आश्रमशाळेतील १६ पारधी-आदिवासी बालिकांना शैक्षणिक प्रोत्साहनासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले, तर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.