|| सामाजिक समरसतेच्या अग्रणी :लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी ||
संस्कारसंपन्न बालपण :- . दीनदुबळ्यांबद्दलचा कळवळा, सेवाभाव ,गोरगरिबांचे दुःख जाणून घेत त्यांना मदत करणे आणि लिंगभेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाचा सन्मान करणारी वृत्ती आणि ईश्वराबद्दलची निष्ठा या सामाजिक समरसता भावाची बीजे अहिल्यादेवींच्या आई - बाबांनी ('चौंडी' गावचे पाटील शिवभक्त 'माणकोजी' आणि सुशीलाबाई ) केलेल्या संस्कारामध्ये रुजलेली दिसतात. तीनशे वर्षांपूर्वी स्त्रियांचीअसणारी दु: स्थिती लक्षात घेता आपली मुलगी - 'अहिल्या ' म्हणजे ग्रामदैवत श्रीसिनेश्वराच्या कृपेने लाभलेले कन्यारत्न - ( वैशाख कृष्ण सप्तमी, सोमवार दि. ३१ मे १७२५ ) आहे असे मानणारे आई - बाबा आणि या गुणांना प्रोत्साहन देणारे सासू-सासरे लाभल्यामुळे मूळच्याच प्रज्ञावंत , शूर असणाऱ्या अहिल्यादेवींना स्त्रीशक्तीची सार्थ जाणीव झाली असावी. शिवभक्ति आणि अहिल्यादेवी यांचे नाते लहानपणापासूनच अतूट होते . रामायण, महाभारत आणि पुराणकथांमध्ये तसेच छत्रपती शिवरायांच्या व शूरवीरांच्या कथांमध्ये रमणाऱ्या अहिल्यादेवींचे जीवनध्येय "जे आपण घडवले त्याचे रक्षण प्रसंगी जीवाचे मोल देऊनही करावे " हे होते, असे त्यांच्या चरित्रकथांच्या आधारे म्हणता येते. या तेजस्वी वृत्तीमुळेच वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी अहिल्याबाई सौभाग्यवती अहिल्यादेवी खंडेराव होळकर बनल्या.(इ.स. १७३३ ) .
सासू-सासर्यांची छत्रछाया :- लग्नानंतर अहिल्यादेवींच्या कुशाग्र बुद्धिमत्तेला, शौर्याला , सात्त्विकतेला राजकारणधुरंधर , पराक्रमी मल्हारबाबांची आणि दूरदृष्टी असलेल्या कर्तृत्ववान गौतमाबाईंची छत्रछाया मिळाली. अहिल्याबाईंच्या शिक्षणासाठी खास गुरु नेमले गेले. त्यांना मराठी - मोडी बरोबरच संस्कृत -हिंदी ह्यांच्या जोडीलाच गणित, भूगोलाचेही शिक्षण देण्यात येऊ लागले. .रामायण, महाभारत ,भगवद्गीतेचे पठण ; धर्मशास्त्र, न्यायदान यांचा अभ्यास जोडीलाच घोडेस्वारी , नेमबाजी आणि विशेषतः भाला- फेकीत अहिल्याबाईंनी प्राविण्य मिळविले. प्रशासन ,अर्थव्यवहार याच्याबरोबर आपल्या घराण्याचे कुळाचार, व्रतवैकल्य ही अहिल्यादेवींनी समजून घेतली. चहूदिशेस घोडेस्वारी करत राज्याची माहिती करून घेणे, सदरेवर जाऊन फडणिशीची हिशेब तपासणी, वसूल जमा बघणे, सरदारांना पत्रे पाठवणे ,न्यायनिवाडे करणे खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवणे गोळा - बारूद ,बाणभाते, ढाली - तलवारी सज्ज ठेवणे ही आणि अशी अनेक कामे 20- 22 वर्षांच्या अहिल्यादेवी कुशल प्रशासकाप्रमाणे पार पाडत होत्या. म्हणूनच," मार्तंडानेच हे रत्न आम्हाला दिले. किंवा "आमचा पुत्र अहिल्याबाईने इतका उत्कृष्ट राज्यकारभार चालविला आहे." असे कौतुकोद्गार मल्हारबाबा - गौतमाबाई काढत. मराठेशाहीला आधार आणि शत्रूला धाक असणाऱ्या '*सुभेदारां*च्या या सूनबाईंमध्ये कमालीचा साधेपणा, विनम्र वृत्ती आणि मानवतेबद्दलचा कळवळा होता . म्हणूनच डोक्यावरून पदर हातामध्ये शिवपिंड आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास आणि सात्विक भाव ही अहिल्यादेवींची मूर्ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये स्थानापन्न झालेली आहे. खंडेरावांच्या वीर मरणानंतर अहिल्यादेवींनी राजवस्त्रांबरोबरच साऱ्या अलंकारांचा, रंगांचा, उपभोगांचा त्याग केला. आजन्म पांढरीशुभ्र वस्त्रे वापरली.. एवढेच नव्हे तर न्यायदानासाठी त्या पांढऱ्या शुभ्र गादीवर त्याच रंगाच्या घोंगडीचे आसन करून बसत. " तुझा जन्म या प्रजेसाठी आहे. तू या प्रजेची माता हो. या रयतेचे, गोरगरिबांचे प्रपंच सुखाचे कर."ही पितृतुल्य सासऱ्यांची आज्ञा अहिल्यादेवींनी आजन्म पाळली.
दानधर्मामातील व्यापक दृष्टी:- अतुलनीय दानधर्मासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अहिल्यादेवींनी दानधर्म करताना कधीच सरकारी खजिन्याला हात लावला नाही. तर स्त्रीधन म्हणून आणि मल्हारबाबांची वारसदार म्हणून मिळालेल्या सोळा कोटींच्या खासगी खजिन्याचे पूजन करून त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून इदं न मम म्हणत तो खजिना धार्मिक कार्यासाठी खर्च केला. अहिल्याबाई नेहमी म्हणत, 'स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. त्याग आणि जनसेवा हा ईश्वरभक्तीचाच एक मार्ग आहे. मात्र त्यांच्या दानधर्मामागे केवळ वैयक्तिक मोक्ष किंवा पुण्याची कल्पना नसून जातिभेदांनी पोखरलेल्या आणि पानिपतच्या आघातामुळे आत्मसामर्थ्य विसरलेल्या हिंदू समाजाला त्याच्या स्वत्वाची, स्वत्त्वाची आणि संस्कृतीची जाणीव करून देऊन हिंदुत्वाला समर्थ बनविणारी व्यापक दृष्टी आहे हे अधोरेखित करायलाच हवे. त्यासाठी अहिल्यादेवींनी जाणीवपूर्वक तीर्थक्षेत्रांच्या निमित्ताने देशातील विविध भागांत राहणाऱ्या लोकांना धार्मिक रीतीरिवाजांचे (उदा. गंगेची कावड रामेश्वराला घेऊन जाणे ) स्मरण करून दिले. त्यांना हिंदुत्वाच्या सांस्कृतिक धाग्यात गुंफत आणि त्यांच्यामध्ये या देशाबद्दल , स्वधर्माबद्दल आपलेपणा निर्माण केला. धर्मस्मरण आणि धर्म रक्षण करण्यासाठी मदत करणाऱ्यांना कायमचे उत्पन्नही लावून दिले. दिवाबत्ती, पूजाअर्चा ,नैवेद्य डागडुजी यासाठी पुजाऱ्यांना वंशपरंपरेने शेत जमिनी दिल्या. अहिल्याबाईंच्या या कार्यामुळेच उत्तरेतील केदार, काशी- विश्वनाथापासून दक्षिणेतील रामेश्वरापर्यंत तसेच महाराष्ट्रातील जेजुरीपासून पश्चिमेकडील द्वारकेपर्यंत आणि पूर्वेकडील जगन्नाथपुरीपर्यतचा प्रदेश विविध भाषा, जाती-जमातीं, चालीरीती यांच्यावर मात करून *हिंदू समाज* या एका सांस्कृतिक बंधनाने एकत्र येण्यास कळत-नकळत मदत झाली. पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याला पाणी पाणी करत मृत्यूला सामोरे जावे लागले, हे लक्षात ठेवून अहिल्यादेवींनी केवळ स्वतःच्या राज्यामध्ये नव्हे तर जागोजागी विहिरी खोदविल्या. दंगा, आणीबाणीच्या वेळी गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि यात्रेकरूंच्या मुक्कामासाठी आश्रयस्थाने असावीत म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात सुसज्ज धर्मशाळा आणि त्यांना जोडून अन्नछत्रे बांधली. तेथे सर्व जातिच्या लोकांना मुक्त प्रवेश होता. वाटसरूंना, गावकऱ्यांना थेट पाण्यापर्यंत जाऊन पाणी घेता यावे यासाठी मैला दीड मैलांच्या अंतरावर साऱ्या देशभर पायविहिरी निर्माण करण्यात आल्या. आजही या पायविहिरी 'अहिल्याबाईंची बारव' म्हणून, ओळखल्या जातात. लोकांचा आत्मसन्मान पुन्हा जागृत करण्यासाठी आणि मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी अहिल्यादेवींनी अनेक देवळे बांधली.जुन्या देवस्थानांचा जीर्णोद्धार केला.परकीयांनी पाडलेल्या देवळांच्या जागी पुन्हा मंदिरे उभारली. इस्लामी सत्ता असलेल्या भागातील उदाहरणार्थ काशीविश्वेश्वर, सोमनाथ सारख्या भारतीयांची शेकडो वर्षांची श्रद्धास्थाने असणाऱ्या देवस्थानांचा जीर्णोद्धार केला.
धार्मिकतेला मानवतेची जोड :- अहिल्याबाईच्या धार्मिकतेला मानवतेची दृष्टी असल्यामुळे पायी चालणाऱ्या ओझेकऱ्यांना घडीभर ओझे उतरवून विश्रांती घेता यावी यासाठी उभे ओटे (तकिये) बांधले. आर्थिक स्थिरतेशिवाय समरसता दृढ होणार नाही म्हणून कामगार, कारागिरांना सदैव काम मिळावे, यासाठी त्या दक्ष असत. म्हणूनच 'चालू द्या होळकरांची टाकी' ही म्हण प्रचलित झाली. दळणवळणाच्या सोयीसाठी व आणिबाणीच्या वेळी उपयुक्त ठरावा अशा नवीन मार्गांची बांधणी केली. ( उदा. कलकत्ता ते काशी बांधलेला रस्ता ) माणसाच्या जाती-धर्मापेक्षा त्याच्यातील गुणवत्तेला, निष्ठेला,पराक्रमाला अहिल्यादेवींनी वैयक्तिक जीवनातही महत्त्वाचे स्थान दिले. दरोडेखोर- भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्या शूर तरुणाला - मग त्याची जात कोणतीही असो- आपली कन्या देण्याचा निर्णय अहिल्यादेवींनी जाहीर केला आणि तो अंमलातही आणला. चोरी करणे, धाडी टाकणे, लोकांना ठार मारणे हाच आपला धर्म असे मानणाऱ्या भिल्लांचे मन: परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या चरितार्थासाठी शेतजमिनी, अवजारे दिली. वाटसरूंच्या रक्षणाच्या मोबदल्यात भिल्लांना 'भिलकवडी' हा कर वसूल करण्याची मुभा दिली. मात्र त्याचवेळी कुणा यात्रेकरू/वाटसरूची लूटमार झाल्यास त्याची जबाबदारीही भिल्लांवरच सोपवण्यात आली. अहिल्या देवीनी दाखवलेल्या या विश्वासामुळे ,योजनांमुळे दरोडेखोरांमधील 'माणूस' सुधारला. व्यापाऱ्यांना सुरक्षा मिळून व्यापारच्या व्यापाराची पर्यायाने खजिन्याचीही भरभराट झाली. स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना :- समरसतेतला महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रिया . तीनशे वर्षांपूर्वीच स्त्रिया सक्षम व्हाव्यात आणि त्यातून सक्षम कुटुंबव्यवस्था उभी राहावी व त्याद्वारा सामाजिक समरसतेचा परिप्रेक्ष्य व्यापक व्हावा यासाठी अहिल्यादेवींनी सुरू केलेल्या मुलींच्या पाठशाळा, शस्त्रशिक्षण देणाऱ्या सैनिकी शाळा,. खेड्यापर्यंत न्याय मिळावा याची केलेली व्यवस्था, कुटिरोद्योगास दिलेले प्रोत्साहन, हुंडाबंदी, दारूबंदी , जंगलतोडीस विरोध करत स्त्रियांना दिलेली मानसिक सुरक्षा हे सारे आश्चर्यचकित करणाऱ्या आहे. साहजिकच राजमाता अहिल्यादेवी होळकरांना रयतेने ' मातुःश्री ', आईसाहेब या संबोधनाने सन्मानित केले. थोडक्यात,नियतीच्या क्रूर तडाख्याने खचून न जाता अहिल्यादेवींनी अवघ्या रयतेलाच आपला परिवार बनविले. ' रयतेची सेवा हाच राज्यकर्त्यांचा ठेवा,' हे जीवनसूत्र - ठरविले. एवढेच नव्हे तर जन्मगत जातींचा वापर करीत अधिकाऱ्यांनी प्रजेचा अपमान करू नये यासाठी त्या दक्ष होत्या. प्रजेसाठी आपण आहोत. आपण रयतेचे सेवक आहोत असे त्या पुनःपुन्हा सांगत. प्रजेशी अनुचित व्यवहार आणि असत्य भाषण ही त्यांच्या संतापाची कारणे होती. होळकर रेकॉर्डमध्ये असे काही प्रसंग नोंदविलेले आहेत. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे असे अतुलनीय कार्य करूनही आपला नामोल्लेख होणार नाही याची त्या काळजी घेत. पूर्णत्वास गेलेल्या प्रत्येक वास्तूवर, कामावर 'श्री शंकर आज्ञेवरून' अशी मोहोर उमटविण्यात येत असे. सर्व तऱ्हेच्या प्रतिकूलतेत माणसातील माणूसपण वाढत राहावे, त्याने सदाचारसंपन्न असावे. त्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. खासगी पैशातून उभारलेली हिंदुत्व वर्धिष्णु करणारी कामे अखंड चालू राहावित यासाठी त्यांनी द्रष्टेपणाने अर्थव्यवस्थाविषयक योजना केल्या. म्हणूनच आज तीनशे वर्षे उलटली तरी त्या संबंधित व्यवस्था अजूनही चालू आहेत. 'समरसता हाच धर्म' मानणाऱ्या निगर्वी, प्रजाहितदक्ष , प्रजेवर प्रेम करीत असतानाच राज्यकर्ता म्हणून योग्य तो अंमल बजावणाऱ्या अहिल्यादेवी या स्त्रीशक्तीचा मानदंड आहेत. गंगेचे पावित्र्य आणि सुवर्णाचा अस्सलपणा ज्यांच्या व्यक्तित्वाचा मुलाला आहे त्या अहिल्यादेवी म्हणजे सामाजिक समरसतेचे अत्युच्च शिखर *कांचन - गंगा* आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा.
(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख आहेत.)
साभार – एकता