विविधतेचा आदर हेच भारताचे मूळ ध्येय: डॉ. मोहन भागवत
न्यू यॉर्क, ३० ऑगस्ट २०२६ :

"अमेरिकेची चर्चा होते तेव्हा 'बहुलतावाद' (Pluralism) हा शब्द येतो, तर भारताचा उल्लेख येतो तेव्हा 'विविधतेत एकता' हा वाक्यप्रयोग केला जातो. परंतु, भारतासाठी एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी त्याच्या जनुकांमध्येच (DNA) रुजलेल्या आहेत. देश म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हेत, तर जगाच्या कल्याणासाठी एका ध्येयाने काम करणे म्हणजे राष्ट्र होय," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
अमेरिकेतील 'AHEAD फोरम'तर्फे न्यू यॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' (वैश्विक एकता सोहळा) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते.
सरसंघचालक म्हणाले, "जगात दोन प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात. पहिली- 'जगा आणि जगू द्या' आणि दुसरी- 'फक्त आमचे ऐकणाऱ्यांनाच जगू द्या'. जे फक्त आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांचे रक्षण करतात, ती 'राक्षसी वृत्ती' आहे. याउलट 'आपण सर्व मानव आहोत, जीवन समृद्ध करण्यासाठी बंधुभावाने राहिले पाहिजे' ही खरी मानवी वृत्ती आहे. वेगळे शरीर आणि विचार असले, तरी आपल्या सर्वांमध्ये एकच चेतना आहे. सर्वांना एकत्र आणणारा आणि संतुलन साधणारा मार्ग म्हणजेच धर्म."
पर्यावरणाच्या रक्षणावर भाष्य करताना त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे दिली. "आपण आजकाल फादर्स डे किंवा मदर्स डे साजरे करतो, कारण आपल्याला कर्तव्याची आठवण येते. तीच आठवण निसर्गाबद्दलही हवी. शेतकरी शेतात राबतो म्हणूनच आपल्याला अन्न मिळते. गिरणीत कामगार काम करतात म्हणून वस्त्रे मिळतात. आपण प्रत्येकाचे ऋणी आहोत, त्यामुळे निसर्ग आणि समाजाला परत देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे."

- परदेशातील भारतीयांना आवाहन
प्रवासी भारतीयांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले, "तुम्ही ज्या कर्मभूमीत राहता तिथे पूर्ण निष्ठा ठेवा, पण जन्मभूमीच्या संस्कारांशी घट्ट बांधून राहा. भारतानं उपदेश देण्यापेक्षा स्वतःच्या आचरणातून जगासमोर आदर्श ठेवावा."
- ५ मुद्यांचा कृती आराखडा जाहीर
या सोहळ्यात ३० देशांतील १८० धार्मिक नेत्यांनी सहभाग नोंदवला. हिंसाचार, द्वेष आणि अपमानास्पद वागणुकीविरोधात एकत्र येऊन काम करण्याचा 'वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी' (एक जग, एक मानवता) हा ५ मुद्यांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला परस्परांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सोहळ्याला अमेरिकेतील ८५० शहरांमधून आणि २९ देशांतून सुमारे ६,००० प्रतिनिधी उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी २५० संस्थांनी सहभाग घेतला.