डॉ. आंबेडकरांनी संघाशी जपले जिव्हाळ्याचे संबंध: डॉ. निलेश गद्रे

सांगली: "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जिव्हाळ्याचे संबंध जपले होते. संविधान निर्मितीतील त्यांचे अलौकिक कार्य सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी एक सजग नागरिक म्हणून केले," असे प्रतिपादन डॉ. निलेश गद्रे यांनी केले.
राष्ट्रीय संघटन मंडळाच्या वतीने आयोजित 'बंधुता परिषदेत' ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. स्वप्नील चोपडे, जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर, संघटन मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र तेलंग, उपाध्यक्ष धनंजय दीक्षित आणि सचिव बाळकृष्ण पाटणकर उपस्थित होते.
- संघाच्या पाठीशी उभे राहण्याचे बाबासाहेबांचे आश्वासन
डॉ. गद्रे पुढे म्हणाले की, "बंधुता ही केवळ नैतिक शिकवण नसून ती समाज टिकवून धरण्याची एक शक्ती आहे. २० जानेवारी १९४० च्या 'जनता' वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते की, संघ स्वयंसेवकांना ज्या काही अडचणी येतील, त्या काळात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. स्वयंसेवकांबद्दलचा हा विश्वास आणि पाठिंब्याचे आश्वासन स्वतः बाबासाहेबांनी दिले होते, हे ऐतिहासिक सत्य आहे."
- डॉ. आंबेडकरांच्या निवडणुकीत संघ स्वयंसेवकांचा सहभाग
तत्कालीन लोकसभा निवडणुकीत संघ स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेबांचा हिरीरीने प्रचार केला होता. संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान कार्यकर्त्यांनी जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर दलितेतर मतदारांचा पाठिंबा बाबासाहेबांना मिळाला, असेही डॉ. गद्रे यांनी नमूद केले.
- अद्वितीय संविधान निर्मितीचा प्रवास
संविधानाच्या निर्मितीबद्दल माहिती देताना डॉ. गद्रे म्हणाले, "बाबासाहेबांनी जगातील ६० संविधानांचा सखोल अभ्यास केला. संविधान सभेत ७००० प्रश्न उपस्थित झाले होते, ज्यांचे वर्गीकरण करून २००० प्रश्न तयार करण्यात आले. या सर्व २००० प्रश्नांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले. याच परिश्रमातून आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती झाली."
- बंधुतेची व्याख्या
प्रमुख अतिथी डॉ. स्वप्नील चोपडे यांनी बंधुतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "केवळ ओळख असणे म्हणजे बंधुता नव्हे, तर एकमेकांच्या दुःखात उभे राहणे आणि भिन्नतेतही माणूस म्हणून स्वीकार करणे म्हणजे खरी बंधुता होय. स्वातंत्र्य आणि समता टिकवून ठेवण्यासाठी बंधुता अनिवार्य आहे."
या कार्यक्रमास सांगलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते