ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन व कार्याचे २१ व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बीज भाषणातील संपादित अंश...

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जागतिक इतिहासात आपल्याला स्थान प्राप्त झाले आहे. मात्र महाराजांचे खरे गुन्हेगार आपण आहोत. कारण तेंव्हा आग्र्याहून सूटणाऱ्या शिवाजी महाराजांना आपण आज राजकारण आणि जातकारणात अडकवले आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
प्रेरणास्थानाला लहान केले.
'छत्रपती शिवाजी महाराज जीवन व कार्याचे २१ व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बीज भाषणात ते बोलत होते. राज्याभिषेकाची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. दैदिप्यमान कामगिरी असतानाही शिवाजी महाराजांना आपण मर्यादित केले. आपण आपल्या प्रेरणास्थानाला लहान केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जगभरातील सर्व परंपरांमध्ये राजाच्या अभिषेकाची परंपरा आहे. राजाला अधिकृतपणा प्राप्त होण्यासाठी हा धार्मिक विधी अनिवार्य होता. राजकीय अपरिहार्यतेतून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज होती, असेही डॉ. मोरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महराजांमुळे संस्कृती टिकली
इतिहासाला त्या त्या काळाच्या चष्म्यातून पाहावे लागेल. राज्याभिषेकासंदर्भात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, गागाभट्ट किंवा संभाजी महाराजांना काय वाटते हे महत्त्वाचे आहे. राज्याभिषेकामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर परकीय सत्तांच्या बरोबरीचे स्वराज्याचा दर्जा मिळाला.
परंपरेचे पुनरूज्जीवन
राज्यभिषेकापूर्वी भारताची प्राचिन परंपरा ऱ्हास पावली होती. धर्म हा वेगळा भाग आहे. त्या परंपरेचे पुरूज्जीवन करण्याचे श्रेय शिवाजी महाराजांना जाते. अगदी वेद काळापासूनच्या परंपरेचे पुनरूज्जीवन शिवाजी महाराजांनी केले. भारतीय संस्कृती का टिकली तर महाराजांमुळेच.
----
नौदलाचे पुनरूज्जीवन आणि दूरदृष्टी
शिबाजी महाराजांच्या आधी शेकडो वर्षांपूर्वी भारतात नाविक दल होते. पण त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने नौदलाचा बॅकलॉग भरुन काढला. त्याच कालखंडात युरोपात ग्रॉटीयस हा कायदातज्ज्ञ सागरी हद्दी संदर्भात कायदा करत होता. भारतात तसा कायदा नसतानाही महाराजांनी फिरंग्यांकडे सागरी हद्दीबद्दल आग्रह धरला. यातून त्यांची दूरदृष्टी दिसते. अशा मागण्यांना अधिकृतता येण्यासाठी राज्याभिषेकाची गरज होती. केवळ इस्लामी किंवा परकीय सत्तांनी स्वराज्याला राज्य मानण्यापूरते नाही. तर स्वकीय सरदारांनी स्वराज्याला सत्ता मानावी यासाठी राज्याभिषेकाची राजकीय अपरिहार्यता होती.
जागतीक महासत्तेला आव्हान..
इराण आणि तुर्कांबरोबरच मोगल साम्राज्याची जागतीक सत्ता होती. त्याकडे युरोपमधील नागरिकांचे बारकाईने लक्ष होते. औरंगजेबाच्या राज्यारोहणावर इंग्रजी नाटक रचले गेले’ त्याचे प्रयोग झाले. औरंगजेबाच्या बलाढ्य साम्राज्याची दखल इंग्रजी नाटककारांनी घेतली. त्याला आव्हान देणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे मराठा छत्रपती होणे असमान्य गोष्ट होती. ज्यामुळे भारताचा इतिहास बदलला, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १२ -१३ वर्षात मराठे दिल्लीत धडकतात. दिल्लीचे राज्य चालवतात आणि संपूर्ण भारत मोगलांच्या ताब्यात येण्यापासून वाचवितात.
----