स्वागत वसंताचे अर्थात गुढीपाडवा !

ऋतुराज या नावाने ओळखला जाणारा ,सर्वांच्या मनाचा ठाव घेणारा अर्थात वसंत!
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् | मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर: || गीता १०.३५ ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे असे सांगत भगवान श्रीकृष्णाने या ऋतूचे कौतुक केलं आहेच!
कालिदासाने ऋतुसंहारात केलेले वसंताचे वर्णन म्हणजे ग्रीष्म ऋतूचे वर्णन वाचूनच मनाला आल्हाद मिळतो . सर्वांना आनंद देणारा , असा हा वसंत !
तर अशा या लाडक्या वसंत ऋतूचे स्वागत म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेचा खास दिवस !
ध्वज पताका तोरन कलस सजहु तुरग रथ नाग
सिर धरी मुनिबर बचन सबु निज निज काजहि लाग ||
गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस या आपल्या रचनेत सांगतात की राजा दशरथाने रामाला राजाभिषेक करायचे ठरविले आणि हे समजल्यावर अयोध्यावासी नगरजनांनी पताका लावून , ध्वज उभारून नगरी सुशोभित केली .
वनवास संपवून, रावणाचा वध करून श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह ज्यावेळी अयोध्येला परत आले त्यावेळी मोठ्या उत्साहाने अयोध्या नगरी सजली .
ततो ध्वज पताकाभि : अयोध्या समलङ्कृता | सिक्त राजपथा हृष्टा प्रहृष्टनरनारिका॥
विजयाचे द्योतक,आनंदाचा उत्साहाचा परिपोष म्हणजे अशा पताका , असा ध्वज ! चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला आपण असाच आनंद साजरा करतो .
अथ वत्सरारंभस्तिथिनिर्णयश्च तत्र चैत्रशुक्लप्रतिपदि वत्सरारंभः । प्रतिगृहं ध्वजारोपणं निंबपत्राशनं वत्सरादिफलश्रवणं नवरात्रारंभो नवरात्रोत्सवादि निमित्तं अभ्यङ्गदिश्च् शुद्धमास प्रतिपदि कार्य :||
आपण दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला हे सारे करतोच. धर्मसिंधु या ग्रंथात सांगितलेली ही कृत्ये ! प्रत्येक घरात ध्वज म्हणजे ब्रह्मध्वज बांधून त्याची पूजा आपण करतो . कडुनिंबाची पाने सेवन करणे , अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने घालणे, अंघोळीपूर्वी तेलाने अभ्यंग करणे म्हणजे तेल चोळून शरीर टवटवीत करणे हे सारे करावे हे आपली भारतीय परंपरा सांगते .
चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा ! नव्या संवत्सराचे स्वागत .अशा साठ संवत्सराचे चक्र सांगितले गेले आहे . दरवर्षी चित्र शुक्ल प्रतिपदेला नवे संवत्सर सुरु होते . यावर्षी विश्वावसु नावाचे संवत्सर संपून सुरु होते आहे पराभव नावाचे नूतन संवत्सर !
६० संवत्सरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
प्रभव, विभव, शुक्ल,प्रमोद,प्रजापतीअंगिरा श्रीमुख ,भाव, युवा,धाता ,ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानू, सुभानू ,तारण ,पार्थिव, व्यय, सर्वजित् ,सर्वधारी, विरोधी ,विकृती ,खर, नंदन, विजय, जय ,मन्मथ, दुर्मुख ,हेमलंबी,विलंबी ,विकारी, शर्वरी, प्लव ,शुभकृत, शोभन, क्रोधी, विश्वावसु ,पराभव, प्लवंग, कीलका, सौम्य, साधारण ,विरोधकृत, परिधावी, प्रमादी ,आनंद, राक्षस, नल ,पिंगळ, कालयुक्त, सिद्धार्थी ,रौद्री ,दुर्मती, दुंदुभी, रुधिरोद्गारी, रक्ताक्षी,क्रोधन, अक्षय ही ती साठ संवत्सरे होत .
यापैकी साधारणपणे आनंद नावाचे संवत्सर ऐकून माहिती असते कारण या संवत्सरात राजा शिवछत्रपती यांचा राजाभिषेक ( मूळ शब्द राज्याभिषेक नसून राजाभिषेक असा आहे) झाल्याचे संदर्भ वाचनात येतात .
भारतीय संस्कृती ही निसर्गाच्या कुशीत वाढलेली, फुललेली आहे .
संवसन्ति ऋतव : यत्र | म्हणजे ज्यामध्ये ऋतू वास करतात त्याला संवत्सर म्हटले जाते .
ऋतू हे या निसर्गचक्राचा महत्वाचा घटक . ऋतूंच्या अनुषंगाने भरत आलेली आपली सनातन परंपरा या ऋतूंचा आदर करते, त्यांचे स्वागत करते . गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत .
आपल्या प्राचीन ग्रंथ परंपरेत आपल्याला वसंत ,ग्रीष्म, शरद या ऋतूंचे उल्लेख सापडतात .
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ।वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥ दहाव्या मंडलातील पुरुषसूक्तातील हा मंत्र . ज्यावेळी देवतांनी देवांनी विराट पुरुषाला हवी मानून यज्ञाचे अनुष्ठान केले, तेव्हा वसंत ऋतू हे त्या यज्ञाचे आज्य म्हणजे तूप होते, ग्रीष्म ऋतू ही समिधा होती आणि शरद ऋतू हा त्या यज्ञामध्ये अर्पण केलेले अन्न होते .
तैत्तिरीय संहितेमध्ये मधु ,माधव ,शुक्र , शुचि ,नभस् ,नभस्य ,इष , ऊर्ज ,सहस्,सहस्य, तपस्, तपस्य ही महिन्यांची नावे दिसून येतात . वैदिक साहित्यापासूनच वसंताचे महत्व अधोरेखित होताना दिसते. मधू आणि माधव हे वसंत ऋतूचे अविभाज्य अंगच !मुखं वा एतत् ऋतूनां |यत् वसन्त :|| असे तैत्तिरीय ब्राह्मणात सांगितले आहे . सर्व ऋतूंचे मुख म्हणजे वसंत ! त्यामुळे वसंत ऋतूमध्ये नव्या वर्षांचा आरंभ होणे औचित्याचे आहे . काही अभ्यासक अन्यही ऋतूंमध्ये नवे वर्ष सुरु होत असल्याचे नोंदविताना दिसतात परंतु ज्योतिष सिद्धांत या ग्रंथात चैत्र महिन्यात वर्षारंभ असावा असे सांगितले आहे .
चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी ब्रहमदेवाने सृष्टी निर्माण केली असे मानले जाते . ब्रहम पुराणात सृष्टी निर्मितीची प्रक्रिया सांगितली आहे .
व्रतराज या ग्रंथामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीचे महत्व सांगताना नोंदविले आहे-ब्राह्मे-अत्र प्रतिपत्सूर्योदयव्यापिनी ग्राह्या ॥ चैत्रे मासि जगद्ब्रह्म ससर्ज प्रथमेऽहनि ।। शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योदये सति ॥। इतिवचनात् ॥।
प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपद्युदिते रवो ।। इति भविष्योत्तराच्च |
ब्राह्मे-प्रवर्धतयामास तथा कालस्य गणनामपि ॥। ग्रहानब्दानृतून्मासान्पक्षान् संवत्सराधिपान् ।। ददौ स भगवान् ब्रह्मा सर्वेदेवसमागमे ।ब्राह्मयां सभायां ब्रह्माणमनिर्दश्यतनुं ततः।।
याच दिवशी ब्रह्मदेवांनी कालगणनेचा प्रारंभ केला होता असेही सांगितले आहे. या सर्वाचे स्मरण म्ह्णून आपण ब्रह्मध्वज उभारून त्याची पूजा करतो . ब्रह्मदेवाचे विशेष पूजन यादिवशी आवर्जून करावे तसेच पाद्य, अर्घ्य पुष्प, धूप, वस्त्र अलंकार, होम, बलि, उपहार आणि ब्राह्मणभोजन करावे असेही सांगितले गेले आहे .
यादिवशी पूजनामध्ये शुक्ल आणि कृष्ण पक्ष ,सहा ऋतू ,बारा महिने , दोन अयन (उत्तरायण आणि दक्षिणायन )या सर्वांचे स्मरण आणि त्यांना वंदन करावे .
मदनरत्न या ग्रंथात सांगितले आहे की नव्या वर्षाच्या आरंभी आपले घर सजवावे . आप्त , स्नेही , ब्राह्मण या सर्वांना भोजनासाठी निमंत्रण द्यावे . भोजन करून ते परत गेले की त्यानंतर आपण जेवावे . महोत्सव साजरा करावा . हे एक व्रत असून ते सर्व सिद्धी देणारे असे आहे .
चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवसाला गुढीपाडवा असे म्हटले जाते . गुढी याचा एक अर्थ पताका असा होतो . वारकरी संप्रदायात -माझी जीवाची आवडी ।पंढरपुरा नेईन गुढी ।। असे म्हटले आहे . त्यामुळे आपल्या इच्छेनुसार , धारणेनुसार गुढी उभारावी, भगव्या ध्वजाचे पूजन करावे . या दिवशी कडुनिंबाच्या पानांचे विशेष महत्व असते . भारतीय संस्कृती आणि आजूबाजूचा निसर्ग यांचे उत्तम साहचर्य आहे . येणारा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी म्हणजेच शरीराला थंडावा देण्यासाठी कडुनिंबाची पाने, फुले,काळी मिरी,मीठ, ओवा, हिंग , जिरे यांचे एकर चूर्ण करून ते सेवन करावे .
वसंत ऋतूच्या औचित्याने ब्राह्मणांचा विशेष सत्कार करावा . याला वसंतपूजा असे म्हटले जाते . शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या पोथीबद्ध चरित्रात आपल्याला अशा वसंतपूजेचा उल्लेख वाचायला मिळतो . विविध मंदिरांमध्ये वसंत ऋतूच्या काळात अशी ब्राह्मणपूजा केली जाते .
नव्या वर्षाच्या आरंभी पंचांग पूजन केले जाते . येणारे नवे वर्ष कसे जाईल, हवामानाचा अंदाज कसा असेल , कोणती पिके घ्यावीत ? शुभकार्ये कधी करावीत आणि कधी टाळावीत ? संवत्सर फळ काय आहे हे सारे समजून घ्यावे . हे अशासाठी सांगितले गेले असावे जेणेकरून वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला संपूर्ण वर्षभराचे नियोजन करता यावे . कधी काय करावे आणि कधी काय करू नये याचा अंदाज आधीच यावा .
चैत्र शुक्ल प्रतिपदेला पाणपोई घालावी असेही सांगितले गेले आहे . ज्याकाळी वाटसरू पायी प्रवास करीत असत त्याकाळात उन्हाळा वाढत असताना जागोजागी अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व्यवहारात उपयुक्त आहे . अक्षय्य तृतीयेलाही वैशाखात उन्हाची तीव्रता वाढते तेंव्हाही पाणपोई घालावी असे सांगितले आहे .
गुढीपाडव्याला देवीचे वासंतिक नवरात्र सुरु होते . श्रीरामनवमी पूर्वी रामाचे नवरात्र सुरु होते . त्यानंतर श्री हनुमान जयंतीचा उत्सव येतो . ही सारी मूलतः व्रते आहेत जी अत्यन्त आस्थेने संपन्न केली जातात .
चैत्र शुक्ल तृतीयेला चैत्रगौरीची स्थापना होते . स्त्री मनाला भुरळ पाडणारे आणि निसर्गातील विविध गोष्टींची लयलूट करणारे हे एक व्रत ! वैशाख शुक्ल ततृतीयेला हे व्रत संपते तोपर्यंत देवी पार्वती झुल्यात बसून वसंत ऋतूचा आनंद घेते !
नव्या वर्षांची सुरुवात आनंददायी असायला हवी . गुढीपाडवा तर साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेला आहे . त्यामुळे घरात समृद्धी घेऊन यावी हा तर सहजभाव मनात असतो त्यामुळे सोने, चांदीचे यांचे अलंकार , नव्या वास्तूची खरेदी , नव्या वाहनांची खरेदी . नव्या उपक्रमाची किंवा व्यवसायाची सुरुवात , घरातील शुभकार्ये यापैकी काही आपण करीत असतो .
प्रतिवर्षी एक संकल्प करावा आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारीही घ्यावी . हिंदू नववर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरु होते. आपली कालगणना निसर्गाशी जोडलेली आहे त्यामुळे प्रत्येक नव्या ऋतूचे स्वागत करण्याची परंपरा व्रते, सण पर्व अशा औचित्याने बांधली गेलेली आपल्याला लक्षात येईल. वर्षभर येणाऱ्या या ऋतुचक्राचे स्वागत औचित्यपूर्ण आहे .
महाराष्ट्रात जसा गुढीपाडवा साजरा होतो तसाच भारताच्या विविध प्रांतात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते . तमिळनाडू मध्ये पुथंडू , केरळ मध्ये विशु , आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे उगादी , पंजाबमध्ये बैसाखी अशा विविध पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत केले जाते .
उगादीला नव्या वर्षाचे पंचांग ऐकले जाते . मंदिरात दर्शनासाठी जाणे, एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणे हे भारताच्या विविध प्रांतातील नववर्ष स्वागताचे खास पैलू ! निसर्ग याकाळात भरभरून चिंचा , कैरी यांची लयलूट करीत असतो . त्याचा आस्वाद घेणे हा या नववर्ष स्वागताचा अविभाजय भाग! आधी ते परमेश्वराला द्यावे आणि नंतर ते आपण प्रसाद म्हणून खावे.
भारतीय संस्कृती मूलतः कृषी संस्कृती आहे त्यामुळे ज्या निसर्ग घटकांवर शेती आधारित आहे अशा तत्वांचे पूजन यानिमित्ताने करणे ही कृतज्ञता या सर्व उत्सवी विचारधारेत दिसून येते .
स्थानिक परंपरा , धारणा यातून तयार झालेले हे सण किंवा उत्सव आपल्याला जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक ऊर्जा देतात. समूहभावना वाढीला लावतात .
पराभव असे काहीसे मनाला चटका लावणारे या नव्या संवत्सराचे नाव . पण जीवनाच्या दररोजच्या संघर्षापासून ते आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घडामोडीपर्यंत सर्व क्षेत्रात आपल्याला , आपल्या कुटुंबाला , समाजाला आणि अंतिमतः आपल्या राष्ट्राला सर्वतोपरी विजय मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आणि संघभावनेने एकजूट करणे असा संकल्प या नव्या वर्षासाठी खास ठरावा अशी सदिच्छा !
साभार साप्ताहिक विवेक
डॉ.आर्या जोशी,पुणे