धम्मो मंगलं मुक्किट्ठं। अहिंसा संजमो तवो। देवावि तं नमसंति। जस्स धम्म सयामणो।।
सनातन जैन परंपरेमधील २४ तीर्थंकरांच्या मालिकेतील अंतिम तीर्थंकर वर्तमान जिनशासक श्री महावीर यांची आज जयंती!
इ.स.पूर्व ५९९ चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी वडील सिद्धार्थ आणि माता त्रिशलेच्या पोटी महावीरांचा जन्म झाला. हा उत्सव जैन परंपरेत जन्मकल्याणक म्हणून साजरा केला जातो. महावीर हे काही एकमेव तीर्थंकर नाहीत. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होऊन गेले आहेत. भगवान श्री पार्श्वनाथांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी धर्माची पुनर्मांडणी करण्यासाठी महावीरांचा जन्म झाला अशी जैन बांधवांची धारणा आहे. जैन परंपरेमध्ये श्रमण, श्रमणी, श्रावक, श्राविका यांचा चतुर्विध संघामध्ये समावेश होतो. याच संघाची अर्थात तीर्थाची जे पुनर्रचना करतात त्यांना तीर्थंकर म्हणतात.
मानव जातीच्या कल्याणासाठी वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन दीक्षा ग्रहण केली. आपल्या राजसी जीवनशैलीचा त्याग करून १२ वर्षाची कठोर तपसाधना केल्यावर ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी संपूर्ण समाजाला जीवनकल्याणाचा उपदेश दिला. स्त्री-पुरुष, वर्ण यांपलिकडे जाऊन सर्व प्राणीमात्रांना त्यांनी मोक्षाचा मार्ग दाखवला. त्यांनी पंच महाव्रत आणि अनेकांतवाद यांची देणगी समाजाला दिली. बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांनी आंतरिक शुद्धतेला, पवित्रतेला, आचरणाला अत्याधिक महत्त्व दिले.अहिंसेचा पुरस्कार केला आणि संयम, तपाचा मार्ग सांगितला.
भगवान महावीर म्हणतात-
धम्मो मंगलं मुक्किट्ठं। अहिंसा संजमो तवो। देवावि तं नमसंति। जस्स धम्म सयामणो।।
धर्म हा सर्व मंगलांमध्ये उत्कृष्ठ मंगल आहे. अहिंसा, संयम आणि तपरूपी धर्मामध्ये लीन राहणाऱ्याला भगवान सुद्धा नमन करतात. अहिंसादि पंच महाव्रत, संयमपूर्ण जीवन, कठोर तपसाधना तुम्हाला मोक्षाप्रती घेऊन जाईल.
जीव अनादी काळापासून कर्मबद्ध आहे. या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी संयमी जीवन आणि तप हे दोनच मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीच त्यांनी अंहिसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच महाव्रतांच्या पालनाचा उपदेश केला. हिंसा ही केवळ शारीरीक नसून वाचिक आणि मानसिक देखील असते. या सर्व विचाराला त्यांनी भौतिक पातळीपासून मानसिक पातळीवर नेले. एखाद्याच्या हिंसेची कल्पना देखील हिंसा असून त्याने सुद्धा कर्म बंध होतो. त्यामुळे शारीरिक, वाचिक, मानसिक या तीन्ही स्तरांवर पंच महाव्रतांचे पालन आवश्यक आहे. अत्यंत सूक्ष्मस्तरावर जाऊन त्यांनी या व्रतांचा विचार केला आहे. या व्रतांचे पालन हाच संयमाचा मार्ग आहे. महाव्रतांच्या पालनाने नवीन कर्मांचा बंध होत नाहीत. त्याचबरोबर मागील केलेल्या कर्मांचा परिणाम म्हणून झालेला कर्मबंध नष्ट करण्यासाठी तपसाधना अर्थात निर्जरा या तत्त्वाचे पालन करण्याचा उपदेश त्यांनी दिला. अशा प्रकारे संपूर्ण कर्मांच्या नाशानेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. प्रत्येक जीव हा मोक्ष प्राप्तीसाठी अधिकारी असून आपल्या प्रयत्नानेच सर्व जीव मोक्ष मिळवू शकतात. अशा प्रकारे त्यांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार करून दैववादाला नाकारले.
अनेकांतवाद
भारतीय दार्शनिक विचारांमध्ये जेव्हा अनेक दार्शनिक विचारवंत एकमेकांशी झुंजत होते तेव्हा त्यांनी अनेकांतवाद नावाचा सिद्धांत मांडून सर्व दर्शनांमध्ये एक प्रकारचा समन्वय घडवून आणला. अनेकांत म्हणजे एखाद्या वस्तूची, विचारांची, न दिसणारी अनेक अंगे गृहित धरून त्यांचे अस्तित्व मान्य करणे आणि सामंजस्य साध्य करणे. 'असेच आहे' याचा आग्रह सोडून 'असेही असू शकते' ही विचारांची दिशा वैचारिक भिन्नतांचा समग्र विचार करते. मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास म्हणजे 'अनेकान्त'. अनेकांतामुळे वाद, भेद, तंटे मिटून शांती प्रस्थापित होते. केवळ मनुष्यमात्रांविषयीच नव्हे तर समस्त प्राणिमात्रांविषयी समभाव, समानुभूतीचा भाव तयार होतो.सर्व प्राणीमात्रांप्रती करूणा, मैत्रीची भावना ठेवा असा संदेश त्यांनी दिला. मित्ति मे सव्वभूएसु। वेरं मज्झं न केणइ। सर्वभूतमात्रांशी माझी मैत्री आहे. माझे वैर कोणाशी नाही असे सांगून त्यांनी आपआपसातील वैरभाव सोडून मैत्री भावना वाढविण्यावर भर दिला.
महावीरांचे मुख्य योगदान म्हणजे त्यांनी जीव-अजीव(सजीव-निर्जीव) तत्त्वांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा, स्वावलंबनाचा महामंत्र जगाला दिला. परस्परोपग्रहो जीवानाम् म्हणत सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेच्या उदात्त विचार त्यांनी दिला. सर्व सृष्टी ही एकमेकांवर अवलंबून आहे त्यामुळे सर्वांनी एकमेकांना सहाय्य केले पाहिजे तरच हे अस्तित्व टिकेल. एका अर्थाने लोकशाही हा शब्द न वापरता देखील त्यांनी लोकशाहीचा विचार सर्वांसमोर ठेवला. महावीरांच्या या वैचारिक मांडणीचा प्रभाव तत्कालीन अन्य पंथ-संप्रदायांवरही पडलेला दिसतो.
आजच्या धावपळीच्या, संघर्षाच्या युगात त्यांनी मांडलेला समरसतेचा, समन्वयाला, संयमाचा विचार सबंध मानवजातीला निश्चितच योग्य मार्ग दाखवणारा ठरेल.
शैलेश शिंदे
( लेखक विविध विषयांचे अभ्यासक आणि संशोधक आहेत )