
स्वयंप्रकाशी अंजनाताई
अंजना लगस गेली १२ वर्षे कोल्हापूर येथे हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप या संस्थेच्या शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करतात. डॉक्टरांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे अंजना ताईंना एक वर्षाच्या असताना पोलिओ झाला. आणि तेव्हापासून त्या दिव्यांग आहेत. बेताची परिस्थिती असतानाही आई-वडिलांनी उपचारांसाठी मुंबईतील हॉस्पिटल्स पालथी घातल्याचे अंजनाताई आवर्जून सांगतात. एकदा मूल दिव्यांग आहे, हे कळले कि नातेवाईकांची, आजूबाजूंच्या लोकांची नजर बदलते. कित्येक जणांनी या मुलीला घरात ठेवून काय करतेस, तिला मारून टाक असे सल्ले आई-वडीलांना दिल्याचे अंजनाताई सांगतात. अशिक्षित आईवडीलांनी समाजाच्या विरोधात जाऊन अंजनाताईंना शिकवले. मुलींना शिकवायची गरज काय? असे म्हणणाऱ्याच्या विरोधात जात आई-वडीलांनी अपंग मुलांच्या शाळेचा शोध घेतला. विलेपार्लेत त्यांना शिकायला टाकले.
शाळेत जायचे आवडायचे, त्यामुळे कधी सकाळ होते आणि शाळेत जाते, असे मला व्हायचे. अंजनाताई भावूक होऊन सांगत होत्या. त्या म्हणाल्या, इयत्ता पाचवीत मात्र मला सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत टाकले. तिथे गेल्यावर मात्र फरक जाणवायला लागला. परिपाठ, मैदानावरचे खेळणे, या सगळ्यात मी मात्र वर्गातच असायचे. माझ्या बाजूला कोणी बसायचे नाही. माझ्याबरोबर कोणी डबा खात नसे इथेच मी एकटी पडायला लागले. हीच परिस्थिती घरात होती. मला जग बघायचे असायचे. पण सगळीकडे उचलून न्यावे लागत असल्यामुळे कोणत्याही समारंभामध्ये सहभागी होता येत नसे." मात्र या सगळ्यातही नकारात्मकता, नैराश्य, विफलता बाजूला सारत अंजनाताईंनी शिक्षण हाच एकमेव ध्यास, हे नक्की ठरवले होते.
अंजनाताई इयत्ता आठवीला असतानाच त्यांचे वडील वारले. वडील अचानक वारल्यानंतर जशा आर्थिक अडचणी आल्या, तशा अंजना ताईंच्या शिक्षणातही खूप अडचणी आल्या. पण मोठ्या भावाच्या मदतीने अंजना ताईंचे शिक्षण पुन्हा एकदा चालू झाले. ऍडमिशन ला पैसे नसायचे अशी हलाखीची परिस्थिती असताना आईने सोन्याचे कानातले गहाण ठेवून महाविद्यालयाचे शुल्क दिल्याचे अंजनाताई आवर्जून सांगतात.
योगायोगाने जून २०१२ च्या सुमारास हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप या कोल्हापूर मधली अपंगांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेचा संपर्क त्यांना मिळाला. तिथे पोचताच त्यांना लायब्ररीयनचे काम सांभाळण्यास सांगण्यात आले. अंजनाताई सांगत होत्या की, सुरवातीला एकदम ४-५ हजार पुस्तके कशी सांभाळायची हेच कळत नव्हते. मात्र, नंतर ग्रंथपाल या विषयात मास्टर्स केले. त्यानंतर मग सेटची पहिल्या प्रयत्नात त्या पास झाल्या.
सध्या समर्थ विद्या मंदिर व विद्यालय, उचगाव पूर्व शाळेत ग्रंथपाल या पदावर गेली बारा वर्षे कार्यरत आहेत. तसेच ई साहित्य प्रतिष्ठान या वैश्विक संघटनेच्या ऑडिओ विभागाच्या संचालक म्हणून चार वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या आवाजात सात पुस्तके प्रकशित झाली आहेत. अपंग मुलांसाठी त्या पुस्तकांच्या अभिवाचनाचे काम करत आहेत. शाळेचे आणि संस्थेचे सोशल मीडिया पेज त्या सांभाळतात. स्वतःच्या यु ट्यूब चॅनेलला ,व्हिडिओ एडिटिंग शिकून त्या शाळेतल्या मुलांचे कार्यक्रम प्रसारित करतात.
त्यांचे स्वप्न आहे कि पब्लिक लायब्ररी सुरु करायची आहे.
सगळ्याच स्त्रियांनी आपल्यातले कौशल्य ओळखावे. संधी मिळाली की, त्याचे सोने करा, अजून चांगले काय करता येईल करा, याचा शोध घ्या, तसेच दिव्यांगांनी आत्मबल ओळखा, सहानुभूती घेऊ नका, उलट आपल्यातल्या क्वालिटीज जगापुढे आणा. असे अंजनाताई सांगतात. मनाशी जिद्द आणि ध्यास असेल, तर कितीही अडचणींचा डोंगर पार करता येत ध्येयापर्यंत पोचता येते, हे शिकायला हवे.