शेतीत स्व-प्रयोगांमधूनच देश आत्मनिर्भर होईल’- डॉ. प्रवीण दबडघाव
रांजणगाव गणपती येथे गुणवंतांचा प्रतापराव पवार आणि डॉ. दबडघाव यांच्या हस्ते गौरव

शिरूर (पुणे) : "शेतकऱ्यांनी केवळ शासन किंवा सरकारी योजनांवर अवलंबून न राहता स्वतःच्या गावात विविध कृषी प्रयोग राबवून योगदान दिले पाहिजे. यातूनच गाव आणि शेती समृद्ध होऊन देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी रविवारी येथे केले.
रांजणगाव गणपती येथे बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित शिरूर तालुक्यातील गोसेवक, पर्यावरण रक्षक व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात डॉ. दबडघाव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. "कृषी उत्पादन कसे वाढेल यासाठी समाजातील सर्व स्तरांवर चिंतन होणे गरजेचे आहे," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना 'सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. पवार म्हणाले, "तोट्यातील शेतीला फायद्यात आणण्यासाठी एआय तंत्रज्ञान अत्यंत कल्याणकारी ठरेल. चीनने गेल्या २५ वर्षांपासून शालेय स्तरावरूनच एआयचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी, खते आणि पैशांची मोठी बचत होते. जमिनीचा पोत सुधारून उत्पादन क्षमता प्रतिएकरी ४० टनांवरून १४० ते १५० टनांपर्यंत वाढवण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. देशभरात या तंत्रज्ञानाचा स्वीकार झाल्यास खतांच्या आयातीत मोठी बचत होईल."
या प्रसंगी पुणे विभाग संघचालक संभाजीराव गवारे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी केले. विठ्ठल वाघ यांनी सूत्रसंचालन, तर सागर फराटे यांनी आभार मानले.

- विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान
या कार्यक्रमात कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले:
१. जलव्यवस्थापन पुरस्कार: राजेंद्र गदादे (स्व. कांचनभाई शहा पुरस्कार)
२. पर्यावरण पुरस्कार: उमेश रणदिवे (स्व. बिंदुमाधव जोशी पुरस्कार)
३. कृषी गौरव पुरस्कार: विजीत मांढरे (स्व. मधुकर टेमगिरे पुरस्कार)
४. गोसेवा पुरस्कार: हरिदास खिल्लारी (स्व. संतोष गांधी पुरस्कार)
५. सेवाकार्य पुरस्कार: शहाजी दळवी (स्व. गणपत खेडकर पुरस्कार)
६. कृषिसेवा पुरस्कार: सुनीता फराटे (स्व. बाबूताई दौंडकर पुरस्कार)