हे कर्मयोगिनी राजयोगिनी जयतु अहिल्यामाता ।
युगों युगों तक अमर रहेगी यशकीर्ति की गाथा ।
जय जयतु अहिल्यामाता । जय जयतु अहिल्यामाता ॥
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा जागर ...

धर्मपरायण अहिल्यादेवी
अहिल्यादेवींचे जीवन हे धर्मपरायण होते. “ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे, ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे” हे त्यांच्या राजनीतीचे सूत्र होते. त्यांच्या जीवनातील त्याग आणि सेवा ही ईश्वर समर्पित होती. अहिल्यादेवींच्या पत्राची सुरुवात “श्री शंकर आज्ञेवरून” या मायन्याने होत असे. श्री महादेवाच्या आज्ञेवरून हे पत्र पाठवत असल्याचा भाव त्यांच्या हृदयात जागृत होता. पत्राच्या शेवटी अहिल्यादेवी स्वतःचे नाव अथवा सही करत नव्हत्या. फक्त ‘श्रीशंकर’ एवढेच लिहित होत्या. महादेवाच्या नंदीला होळकरांच्या राजचिन्हाच्या उजव्या बाजूला स्थान होते. आपले राज्य शिवार्पण करून भगवान शिवाच्या साक्षीने राज्य चालवावे याच उदात्त हेतूने त्यांनी आपल्या हातात शिवपिंड धारण केले होते. मूळात हिंदवी स्वराज्याचे अधिष्ठान हे ईश्वरीच होते.
पंढरपूरच्या विठोबावर त्यांची श्रद्धा होती. अहिल्यादेवींनी रखुमाईच्या मूर्तीसाठी दागिने पाठवले होते. खंडेराव होळकर यांनीही विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक तरतूद केली होती. अहिल्यादेवी राजघराण्यातील असल्या तरी त्यांचा पिंड हा धार्मिक व आध्यात्मिक होता. त्या म्हणत “स्नानाने शरीरशुद्धी आणि ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते” मराठी कवयित्री शांता शेळके यांनी त्यांच्या ‘सती अहिल्या’ या कवितेत अहिल्यादेवींची धर्मपरायणता, सात्विक वृत्ती आणि निर्मळ चारित्र्याचा गौरव केला आहे. या कवितेत शांता शेळके लिहितात -
होते नव्हते सर्व अर्पिले जनकल्याणासाठी ।
अजून कोटिलिंगार्चन चाले नित्य नर्मदेकाठी ॥
शिवनिर्माल्यापरी सतीने विभव मानिले सारे ।
गुण गौरव साध्वीचा गाती आजहि तिथले वारे ॥
राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी ।
अजूनी नर्मदाजळी लहरती तिच्या यशाची गाणी ॥