कालिदास म्हटलं की वाङ्मयातील सप्तरंगी इंद्रधनुष्य सगळ्यांना आठवतं. ते म्हणजे त्यांची दोन महाकाव्ये, तीन नाटके आणि दोन लघुकाव्य अर्थात खंड काव्य. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशा शब्दांनी सुरुवात झालेला ‘मेघदूत’ या काव्याचा प्रारंभ सर्वांना माहीत आहे. आणि तोच कालिदास दिन म्हणून मानला जातो. आपण प्रथम महाकवी, राष्ट्रकवी, निसर्गकवी कालिदासाला वंदन करूया आणि त्याच्या जीवनाचा आणि वाङ्मयाचा थोडा परिचय करून घेऊया.
- प्रा. डॉ. रुपाली कापरे

कालिदास म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला एक निसर्गकवी. एकदा कवींच्या श्रेष्ठतेबाबत गणना करताना असा श्लोक म्हटला गेला, ‘कवीनाम गणनाप्रसंगे कनिष्ठाकाधिष्ठित कालिदास’ म्हणजे गणना करताना कनिष्ठका म्हणजे करंगळी पासून कालिदासाचे नाव घेऊन सुरुवात केली आणि पुढचे बोट अनामिका म्हणजे कुणाचेच नाव घेता न येणारी अशी ती अनामिका, याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ केवळ म्हणजे केवळ कालिदासच. सुरुवात कालिदासापासून आणि शेवट किंवा पुढे कोणाचेच नाव घेता येईना. त्याबद्दल दुसरीही एक आख्यायिका अशी आहे की, एकदा कालिदास सरस्वतीच्या मंदिरात गेला असता तिथं भास भवभूती इत्यादींच्या नावांचा उच्चार केला गेला. सर्वश्रेष्ठ कवी म्हणून तेव्हा कालिदास मातेला विचारतो, मी कोण आहे? तेव्हा सरस्वती उत्तर देते ‘त्वमेव अहम’ कालिदासाला खूप आनंद होतो आणि तिथून पुढे त्याच्या वाङ्मयामुळे त्याची प्रसिद्धी होते आणि तो सर्वश्रेष्ठ कवी म्हणून गणला जातो.
कालिदासाच्या जन्माबद्दलही मतमतांतरे आहेत. कोणी तो गुराख्याचा पुत्र होता असे सांगतात. गुरे चरायला नेली असता एके दिवशी एका हत्तीच्या सोंडेत माळ असताना ती त्याच्या गळ्यात घातली गेली. आणि त्याला राजप्रासादात नेऊन राजकन्येशी त्याचा विवाह लावला. कारण ती राजकन्या अत्यंत हुशार होती, ज्ञानी होती. तिला कोणीच राजकुमार पसंत पडत नव्हता आणि म्हणून प्रधानाने अशी युक्ती लढवली की, हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो तिचा पती होईल आणि म्हणून त्याचा विवाह राजकन्ये बरोबर झाला. राजकन्येने प्रथम भेटीत त्याला विचारले असता ‘असती कश्चितवा ग’ विशेष त्याला काहीच उत्तर देता न आल्याने तिने त्याला हाकलून दिले. म्हणून तो कालीमातेची आराधना करण्यास बाहेर पडला आणि तिची भक्ती करून तिला प्रसन्न करून त्याने तीन काव्य रचिली. पहिलं काव्य ‘असती’ या शब्दाने सुरू होणारे.. ‘अस्ती उत्तरस्यम दिशिदेवतात्मा’ अशी सुरुवात असणारे कुमार संभव महाकाव्य. कश्चित या शब्दाने सुरू होणारे मेघदूत हे काव्य आणि ‘वागर्थ विव संपृक्तौ....’ अशी सुरुवात असणारे रघुवंश महाकाव्य, हे त्याने रचिले तसेच ऋतुसंहार हे खंड काव्य, तीन नाटके पहिले मालविकाग, दुसरे विक्रमोर्वशीय आणि तिसरे अभिज्ञान शाकुंतल.
कालिदासाचा काळ साधारण विक्रमादित्य द्वितीय आणि चंद्रगुप्त यांचा काळ साधारण इसवीसन 380 ते 413 असा असावा. चंद्रगुप्ताचा काळ भारताचे सुवर्ण युग मानले जाते. कालिदासाच्या काव्यात सर्वत्र वैभव विलासाचे चित्र दिसून येते. कालिदास ब्राह्मण होते असेही म्हटले जातं, कारण त्यांच्या काव्यात यज्ञ मंदिर, तपश्चर्या, ऋषीजीवन यांचे त्यांनी तन्मयतेने वर्णन केले आहे. ते शिवभक्त ही होते म्हणूनच त्यांच्या काव्यात शिवभक्ती ओसंडून दिसते. मेघदूतात वर्णन करताना मेघाला सांगताना वक्रपंथ जरी झाला तरी आवर्जून उज्जैनच्या महाकालेश्वर याचे दर्शन घे असं ते आवर्जून सांगतात. राज्यसभा आणि राज्य परिवाराशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. कालिदासांनी भारत भ्रमण केलं होतं. त्यामुळे सर्व प्रदेशांचे चक्षुदृष्ट वर्णन त्यांच्या काव्यात आढळते. सर्व शास्त्रांचे ज्ञान आणि पांडित्य अगाध होते. वेददर्शन, शास्त्र पुराण, ज्योतिष, कामशास्त्र, नाट्यशास्त्र, या सर्वांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला होता. कालिदासाला निसर्ग कवी आणि राष्ट्र कवी असं संबोधलं जातं. ते यासाठीच आपण आता थोडक्यात त्याच्या कलाकृतींचा आढावा घेऊया.....

महाकाव्यातील पहिलं काव्य ‘कुमार संभव’! कुमार म्हणजे कार्तिकेय आणि संभव म्हणजे जन्म होय. तारकासुराचा वध करण्यासाठी विश्वाला संकटातून सोडवण्यासाठी कुमार संभवाची कथा आहे. हिमालयाची कन्या पार्वती कठोर तपश्चर्या करते आणि शिवाला पती रूपात प्राप्त करते. या दिव्य नायक नायिकेच्या मिलनातून कार्तिकेयाचा जन्म होतो. पार्वती तपश्चर्या करत असताना शंकराने तिची परीक्षा घेतली आणि ती यशस्वी झाली. यामधील भाषा, भाव, वर्णन, छंद योजना यावरून हे काव्य जरी सतरा सर्गांचे असले तरी आठ सर्गच कालिदासाची कृती मानली जाते. पुढचे नऊ सर्ग याबाबतीत वेगळे वाटतात.
महाकाव्याचा आरंभ हिमालयाच्या वर्णनाने झाला आहे. ते वर्णन अतिशय आकर्षक केलेले आहे. शंकराची समाधी, कामदेवाचे आगमन, वसंताचा विहार, रतीचा विलास, पार्वतीची कठोर तपश्चर्या, शेवटी वर्णन केल्या असून अतिशय सुंदर भाव अभिव्यक्ती साधली आहे.
‘रघुवंश’ या महाकाव्यामुळेच कालिदासाला ‘रघुकार’ असं नाव मिळालं. संस्कृत पंचमहाकाव्यात हे उत्कृष्ट महाकाव्य आहे. एकूण 19 राजांचे काव्य आहे. दिलीप राजापासून अग्नी मित्र पर्यंत सूर्यवंशातील 19 राजाचे वर्णन यात आहे. या महाकाव्याचे नाव ‘रघुवंश’ का ठेवलं तर दिलीप. आणि पुत्र प्राप्ती होण्यासाठी वसिष्ठांच्या आश्रमात जाऊन कामधेनुच्या कन्येची नंदिनीची सेवा केली. त्यात नंदिनीने राजाची परीक्षा घेतली आणि एक माया निर्माण करून त्या गाईवर सिंह आक्रमण करतो. तेव्हा आपला प्राण अर्पण करण्याची तयारी दाखवली. तेव्हा ती गाय प्रसन्न होऊन राजाला पुत्रप्राप्ती झालेली आहे. त्याचा जो पुत्र रघु आपल्या पित्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये इंद्राबरोबर युद्ध करून विजय मिळवला आणि म्हणून दिलीपला शंभराव्या यज्ञाचे फळ प्राप्त झाले. म्हणून या काव्याला ‘रघुवंश’ असं म्हटलं गेल. या काव्यातील अनेक प्रसंग ही प्रभावशाली आहेत. कौत्साला रघुनी दिलेले दान, इंदुमतीचे स्वयंवर, अज विलाप, विमानाद्वारा राम सीतेचे लंके होऊन प्रत्यागमन, निर्वासित सितेचा प्रसंग हे अतिशय सुंदर रेखाटलेले आहेत. असं म्हटलं जातं ‘कइह रघुकारे न रमते’
‘मालविग्नी मित्र’ हे कालिदासाचे पहिले नाटक. कालिदासाच्या नाटकातही कालिदासाचे श्रेष्ठत्व दिसून येते.
‘विक्रमोर्वशीय’ हे कालिदासाचे दुसरे नाटक. राजा पुरु रवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रणयाची कथा यात आहे. या कथेचे मूळ वैदिक वाङ्मयात आहे. ऋग्वेदात आणि शतपथ ब्राह्मणात ही कथा आलेली आहे. तसेच विष्णू मत्स्य वगैरे पुराणातही ही कथा आलेली आहे. कालिदासाच्या सुंदर भावभाषा शैली द्वारा या वैदिक आख्यानाला सुंदर नाटकीय रूप आले आहे. राजा पुरु रवा केशी नामक दैत्यापासून उर्वशीला सोडवतो आणि तिच्या अलौकिक सौंदर्यावर मोहित होतो. उर्वशी ही त्याच्या पराक्रमावर मुग्ध होते. पण उर्वशीला पुत्र दर्शनापर्यंत मृत्यूलोकात राहण्याचा शाप मिळतो. आणि म्हणून पुरुरवा उर्वशी गंधमादन पर्वतावर प्रवेश करतात. तेव्हा उर्वशीला वेलीचे रूप प्राप्त होते. तिच्या विरहाने व्याकुळ झालेला पुरुरवा आक्रोश करतो आणि संगमनीय मण्याच्या प्रभावाने उर्वशी पुन्हा स्त्री रूपात प्रगट होते. दोघेही राजधानीला परत येतात. काही काळाने त्यांना पुत्र प्राप्ती होते. पण ती आपल्या मुलाला आश्रमात ठेवते. पण त्याचे मुख पाहिले तर तिला स्वर्गात निघून जावे लागले असते. शेवटी ती शाप संपल्यावर स्वर्गात जाते. राजा पुत्रावर राज्याभिषेक करतो आणि वनात जाण्यास निघतो. तेव्हा नारदांचे आगमन होते आणि इंद्राचा संदेश सांगतो की, पुरुरव्याची आजीवन सहधर्मचारिणी म्हणून इंद्राने परवानगी दिलेली आहे. या बातमीने आनंद प्राप्त होऊन हे नाटक संपले आहे. या नाटकात शृंगार रसाच्या सर्व छटा सुंदर वर्णन केलेले आहे. संयोग वियोग याचा अनुभव येतो. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुंदर अशी प्रणय कथा मानवीय मनोभावाच्या पृष्ठभूमीवर साकारलेली आहे. ‘विक्रम उर्वशीय’ नाटकात कालिदासाची कल्पकता पराकोटीला गेलेली आहे. तिचे लावण्य वर्णन करताना उर्वशी म्हणजे अलंकाराचा अलंकार आहे. प्रसाधनाचे प्रसाधन आहे आणि उपमानाचे उपमान आहे. असं म्हटलं आहे.
‘अभिज्ञान शाकुंतल’ ही कालिदासाची सर्वश्रेष्ठ कलाकृती. कालिदासाच्या या नाटकात असं म्हटलं आहे ‘काव्येशू नाटकं रम्य तत्ररम्य शकुंतला तत्रापिचतुर्थोंक तत्रश्लोकचतुष्टयम’. हे नाटक सात अंकी असून राजा दुष्यंत आणि कर्म ऋषींची मानसकन्या शकुंतला यांच्या प्रणयाचे वियोगाचे आणि पुनर्मिलनाचे अत्यंत सुंदर वर्णन आणि दर्शन यामध्ये आपल्याला होते. मुख्य म्हणजे कणवांनी शकुंतलेला सासरी जाताना दिलेला आशीर्वाद आणि उपदेश आजच्या काळालाही उपयुक्त आहे.... ‘शुश्रूषस्व गुरून’ आज मुली सासरी जाताना असा जर संदेश, उपदेश त्यांना मिळाला तर सगळ्या वैवाहिक समस्या सुटतील, घटस्फोटांचे प्रमाण कमी होईल, असं वाटतं.
उरलेली दोन खंड काव्य म्हणजे ‘मेघदूत’ आणि ‘ऋतुसंहार’. मेघदूत कुबेराचा यक्षाने फुले आणण्याच्या कामात कसूर केला. त्यामुळे एक वर्षभर धन्याच्या शापामुळे रामगिरीवर पत्नीचा विरह सोसत राहू लागला. आणि त्यावेळी आषाढाच्या प्रथम दिवशी आकाशातील मेघ पाहून त्याला दूत करण्याची कल्पना सुचून त्यानं मेघाकरवी आपल्या प्रिय पत्नीला संदेश पाठवला. त्यामध्ये सगळ्या स्थळांची, नद्यांची, पर्वतांची, शहरांची, उज्जैन नगरीची, आपल्या अलकानगरीची आणि विशेषता आपल्या घराची आणि आपल्या पत्नीची अशी काही वर्णन केली आहेत. की त्यातला संदेश केवळ उत्तर मेघामधील एक दोन श्लोकातच सांगितला आहे. पण संपूर्ण काव्य निसर्गांनी ओथंबलेलं, प्रेमाने भरून वाहणार आणि प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणार झालेल आहे. विरहिणी पत्नीचे वर्णन स्वभावोक्ती अलंकारात इतक सुंदर साकारल आहे. प्रत्येकाला मेघदूत वाचल्याशिवाय आपल्या जीवनाचं साफल्य झालं असं वाटणारच नाही. प्रत्येकामध्ये असा यक्ष दडलेला असतो आणि आपल्या पत्नीवर अपार प्रेम करत असतो. पण एक वर्षाचा तिचा विरह त्याला सोसावा लागतो. तेव्हाच खरं प्रेम आपल्याला समजतं, तशीच आपल्याही जीवनात आपण कार्यामध्ये कामामध्ये कर्तव्यामध्ये कसूर करता कामा नये. आणि जर झालीच तर यक्षासारखा आपल्याला एखादा शाप भोगाव लागतो असं मला वाटतं.
‘ऋतुसंहारट हे त्याचं निसर्गाचं चित्र वर्णन करणारे अर्थात सहा ऋतूंचे सहा सोहळे दाखविणारे, असे सुंदर खंड काव्य आहे. प्रत्येकानं ऋतू वर्णनासाठी या काव्याचा आस्वाद घ्यावा आणि संदर्भ घ्यावा असं वाटतं. म्हणून तर काहीजण असं म्हणतात कालिदासाच्या सर्व कलाकृती जरी नाही अभ्यासल्या किंवा उरल्या नसत्या तरी, केवळ मेघदूत एवढं जरी उरलं असतं किंवा अभ्यासलं तर कालिदासाचे श्रेष्ठत्व प्रत्येकाच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच शक्य होईल तेवढं निदान मराठी भाषेतून या सर्व काव्यांचा अभ्यास करावा, आस्वाद घ्यावा. आणि कालिदास दिन म्हणून एक दिवस साजरा न करता प्रत्येकाने प्रत्येक दिवस ‘कालिदास दिन’ साजरा करावा.
त्याच्या वाङ्मयातला एक भाग, एखादा श्लोक, एखादे वर्णन दिवसाकाठी वाचावं. म्हणजेच आचरणातही आणावं, जसं आपण इतर ग्रंथांची पारायण करतो तशी, कालिदासाच्या ग्रंथांची पारायण केले नाहीत तरी त्याचा आनंद मात्र नक्कीच घ्यावा. कालिदासाला कोटी कोटी प्रणाम. मनापासून वंदन आणि जसं माधव ज्यूलियन आईला म्हणतात, ‘घे जन्म तू फिरूनी’ मला म्हणावसं वाटतंय की, ’हे कालिदासा तू पुन्हा जन्म घे, पुन्हा नव्या कलाकृती निर्माण कर आणि आम्हाला त्याचा आस्वाद घेऊ देत.’’