उपासना नारीशक्तीची
'अप दीपो भव' प्रमाणे काम करणाऱ्या कोल्हापूरच्या तृप्ती ताई

पर्यावरण संवर्धन हा विषय गेल्या दोन दशकांपासून शासन, विविध सामाजिक संस्था, संयुक्त राष्ट्र संघा सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठे यांच्या ऐरणीवर आला आहे. जागतिक तापमान वाढीबरोबरच नागरी वस्तीमधील घनकचरा, सांडपाणी आणि प्लास्टिक यांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहेत. त्यामुळेच पर्यावरण संवर्धनासाठी कायदे करण्याची वेळ आली. मोठ्या प्रमाणात जनजागृतीही सुरूच आहे. असे असले तरी पर्यावरण संवर्धन हे अजूनही आव्हानात्मकच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये 'अप दीपो भव' या उक्तीप्रमाणे समाजात काम करणाऱ्या काही व्यक्ती संस्था आहेत. अशांच्या मांदियाळीतील एक नाव म्हणजे कोल्हापूरच्या तृप्ती ताई. तृप्ती शशांक देशपांडे असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी मानसशास्त्र विषयांमध्ये एम ए केले. त्यानंतर कमर्शियल आर्ट्स चे शिक्षण घेतले. वीस वर्षे डिझायनिंग मधील स्वतःचा व्यवसाय यशस्वी केला. या काळात त्यांच्यामध्ये असणारी सामाजिक जाणीव त्यांना विविध माध्यमातून कार्यप्रवण करत होती. कालांतराने व्यवसाय बंद करून पूर्णवेळ पर्यावरण संवर्धनाचे काम तृप्ती ताईंनी हाती घेतले. कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हटले जाते. तृप्ती ताईंनी पर्यावरण संवर्धनाची चळवळ स्वतःच्या कुटुंबापासून सुरू केली. वसुंधरा या संस्थेच्या माध्यमातून त्यांना घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचे प्रशिक्षण मिळाले. याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या घरी केलाच पण अनेकांना त्यांनी कंपोस्ट खत करण्यासाठी उद्युक्त केले. त्यांना याची माहिती दिली आणि त्यांच्याकडून घरगुती कचऱ्यापासून खत बनवून घेतले. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे परड्यातील बाग हे त्यांनी जाणले. त्यातूनच टेरेस गार्डनिंग सारखी शहरी भागात उपयुक्त ठरणारे संकल्पना पुढे आली. स्वतःबरोबरच अनेक महिलांना त्यांनी घरातील टेरेस गार्डन फुलवण्यासाठी मदत केली. या उपक्रमामुळे वसुंधरा संस्थेचे सदस्य ८० च्या घरात पोहोचले. वरकरणी जरी हा आकडा छोटा वाटत असला तरी याची परिणामकारकता मोठी आहे. कारण जी व्यक्ती आपल्या घरातील कचऱ्याचे कंपोस्ट खत करते. घरातील कचरा महापालिकेला देत नाही अशाच व्यक्तीला सदस्य केले जाते.
तृप्ती ताईंचा आणखी एक यशस्वी प्रयोग म्हणजे कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती. शेतामधील कचरा, गोठ्यामधील शेण आणि मूत्र यापासून बायोगॅस बनतो हे आपण पाहिले आहे. मात्र तृप्ती ताईंनी घरातील घनकचऱ्यापासून बायोगॅस बनवण्याचे तंत्र अवगत केले. स्वतःच्या घरी त्याचा यशस्वी प्रयोग केला. आणि याचे मॉडेल विकसित करून अनेकांच्या घरी अशा पद्धतीने बायोगॅस बनवण्याचे यशस्वी प्रयोग केले. यामुळे घरातील गॅसची बचत झालीच पण त्याचबरोबर कचरा निर्मूलन नाही झाले. या मॉडेलला जर मोठ्या प्रमाणात अमलात आणले तर मोठ्या गृह प्रकल्पांचा कचरा देखील महापालिकेला उचलावा लागणार नाही. सध्या प्लास्टिकची समस्या आहे अकराळ विक्राळ स्वरूप धारण करत आहे. घरामध्ये दररोज एक प्लास्टिक पिशवी तरी येत असते. अशा असंख्य प्लास्टिक पिशव्या कचऱ्याच्या माध्यमातून परिसरात पडतात. कापडी पिशवी हे प्लास्टिक निर्मूलनाचे प्रभावी माध्यम आहे. ही ओळखून कोल्हापुरात कापडी पिशवीची चळवळ सुरू झाली. काही महिलांनी एकत्र येऊन घरातील जुन्या साड्या द्या. आणि महिला बचत गटांकडून पिशव्या करून घ्या. असा विचार मांडला. यामध्ये तृप्ती ताई अग्रेसर होत्या. घरातील जुन्या साडीची विल्हेवाट झाली. प्लास्टिक पिशवी गेली. कापडी पिशवी मिळाली. आणि गरजू महिलांना रोजगार मिळाला. असा या उपक्रमाचा उद्देश होता. आजही हा उपक्रम विविध ठिकाणी सुरू आहे.
कोल्हापूर शहरातील काही विचारी मंडळींनी एकत्र येऊन कोल्हापूर अर्थ वॉरियर ही संघटना सुरू केली आहे. तृप्ती ताई त्याच्या संस्थापक सदस्य आहेत. शहरांमध्ये लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवणे. प्लास्टिक मुक्त शहरासाठी संपूर्ण शहरातील प्लास्टिक संकलित करणे, वृक्षारोपण करणे, असे असे विविध उपक्रम ही संस्था राबवत असते. या संस्थेने कोल्हापूरकरांच्या पर्यावरण विषयक जाणीव जागृत केल्या.
ना कुठले आंदोलन, ना कुठला मोर्चा, ना व्यवस्थित च्या नावाने खडे फोडणे. तृप्ती देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवेदनशील मनांना संघटित करून सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. ज्याप्रमाणे अंधाराच्या साम्राज्याला छोटी पणती छेद देते. त्याचप्रमाणे तृप्ती ताईंचे काम स्वतःबरोबरच इतरांनाही प्रकाशमान करणारे आहेत.
विश्व संवाद केंद्र, पुणे