•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

मणिपूरी लोकांचे प्रिय ओजाशंकर - भय्याजी काणे

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 20 days ago
भाष्य  

मणिपूरी लोकांचे प्रिय ओजाशंकर - भय्याजी काणे

    

 भारताचा  पूर्वोत्तर भाग नयनमनोहर निसर्गसौंदर्याने नटलेला अतिशय  रमणीय असा प्रदेश. दुर्दैवाने तिकडचे ईम्फाळ, त्रिपुरा, मणिपूर ही नावे नेहमी दंगली, जाळपोळ, दहशतवाद  यासाठीच कानावर पडतात.  भारताचा फार मोठ्या लांबीचा सीमावर्ती भाग ईशान्येला लागून असल्याने  सीमेपलीकडून होणारी शत्रुदेशाची सततची घुसखोरी या प्रदेशाला सारखं धगधगत ठेवते. ही  समस्याग्रस्त स्थिती स्थानिकांचे जगणे सदैव अस्वस्थ करणारी आहे. ही  अस्वस्थता दूर करण्यासाठी साधारण पन्नास वर्षापूर्वी हाती ज्ञानदीप घेऊन इथे  एक देवदूत अवतरला आणि  थोड्याच दिवसात  मणिपूरींना एका शिक्षकाच्या रूपात आपला प्रिय ओजाशंकर मिळाला.

     "ओजा" म्हणजे मणिपूरी भाषेत 'पूजनीय' आणि शंकर म्हणजे अर्थात भय्याजी, शंकर दिनकर काणे. या "ओजाशंकर" जन्मशताब्दी निमित्त पूर्व विकास प्रतिष्ठानच्या वतीने  पुणे, मुंबई, नाशिक, मणिपूरसह सह अनेक शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले आणि त्यांच्या शताब्दीचा समारोप सुध्दा पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. 

       ध्येयनिष्ठ संघ प्रचारक भय्याजी काणे यांचे  जसे हे जन्म शताब्दी वर्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ स्थापनेचेही हे शताब्दी वर्ष, हा एक  सुंदर योगायोग!  संपूर्ण जगाला आकर्षण वाटत असलेले जगातील एकमेव  संघटना आर एस एस.. संघाचे सेवाकार्य  "राष्ट्रहित सर्वपरी" या तत्त्वावर चालते.  त्याच संस्कारात घडलेले मूर्तीमंत त्यागमय समर्पित  व्यक्तीमत्त्व भय्याजी काणे यांच्याकडे पाहून मनुष्य निर्माणाचे कार्य प्रत्यक्ष किती समर्थ रूपात  प्रत्ययाला येऊ शकते, यावर विश्वास बसतो. संघस्पर्श झालेली, संघ विचारांनी प्रेरीत, आणि संघ संस्कारात घडलेली माणसे खरोखर त्यागमय जीवनाचे उदाहरण म्हणूनच जगापुढे आलेली आढळतात. असेच गौरवशाली उदाहरण आज भय्याजींच्या रूपात जन्मशताब्दी वर्षामुळे पुन्हा एकदा ठळकपणे  सर्वांसमोर येत आले आहे. यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी विविध प्रयत्न पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या वतीने  करण्यात आले. विशेषतः मणिपूर व  पंचक्रोशीत  झालेले  सामाजिक परिवर्तन भय्याजींच्या दूरदृष्टीचे साक्षात रूप आहे. ते कसे घडून आले त्याचा मागे वळून मागोवा घेताना पूर्वीचे आणि आताचे  अशी दोन्ही चित्र स्पष्ट होतात; एका लघुपटाच्या माध्यमातून... हिंदी व मराठी भाषेतील या लघुपटातून भय्याजींचे कार्य आणि ईशान्येची सामाजिक स्थिती यात  मांडण्यात आली आहे.  त्यातून हजारो लोकांना  सीमावर्ती भागात भय्याजींचे काम किती कठीण होते त्याची कल्पना येते. 

    पूर्वोत्तरी अष्टप्रदेशांचा हा भूभाग डोंगर द-यांनी वेढलेला. अरूंद रस्ते, अपूरी साधने, गरीबी आणि अज्ञान, विकासाचा अभाव यामुळे इथल्या स्थानिकांचे दैनंदिन जीवन खडतर. ही सर्व स्थिती जवळून बघितल्यावर  भय्याजी काणे यांनी या बिकट स्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी  शिक्षण हेच माध्यम योग्य असल्याचे ठरवून इथे शाळांची स्थापना केली. सुरूवातीला एका छोट्या खोलीत प्राथमिक  शालेय  शिक्षणाचा हा पाया रचताना भय्याजींना खात्री होती, शिक्षण हाच पर्याय या लोकांच्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल. भविष्यात त्यांचा हा तर्क खराच ठरला.  या कामासाठी भय्याजींचे ईशान्येला येणे, हा ईश्वरी संकेत असावा.  कारण तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांनी  एका कार्यक्रमात  सीमावर्ती भागातील लोकांच्या उपेक्षित  स्थितीबद्दल चिंता व्यक्त करून संघाने तिथे काही विधायक कार्य ऊभे करावे अशी सूचना केली होती. त्या कार्यक्रमात प्रचारक म्हणून सहभागी झालेल्या भय्याजींच्या मनात गुरूजींचे ते शब्द सतत गुंजत राहिले. त्यातून ईशान्येचा विकास, हाच भय्याजींचा जीवनध्यास होऊन बसला. आजवर  ईशान्येला फक्त  दुःख-वेदनाच सहन  कराव्या लागल्या होत्या. पण आता या देश बांधवांचे दुःखाश्रू पुसण्याचे व्रत घेऊन भैय्याजी कंबर कसून या कामात उतरले. अर्थात हे काम सोपे नव्हते.

   सुरूवातीला इशान्य भारतात संघाचे प्रचारक म्हणून  भय्याजी १९४९ /५०मध्ये  आले, तेव्हा इम्फाळ मधल्या एका पंजाबी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रूजू झाले. दुर्गम भागात कामाचा भय्याजींना अनुभव होता; पण इथे  चीन, म्यानमारच्या सीमा लागून असल्याने तिकडून होणारा अंमली पदार्थाचा अवैध व्यापार  व बेकायदा शस्त्रवाहतुक या गुन्हेगारीत स्थानिक तरूणपिढी  अडकली होती.अफूच्या शेतीशिवाय दुसरे उत्पन्न नाही.  म्हणून लोकांनी आपली मुले शाळेत पाठवावी, यासाठी भय्याजींनी जिद्दीने प्रयत्न केले. अनोळखी भाषा, भिन्न खाणेपिणे व संस्कृती, नवख्या लोकांचा अस्वीकार करण्याची आदिवासींची वृत्ती या सगळ्या प्रतिकूल स्थितीशी समरस  होण्यासाठी भय्याजी या लोकांमधलेच एक होऊन राहिले. हळूहळू आपुलकीचा धागा गुंफला जाऊ लागला. दरी कमी होत गेली. पण स्थानिक मिशिनरी लोकांनी भय्याजी यांच्या कार्यात खूप अडथळे आणले. कित्येकदा तर जीवावर बेतले. असा विरोध, राग, द्वेश, उपेक्षा,  अडथळ्यांना पार करता करता कालांतराने भय्याजींनी चिकाटीने अंतिम  ध्येय साध्य केले.  एका खोलीत लावलेले  शाळेचे छोटेसे रोपटे "ओजाशंकर"  विद्यालयाच्या रूपात वटवृक्ष होऊन डवरले... बहरले! त्या छायेत अनेक विद्यार्थी शिकून धन्य झाले.   

    भय्याजींनी सातत्याने घेतलेल्या मेहनतीने हळूहळू मणिपूर परिसरात भय्याजींचे शिक्षण कार्य विस्तारत गेले. त्यांच्या  कल्पनेतली शाळा दिमाखदार इमारतीच्या रूपात  ऊभी राहिली. आणखी दोन तीन छोट्या शाळा परिसरात सुरू झाल्या.  नंतर विद्यार्थी संख्या वाढून  दहावी पास विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेस बाहेर पडल्या. पुढच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून  विविध शहरांमध्ये विद्यार्थी वसतीगृहे बांधली गेली. सध्या आठ शहरात अशी वसतिगृहे असून ही संख्या वाढवण्याचे प्रयत्न आहेत. भय्याजींनी दृढ निश्चयाने असे अनेक संकल्प पूर्ण केले.  दृढ निश्चयाची ही वज्रमूठ जशी संघ संस्काराने घट्ट झाली होती; तशीच बालपणी वडिलांकडून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचीही पक्की शिकवण मिळाली होती.  भय्याजींचे वडील दिनकर काणे हे स्वतः एक शिक्षक होते. 

     भय्याजींचा जन्म  दि.६ डिसेंबर १९२४ रोजी नाशिक येथे झाला. पण ते मूळचे कोकणातले. १९४० मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर १९४१ लाते पुण्यात राहायला आले. एस. पी. कॉलेजला इंटर आर्टसला प्रवेश घेऊन सन १९४२ ला संस्कृत विषयात विशेष प्रावीण्यासह पदवीधर झाले.  लगेचच इंडियन एअर फोर्समध्ये ग्राऊंड इंजिनिंरिंग कोअर शाखेत नोकरीत  रूजू झाले. या नोकरीनिमित्त लाहोर, कोलकाता, सिकंदराबाद अशा शहरांमध्ये फिरले. घरापासून दूर राहण्याची त्यांना थोडी सवय झाली. पण लवकरच त्यांनी ही नोकरी सोडून दिली. कारण त्यांना शिक्षकच व्हायचे होते. त्यांचा  शिक्षकी प्रवास  चिपळूण, कर्नाटक, छत्तीसगड या दुर्गम भागातून इशान्येच्या अधिकच दुर्गम भागात पोहचला. विद्यार्थीप्रिय शिक्षक असे उपाधी लाभलेले भय्याजीं यांना  "ज्ञानाचा दिवा " लावण्यासाठी नियतीनेच इशान्येला आणून ठेवले. भारताचा हा पूर्वोत्तर  कोपरा  देशापासून, तुटून वेगळा पडल्यासारखा झाला होता. या तुटल्या धाग्याला उर्वरीत भारताशी जोडण्याचे राष्ट्रीय काम भय्याजींनी प्राणपणाने पार पाडले. जिथे लोक स्वतःला भारताचा भागही मानत नव्हते, तिथे आज भारतीय नागरिक म्हणवून घेण्यात लोकांना अभिमान वाटतोय.  जिथे १५ ऑगस्ट कधीच साजरा होत नव्हता, तिथे आज शाळांध्ये गौरवाने तिरंगा फडकवला जातो. विद्यार्थ्यांसह पालक स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. एकेकाळी मणिपूरला एक एक विद्यार्थी गोळा करून भय्याजींनी शाळा चालवली, तिथे आज स्वतःहून आदिवासी जनजातीचे लोक आपल्या मुलांना शाळेत  दाखल करण्यासाठी धडपडतात. सर्वात मोठा शिक्षणाचा लक्षणीय  फायदा म्हणजे  इथल्या शाळेत शिकून जे विद्यार्थी बाहेर पडतात, ते व्यसनांपासून दूर आहेत. शिकून नोकरी करीत आहेत. शस्त्रांच्या अवैध व्यापाराच्या विळख्यातून मुक्त झाली आहेत. अनेक शाळांच्या भिंतीवर आपण एक वचन वाचले असेल,  "ज्ञानाचा दिवा , जगी लावा.. अज्ञानाचा अंधार दूर व्हावा" , हे वचन फक्त भिंतीवर न राहता मणिपूरींच्या भाळावर लिहिले गेले. एखादे ध्येयस्वप्न  प्रत्यक्ष कृतीत आणून परिवर्तनाचा चमत्कार घडवता येतो, हा विश्वास भय्याजी यांच्या कार्यातून पटतो. 

       राष्ट्र हिताच्या भावनेतला असामान्य कार्याचे कोंदण घालून हि-यासारखे चमकदार करण्याची किमया करणारा भय्याजी काणे नावाचा हा कोणी जादूगार नव्हे तर एक सच्चा देशभक्त होता. मनात पक्क्या केलेल्या ध्येयाला वाहून घेतलेले भय्याजींसारखे समर्पित व्यक्तीमत्त्वं पुढच्या पिढीचे तेजस्वी प्रेरणास्रोत आहे. म्हणून आज "पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या"कार्यात अनेक तरूण-तरूणींनी स्वतःला झोकून दिले आहे.

भय्याजींचे परम शिष्य जयवंत कोंडविलकर यांच्या मार्गदर्शनात भय्याजी काणे  जन्मशताब्दी निमित्त या कार्यकर्त्यांनी 100 शाळा मणिपूरसह ईशान्य भारतात बांधण्याचा  संकल्प सोडला आहे. 

                     भैय्याजींच्या पुण्यस्मृतीस शत शत प्रणाम

- अमृता अरूण खाकुर्डीकर

 पूर्व सीमा प्रतिष्ठान, कार्यकारिणी सदस्य, पुणे.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • अरूंद रस्ते
  • अपूरी साधने
  • गरीबी आणि अज्ञान
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.