कोरोना महामारी येऊन गेली, त्यातील तपशील आता विसरायला लागले आहेत. त्याआधी १०० वर्षांपूर्वी प्लेगची महामारी आली व त्यातील तपशील देखील विस्मृतीत गेले. १९७५ च्या जून महिन्यामध्ये लोकशाहीचा संकोच नव्हे तर निर्घृण हत्या करणारी आणीबाणी लादली गेली आणि आता त्यातील तपशीलही विस्मृतीत चालला आहे व अधिकाधिक धूसरच होत जाणार आहे.
या तीनही घटना समाज जीवनावर व समाज मूल्यांवर आघात करणाऱ्या, जखमा करणाऱ्या आहेत. जखमा भरल्या जातात, येथेही त्या भरल्या जात आहेत. पण जखमेचा व्रण महत्वाचा असतो. तो पुसता येत नाही. तो रहाणे खूप महत्वाचे असते. तो व्रण आपण जपू या.
कोणते व्रण आहेत हे?, त्या संकटकाळात जी मूल्ये जपली गेली, ती मूल्ये म्हणजे त्या दुर्दैवी जखमेचे व्रण!
प्लेगच्या साथीतील इंग्रजी अत्याचाराची जखम आता भरली आहे. पण, त्यातून जे देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटले, ते चापेकर बंधूंच्या स्मरणाने, “गोंद्या आला रे!” च्या गजराने आजही जिवंत आहे आणि हे व्रणच जिवंत ठेवायचे असतात. तपशीलाची फोलपटे कालौघात उडून गेली तरी चालतात. पण लोकमान्य टिळक, चापेकर बंधु, पुण्याचे इंजिनियरिंग कॉलेज, तेथे बनवलेली गोळी हे व्रण स्मरणात ठेवायचे असतात.
कोरोना, त्याचे रौद्र रूप, मृत्यूचे थैमान ही जखम झाली. त्याचे तपशील विसरले जातील, जायलाच हवेत पण, स्मरणात व्रण रहाणार आहेत, त्यातून जन्माला आलेली मूल्ये आठवायची आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची तात्विक जाणीव जगाला झाली. ‘वयं पंचाधिकं शतम्’ चे व्यावहारीक वर्तन जगातील मोठ्या अविकसित भागाला लशी पुरवून भारताने दाखवले, ती मूल्ये जागवावी लागतात.
या दोन्ही जखमा अस्मानी होत्या, पण भारतातील लोकशाहीचे दमन ही जखम सुलतानी होती. त्याच्याही तपशीलाच्या जखमा भरत आहेत, भरल्याही आहेत. पण यातील मूल्ये रूपी व्रण मात्र तळहाताच्या फोडासारखे जपायचे आहेत.
भारतातील लोकशाही ही अडाण्यांची कोकरागत चालणारी लोकशाही आहे, हा पाश्चिमात्य व पुढारलेल्या देशांचा भ्रम भारतीय जनतेने उडवून लावला, हे मूल्य जपायचे आहे.
समाजातील संघर्षक्षम घटकांनी संघर्ष केलाच केला आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण आम्ही, समाजानेच करायचे आहे हे मूल्य अधोरेखित केले, ते जपायचे आहे.
शंभर कोटी जनता रस्त्यावर येत नाही, पण ती मृतप्राय नसते. ती दबा धरून बसलेली असते आणि पहिली संधी मिळाल्याबरोबर तिचा स्फोट होतो. १९७७ च्या निवडणुकीत भारतीय जनतेने दाखवून दिले की, लोकशाही मूल्यांचे रक्षण मतपेटीतून करू. अन्याय, अत्याचार व हुकूमशाही याचा बिमोड आम्ही करू. हे ते मूल्य, जे सतत स्मरणात ठेवावे लागणार आहे.
लोकशाही ही परकीय देणगी नाही तर, भारतीयांचा सहज स्वभाव आहे हे मूल्य, हे व्रण स्मरणात ठेवायचे आहेत.
संविधानामधील ‘We, the people’ याचा खरा अर्थ जगणाऱ्या भारतीय समाजाने हे मूल्य १९७५ ते १९७७ या काळातील हुकूमशाहीविरोधी लढ्यातून व निवडणुकीतील मतदानामधून सिद्ध केले, ते स्मरणात ठेवावे लागणार आहे.
आणीबाणीविरूद्ध समाजातील सामान्य घटकांनी सर्वस्व गमावून जो संघर्ष केला, त्यातच या लढ्याच्या यशाचे गमक आहे. आणीबाणीविरूद्धचा संघर्ष एका वाक्यात वर्णन करता येईल. संपूर्ण भारताने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक भारतीयाला बरोबर घेऊन, भारतावरील, मानवी स्वातंत्र्यावरील आणीबाणीरूपी सुलतानी संकट परतवून लावले.
जखमा विसरू या पण, व्रण मात्र जपू या ... पुढील काळातील एखाद्या संकटात ते दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शन करतील.
====