शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाले आहे. चैतन्याने बहरलेल्या सृष्टीत आपण समरसून हा सोहळा साजरा करतो. या नवरात्री उत्सवात आपल्याला यंदा दिव्यदुर्गा भेटणार आहेत...
निसर्गतः किंवा अन्य काही कारणाने दिव्यांगत्व आले असले तरी त्याची कमतरता न मानता न्युनत्वावर मात करत आपल्या उच्च मनोबलाच्या आधारे पराकोटीचे असामान्य कर्तृत्व अनेक महिलांनी सिद्ध केले आहे. ज्ञानाचे भांडार असलेल्या, आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या , इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या शक्तीची पूजा करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा दिव्यदुर्गांचा जागर ...

सरला नामदेव मोहळकर
अहिल्यानगर महानगर पालिका येथे दिव्यांग विभागात लिपिक म्हणून कार्यरत.
कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक न्यूनता असणे, काही कारणाने न्यूनता येणे माणसाच्या हातात नसते. जन्माला आल्यावर वयाच्या दुसऱ्याच वर्षी पोलिओ असल्याचे निदान झाले. खेळण्या बागडण्याच्या वयात जाणवत असलेली उणीव मात्र जीवनात खूप काही शिकवून गेली. सरलाताई अगदी मनापासून लहानपणापासूनचा प्रवास उलगडत होत्या. जीवनाचे विविध टप्पे साकारत असताना आशेचे किरण सतत शोधात राहिले, जे सकारात्मक वाटले ते टिपत राहिले. आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा सतत मनाच्या गाभाऱ्यात तेवत ठेवली. आज कोणीतरी माझा हा प्रवास विचारला याचेच अप्रूप आहे. सरलाताई भरभरून बोलत होत्या.
सरला मुकुंद हजारे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यातून तिसरी मुलगी झाली. मी नकोशी होते हे सरला ताई सांगत असताना अंगावर काटा आला. आज आपण इतक्या सुधारणा पाहतो आहे. पण समाजाची मानसिकता अजूनही मुलगा पाहिजे यात अडकलेली आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला. परिस्थितीमुळे आईने शिक्षण घेतलेले नव्हते. पण काळाची गरज ओळखून समाजशिक्षणातून त्याविषयी तिच्या मनात सजगता होती; त्यामुळेच तिने मला दहावीपर्यंत शिक्षण दिले. खूप इच्छा असूनही घरच्या परिस्थितीने शिकता आले नाही.
त्यानंतर मात्र त्यांचा लढा सुरु होता. मी लहान मोठी नोकरी करत स्वतःचे शिक्षण एम.ए. पर्यंत पूर्ण केले. शिक्षणच आपल्या विकासाला आवश्यक गोष्ट आहे याची जाणीव मला माझे गुरु बापट सर यांनी करून दिली होती. ते शिक्षणाचे धडे गिरवीत मी आता अहिल्यानगर महापालिका इथे लिपिक पदावर काम करते. बोलता बोलता सरलाताई भरभर जीवनाची पाने उलटत होत्या.
सर्व अवयव शाबूत असणाऱ्या एका माणसाने माझ्याशी लग्न केले; कारण त्यांना आधीच्या पत्नीपासून मूल नव्हते आणि त्यांना मूल हवे होते. माझी तुलना एक चांगल्या स्त्री बरोबर करण्यात आली. त्यातून येणारे प्रत्येक आव्हान मी स्वीकारले. प्रत्येक गोष्ट करून दाखवली. सवतीचा विरोध मला घडण्यासाठी खूप मोलाचा ठरला.
सध्या मी कायदे विषयक शिक्षण घेत आहे.समाज कार्याची मला आवड असून दिव्यागांसाठी काम करण्याची इच्छा आहे. हेल्पिंग हँड संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रश्न जवळून पाहत आहे. ते सोडविण्याचा मानस आहे.माझ्या मुलींसमोर स्वतःची काहीही चूक नसताना कुटुंब,समाजात कमी लेखले गेले तरी आई म्हणून एक आदर्श उभा करावा वाटला. माझे हे घडणे दिव्यांग असल्यानेच शक्य झाले आहे.सरला ताईंचा हळवा कोपरा शब्दाशब्दातून व्यक्त होत होता. ताईंच्या कार्याला,सहनशीलता आणि महत्त्वाकांक्षेला त्रिवार वंदन.