शिकागोच्या व्यासपीठावर घुमलेला भारतीय संस्कृतीचा स्वर

११ सप्टेंबर १८९३ हा भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय असा दिवस आहे. या दिवशी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या ‘वर्ल्ड्स पार्लमेंट ऑफ रिलिजन्स’ अर्थात जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या सनातन आध्यात्मिक परंपरेचा आणि हिंदू धर्माच्या उदात्त विचारांचा परिचय जगाला करून दिला. या व्याख्यानाने उपस्थित श्रोत्यांची मने तर कायमची जिंकलीच पण भारतीय संस्कृतीकडे पाहण्याची जगाची समग्र दृष्टीही बदलण्यास मोठी मदत झाली. हा ऐतिहासीक क्षण अजरामर झाला.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात “Sisters and Brothers of America” या शब्दांनी केली. या संबोधनातच त्यांच्या विचारांचे वैशिष्ट्य दडलेले होते. श्रोत्यांना ‘स्त्री-पुरुषांनो’ किंवा ‘महिला व सज्जनहो’ असे औपचारिक संबोधन वापरण्याचा प्रघात त्या काळी होता. पण ते शब्द न वापरता " बंधु आणि भगिनींनो " हे शब्द वापरून त्यांनी सर्व श्रोत्यांची मने जिंकली.
त्यांनी संपूर्ण मानवजातीला एका कुटुंबाचे सदस्य मानले. त्यांच्या या आत्मीय संबोधनाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दीर्घकाळ टाळ्यांचा कडकडाट झाला.
विवेकानंदांनी आपल्या भाषणातून हिंदू धर्माची सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा स्पष्ट केली. भारताने जगातील विविध धर्मांच्या अनुयायांना आश्रय दिला, हे त्यांनी अभिमानाने सांगितले. हिंदू धर्म केवळ एका विशिष्ट मार्गालाच सत्य मानत नाही, तर विविध मार्गांनी परमसत्याकडे जाता येते, असा व्यापक दृष्टिकोन तो स्वीकारतो, असे त्यांनी मांडले. “सर्व धर्म सत्याच्या शोधाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत,” हा विचार त्यांच्या भाषणाचा गाभा होता.
त्यांनी धार्मिक कट्टरता, संकुचितपणा आणि परस्पर द्वेष यांच्यावरही कठोर प्रहार केला. हजारो वर्षांच्या धार्मिक संघर्षांमुळे मानवतेचे मोठे नुकसान झाले आहे. धर्माच्या नावावर होणारा द्वेष आणि हिंसा संपून परस्पर आदर, सहिष्णुता आणि बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे त्यांचे भाषण केवळ हिंदू धर्माची ओळख करून देणारे नव्हते, तर संपूर्ण मानवजातीला शांतता आणि ऐक्याचा मार्ग दाखवणारे होते.
या भाषणामागे भारताच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा आत्मविश्वास होता. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते आणि पाश्चात्त्य जगात भारताबद्दल अनेक गैरसमज होते. अशा परिस्थितीत एका भारतीय संन्याशाने परदेशातील प्रतिष्ठित व्यासपीठावर उभे राहून भारतीय विचारांची ताकद अत्यंत आत्मविश्वासाने मांडली. त्यामुळे भारतीयांच्या मनातही आपल्या संस्कृतीबद्दल नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली.
शिकागोतील भाषणाचा प्रभाव पुढील काळात दूरवर जाणवला. स्वामी विवेकानंदांनी जगाला भारताची आध्यात्मिक ओळख करून देतानाच भारतीयांना आपल्या राष्ट्राच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. धर्म, भाषा, जात, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन मानवतेला केंद्रस्थानी ठेवणे, विविधतेचा आदर करणे आणि परस्पर सहकार्याने जगणे हीच त्यांच्या शिकवणीची खरी दिशा आहे.
११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोच्या व्यासपीठावर उमटलेला स्वामी विवेकानंदांचा आवाज हा केवळ एका संन्याशाचा आवाज नव्हता; तो भारताच्या आत्मविश्वासाचा, सहिष्णुतेचा आणि विश्वबंधुत्वाच्या उदात्त विचारांचा स्वर होता. म्हणूनच त्यांचे शिकागो भाषण भारतीय इतिहासातील एक प्रेरणादायी आणि युगप्रवर्तक घटना म्हणून सदैव स्मरणात राहील