•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

मधुभाई कुलकर्णी: संघजीवनाचा आदर्श

विश्व संवाद केंद्र - पुणे 30 days ago
भाष्य   व्यक्तिविशेष  

मधुभाई कुलकर्णी: संघजीवनाचा आदर्श

मधुभाईंनी एकाच ‘निरंजनाची’ आराधना केली. ते निरंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तरुण वयात भुलवणार्‍या असंख्य विचारधारा होत्या, पण मधुभाईंनी आपले चित्त संघनिरंजनापासून ढळू दिले नाही. गोरखनाथ यांच्या भजनातील शेवटच्या चरणात ते म्हणतात, ‘मै ज्योति में ज्योत मिलाउँ जी’. मधुभाईंनी आपली जीवनज्योत संघज्योतीत एकरूप केली आहे.

संघजीवन कसे जगायचे, याचा महान आदर्श ठेवून मधुभाई कुलकर्णी पंचतत्त्वांत विलीन झाले आहेत. जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक, पुणे महानगर प्रचारक, गुजरात प्रांत प्रचारक, गुजरात-महाराष्ट्र-विदर्भ या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य असा त्यांच्या संघदायित्वाचा प्रवास आहे. संघाबाहेरील व्यक्तीला ही संघदायित्वे काय असतात, याचे वरील शब्दांतून आकलन होणे कठीण आहे. प्रचारक याचा अर्थ ज्याने गृहत्याग केला आहे, जो अविवाहित आहे, त्याने आपले संपूर्ण जीवन संघाला समर्पित केले आहे, संघ सांगेल ते दायित्व म्हणजे जबाबदारी पार पाडणे अशी ज्याची मनःस्थिती असते, ज्याची व्यक्तिगत संपत्ती शून्य असते, त्याला प्रचारक म्हणतात. पारंपरिक भाषेचा उपयोग करायचा तर हा संन्यास धर्म आहे. परंतु भारतातील काही संन्यासी भगव्या वस्त्रांत असले तरी मठ आणि मठाच्या कोट्यवधी संपत्तीचे मालक असतात. प्रचारक हा संपत्तीच्या दृष्टीने शून्य असतो, मधुभाई तसे होते.

आपल्या प्रचारकी जीवनात मधुभाईंनी प्रचारक धर्माचे आदर्शवत पालन केले. प्रचारक धर्मात अत्यंत मृदू भाष्य, सर्व स्वयंसेवकांशी आत्मीय संबंध, त्यांच्या सुखदुःखात दुधात साखर जशी विरघळून जाते त्याप्रमाणे समरस होणे, प्रत्येकाची कार्यक्षमता ओळखून त्याच्या आंतरिक शक्तीचा विकास घडवून आणणे, संघकार्याचे म्हणजे राष्ट्रकार्याचे यथोचित दायित्व त्याच्याकडे देणे, असे सगळे भाग येतात. हे काम अतिशय शांतचित्ताने, कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या सर्व माध्यमांपासून हजारो हात दूर राहून करण्याचे कार्य आहे. एखाद्या विशाल वृक्षाचे बीजारोपण होते आणि मग तो क्रमाक्रमाने वाढत जातो. वाढता-वाढता त्याची एक पूर्ण विकसित अवस्था निर्माण होते. अशा बीजाचे प्रारंभीच्या काळात अतिशय जागरूकतेने भरणपोषण करावे लागते. मधुभाईंनी आपल्या प्रचारकी जीवनात अशी किती बीजे संगोपित केली असतील याची गणती करणे अवघड आहे.

या ठिकाणी एका संस्कृत सुभाषिताची आठवण येते. तो सुभाषितकार धो-धो पावसाला उद्देशून म्हणतो, “हे पर्जन्यराजा, तुझे बरसणे सुखकारक असले तरी रखरखीत उन्हाळ्यात बीजाचे रक्षण करण्यात एका माळ्याने जे कष्ट घेतले ते तुझ्यापेक्षाही महान कार्य आहे.” आज संघ शताब्दी वर्षात संघप्रशंसेचा धो-धो पाऊस पडतो आहे. तो आनंददायी आहे हे खरे आहे, परंतु संघाच्या अतिशय कष्टदायक कालखंडात मधुभाईंसारख्या प्रचारकांनी स्वतःच्या रक्ताने आणि घामाने जे बीज अंकुरत ठेवले, त्याची महानता या प्रशंसेपेक्षा मोठी आहे.

संघगीताची एक ओळ आहे, ‘सिंच रहे है अगणित माली’. मधुभाईंची गणना रखरखीत उन्हात संघबीजाचे संवर्धन करणाऱ्या सिंचनकारांमध्ये आहे. त्यांच्या परलोकगमनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतांतील किती हजार घरांमध्ये शोककळा पसरली असेल हे सांगणे अवघड आहे. आपल्या महान दर्शनकारांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हे अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे. जन्माला आल्यानंतर स्वतःसाठी जगायचे आहे हे कुणाला शिकवावे लागत नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार तशी धावपळ करीतच असतो. परंतु या जगण्यात जीवनाची सार्थकता नाही. जीवनाची सार्थकता ‘परोपकाराय पुण्याय’ यात आहे आणि त्यातही आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित करण्यात जीवनाची सर्वश्रेष्ठता आहे. मधुभाईंनी तसे जीवन जगून तसा आदर्श ठेवला आहे.

गोरखनाथांचे एक भजन आहे, ‘गुरूजी मै तो एक निरंजन ध्याऊँ जी। दूजे के संग नहीं जाऊँ जी।’ याचा अर्थ होतो, गुरूजी, मी एकाच निरंजनाची आराधना करीन, माझे चित्त दुसरीकडे अजिबात जाणार नाही. मधुभाईंनी एकाच ‘निरंजनाची’ आराधना केली. ते निरंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तरुण वयात भुलवणार्‍या असंख्य विचारधारा होत्या, पण मधुभाईंनी आपले चित्त संघनिरंजनापासून ढळू दिले नाही. गोरखनाथ यांनी हे भजन त्यांच्या गुरूंना उद्देशून लिहिले आहे. मधुभाईंची पिढी परमपूजनीय श्री गुरुजींच्या विशाल, आल्हाददायी, कर्तव्याभिमुख करणाऱ्या छायेखाली वाढलेली आहे. प्रचारकांचे वैचारिक, आध्यात्मिक, कर्तव्याभिमुख भरणपोषण करण्याचे कार्य श्री गुरुजींनी आपल्या दिव्य वाणीने केलेले आहे. याच भजनातील शेवटच्या चरणात गोरखनाथ म्हणतात, ‘मै ज्योत में ज्योत मिलाउँ जी’. मधुभाईंनी आपली जीवनज्योत संघज्योतीत एकरूप केली आहे.

म्हणून त्यांचे जाणे केवळ पार्थिवाचे जाणे आहे. मनुष्यदेह हा पंचमहाभूतांचा बनलेला असतो. देहातून ज्योत गेली की राहिलेला देह पंचमहाभूतात विलीन होतो असे विज्ञानही आहे आणि श्रद्धाही आहे. ज्योतीरूपाने मधुभाई अमर आहेत. संघज्योतीत जीवनज्योत विलीन झाली की, तिचे अस्तित्व संपत नाही, तर ती संघज्योतीच्या रूपाने प्रकाशमान असतेच आणि ऊर्जा नित्य संक्रमित करणारी असते. या महान जीवनज्योतीस विनम्र अभिवादन करणे एवढेच आपल्या हाती आहे आणि त्यांच्या जीवनप्रकाशात आपली वाटचाल करणे आपल्या हातात आहे.

(साभार साप्ताहिक विवेकचा डिजीटल प्लॅटफॉर्म) 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • मधुभाई कुलकर्णी
  • प्रचारक
  • संघ
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.