पूर्वीच्या काळी घरोघरी हा श्लोक ताटावर बसल्यानंतर म्हटला जाई. तो नुसताच म्हटला न जाता त्याप्रमाणे वागले पण जात होते. वरील चार ओळींतील शेवटची ओळ अत्यंत महत्वाची आहे. उदरभरण नोहे म्हणजेच भोजन हे केवळ पोट भरणे नसून जठराग्नीची केलेली ती एक पूजा आहे. आणि म्हणूनच त्याला 'यज्ञकर्म' असे म्हटलेले आहे. देवाची पूजा करताना ती आपण किती मनोभावे करतो, मग पोटपूजा' ती अशी घाई-गडबडीत का करावी? ती सुद्धा मनोभावे झाली पाहिजे. म्हणूनच आपल्या भारतीय आरोग्य शास्त्रात म्हणजेच आयुर्वेदात आहार-विधीचे अगदी विस्तृत वर्णन वाचायला मिळते. आहार कसा कोणता, कधी व केव्हा घ्यावा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आयुर्वेदातून मिळतात. सामान्यपणे कोणताही मनुष्य त्याला एखादाआजार झाल्याशिवाय दवाखान्याची पायरी चढत नाही. परंतु तो हा विचार करतो का, की, 'मी आजारी का पडतो? ही वेळ माझ्यावर का आली? सामान्यपणे येणारे एक उत्तर असतं ते म्हणजे 'काही नाही हो, इन्फेक्शन झालंय.' मग पुढे जाऊन आपण म्हणूया की मग इन्फेक्शन कशानी झालं? उत्तर एकच ते म्हणजे 'अपथ्य आहार विहार'. चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार.
सामान्यतः पथ्य कडक पाळावे लागतात म्हणून आयुर्वेदीक औषधे घेण्याचा कंटाळा सर्वसामान्य लोकांकडून नेहमीच होतो. हे पथ्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? त्यामागील आयुर्वेदाचा दृष्टीकोन काय आहे? 'पथ्य' म्हटल्यावर केवळ 'विशिष्ठ अन्नाचा त्याग'च अपेक्षित आहे की, पथ्यात 'विशिष्ठ अन्न सेवन' ही असते. असे प्रश्न अनेकांना नेहमीच पडत असतात. त्याची उत्तरे शास्त्रात शोधण्याइतका वेळ दुदैवाने ते देऊ शकत नाहीत. म्हणूनच अशा जिज्ञासू व्यक्तीसाठी आहाराबाबत आयुर्वेद काय सांगतो त्याचा उहापोह आपण करणार आहोत.
सर्व व्याधींचे कारण शरीर-मनातील माडलेली वाढलेली उष्णता
अनेक आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सुरुवातीपासूनच्या धड्यांमध्ये रोगांचे वर्णन न करता आहार, दिनचर्या ऋतुचर्या आदींचे वर्णन केलेले आहे. यावरूनच आहाराचे महत्व लक्षात येते. म्हणजेच ग्रंथकारांचे असे म्हणणे आहे की आपण जर योग्य आहार, योग्य वेळी व योग्य प्रमाणात घेतला तर स्वाभाविकच आपले शरीर हे निरोगी राहील व आपल्याला कुठलीही व्याधी होणार नाही. 'दोषधातुमलमूलं ही शरीरम्' म्हणजेच तीन दोष, सात धातू व तीन मल यांपासून आपला देह तयार झाला आहे. या तीन गोष्टी जेव्हा समावस्थेत असतात तेव्हा शरीर स्वस्थ असतं आणि जेव्हा त्यांचा समतोल बिघडतो, तेव्हा शरीर अस्वस्थ म्हणजेच व्याधीग्रस्त होतं. सर्व रोगांची उत्पत्ती ही ज्वरातून म्हणजेच तापातून झालेली आहे. ह्यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे देह संताप व दुसरा मन संताप. ज्वराच्या उत्पत्तीबद्दल पुढील श्लोक सर्व काही सांगतो. तो असा:
म्हणजेच मिथ्या (चुकीचा) आहार-विहारामुळे वात, पित्त व कफ हे तीन दोष आमाशयात (डायजेस्टीव्ह सिस्टिममध्ये) राहून जठराग्नीला बिघडवून सर्व शरीरात उष्णता वाढवतात. यावरूनच अनुमान काढता येते की, योग्य आहाराला किती महत्व आहे. खरं म्हणजे प्रत्येक रोगाची पॅथालॉजी ही वेगवेगळी आहे मात्र त्याची उत्पत्ती वा त्यांची कारणं शोधली तर ती आहार- विहाराभोवतीच फिरताना आपल्याला दिसतात. शरीरातील तीन दोषांपैकी फक्त वाताचे ८० विकार, पित्ताचे ४० विकार आणि कफाचे २० विकार होत, म्हणजेच वातदोष व पित्तदोषच मुख्यतः आजाराला कारणीभूत होतात. कफदोष हा शरीराचे बल असल्यामुळे त्याने कमी विकार संभवतात. कारण म्हटलेच आहे-
"प्राकृतस्तु बलं श्लेष्मा, विकृतो मल उच्यते !"
सर्वसाधारणपणे उलट सुलट खाण्यात आले की अजीर्ण होते. यामध्ये पोटात दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, सतत झोप येणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणे मुख्यतः दिसतात. यावरील पहिला उपाय आपणा सर्वांना माहिती असतो. तो म्हणजे लंघन करणे. त्यादिवशी आपण एकदम हलका आहार तरी घेतो वा पोटाला पूर्णतः विश्रांती तरी देतो. म्हणजेच उपाय आपल्याला ठाऊक असून देखील आपल्याकडून चुका ह्या घडत जातात. मग आपल्याला तो रोग बरा करण्यासाठी वैद्याची वा डॉक्टरांची गरज भासते. ती गरज सतत भासू नये यासाठी प्रत्येकाने आपला दैनंदिन आहार कसा ठेवावा? त्याची योजना कशी करावी? आहार कशाप्रकारे घ्यावा? आणि काही छोट्या-मोठ्या रोगांवर आहारीय औषधे कोणती घ्यावीत? ह्याबद्दल थोडक्यात पण महत्वाची अशी माहिती आता आपण बघणार आहोत.
काय खावे, व काय खाऊ नये?
सामान्यतः आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात तिखट, आंबट आणि खारट (कटु, आम्ल, लवण) ह्याच चवीचे पदार्थ अधिक करून असतात. कडू, तुरट व गोड (तिक्त, कषाय, मधूर) ह्या चवींना आपल्या आहारात जवळजवळ स्थानच नसते. देवाला सुद्धा षड् रस अन्नाचा नैवेद्य दाखवावा. असे धर्मात सांगितले आहे. मग या षड् रसांचे नित्यसेवन आपण नको का करायला ? "भारतीय चौरस आहार' अशी आपली जगात ओळखच ह्या सहा रसांमुळे आहे. तिखट, आंबट व खारट या रसांच्या अधिक सेवनामुळे शरीरातील तीनही दोष बिघडतात. पैकी वात आणि पित्त हे अधिक बिघडतात व ८०% रोगांना कारणीभूत ठरतात आणि कफ दोषाचा क्षय होऊन शरीरबल कमी होते. कारण, प्राकृत कफ हा शरीराचे बल आहे. त्यामुळे पुढे काही सामान्य पथ्य व अपथ्यांची यादी दिलेली आहे. ती सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. पथ्य व अपथ्याचा अर्थ प्रथम पाहू. पथ्य ह्याचा अर्थ विशिष्ठ अन्नसेवन तथा विशिष्ठ विहार आणि अपथ्य म्हणजे विशिष्ठ अन्नाचा त्याग अर्थात काय खाऊ नये? कसे वागू नये. थोडक्यात सांगायचे तर, रुग्णास उपयोगी ते पथ्य व रोगास उपयोगी ते अपथ्य होय.
सामान्य पथ्यापथ्य
पथ्य : (आवर्जून खावे)
अपथ्य (टाळावे / अल्प खावे)
ही झाली रोजच्या आहाराची यादी. पण हा आहार कोणत्या वेळी घ्यावा? त्याच्याही वेळा निश्चित कराव्यात, साधारणपणे,
अशा वेळांची लोकांना सवय नसते. परंतु अजूनसुद्धा अनेक खेड्यांमध्ये अशाच पद्धतीने आहार घेतला जातो आणि म्हणूनच ती लोकं सुदृढ आणि निरोगी असतात. शहरातील लोकांच्या तुलनेने ती फारच कमी आजारी पडतात. म्हणून प्रयत्नाने सर्वांनी अशा पद्धतीची योजना हळूहळू मात्र निश्चित करावी.
कसे खावे, व कसे खाऊ नये?
आहार कशाप्रकारे घ्यावा ह्याचे वर्णन आयुर्वेदातील चरक संहिता ह्या ग्रंथामध्ये खूपच सोपे व सहज समजण्यासारखे आहे. ग्रंथकार म्हणतात -
(१) उष्णं अश्नीयात् म्हणजे भोजन हे गरमच (उष्ण) असायला हवे. त्यामुळे ते स्वादिष्ट लागते, जठराग्नि प्रदीप्त करते, लवकर पचते, वायूची गती सुरळीत करते. त्यामुळे गरमच जेवण करावे.
२) स्निग्धं अश्नीयात् भोजन स्निग्ध असावे. अर्थात जेवणामध्ये तूप, तेल यांचा वापर - आवश्यक तेवढा करावा. त्यामुळे, शरीर पुष्ट होते, सर्व इन्द्रीय दृढ होतात, अंगात बळ येते, रुपसौंदर्यात भर पडते व शरीरातील कोरडेपणा (रूक्षता) निघून जातो.
३) मात्रावत् अश्नीयात् - "भुकेला दोन घास कमी" असा अर्थ मात्रावत् भोजनाचा होतो. म्हणजेच आकंठ जेऊ नये. मात्रावत् भोजन केल्यास पचन सुलभ होते व मल गुदापर्यंत सुखरूप पोहोचते. त्यामुळे विनाकष्ट पोट साफ होते,
8) जीर्णे अश्नीयात् पूर्वी घेतलेला आहार पचल्यानंतरच पुढील आहार घ्यावा. अजीर्ण अवस्थेत जेवण घेतल्यास पूर्वीच्या न पचलेल्या आहार रसात ते मिसळून तीनही दोषांना बिघडवते व जठराग्नि मंद करते. म्हणूनच आधीचे अन्न पचल्यावरच पुढील अन्न घ्यावे.
(५) इष्टे देशे अश्नीयात् इष्ट देश अर्थात पवित्र, स्वच्छ अशा जागेतच भोजनाचा आस्वाद घ्यायला पाहिजे. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम सहाजिकच मनावर होतो व मग शरीरावर.
६) न अतिवृतं अश्नीयात् अर्थात खूप घाईघाईने भोजन करू नये. असे केल्याने घेतलेले - अन्न नाकात जाऊन अवरोध निर्माण होऊन ठसका लागणे, श्वास कोंडणे असा त्रास होऊ शकतो. घाईत भोजन केल्याने आहार पदार्थांच्या गुण-दोष तसेच चवीची जाणीव पण नीटशी होत नाही.
(७) न अतिविलंबितम् अश्नीयात् - खूप वेळ जेवण करत बसू नये, असे रमत गमत जेवण करणारा मनुष्य तृप्त होत नाही व तो खूप जेवतो. शिवाय अन्न सुद्धा थंड होऊन जाते. आणि अशा भोजनाने अपचन होतेच होते.
(८) अजल्पन्नहसन् तन्मना भुञ्जीत - गप्पा न मारता, न हसता, टी.व्ही. न पाहता केवळ भोजनाकडेच ध्यान लाऊन ते प्रसन्न चित्ताने करावे.
(९) आत्मानं अभिसमीक्ष्य भुञ्जीत - स्वतःची शारीरिक क्षमता ओळखून माझ्या शरीराला - काय अनुकूल आहे? काय अनुकूल नाही? असे आत्मनिरीक्षण करूनच भोजन करावे.
घरगुती उपचार
आता जर रोज आपण अशा पद्धतीने आहार घेतला तर खरंच आपण आजारी पडू का हो ? बहुतांकडून ह्याचं उत्तर नाहीच असं येईल. पण तरीसुद्धा चुकून आपण आजारी पडलोच तर त्याचे उपाय सुद्धा आपल्या घरातल्या घरात आहेतच की! त्याचाही विचार आपण आता करू.
१) सर्दी, खोकला, डोकेदुखी
२) अपचन, गॅसेस, पोटदुखी
३) जुलाब लागणे.
४) उलट्या होणे.
५) चक्कर येणे, घेरी येणे.
हे घरगुती उपाय केवळ आजार छोटा असतानाच करावयाचे असतात मात्र एखादी जीर्ण व्याधी असेल तर त्यासाठी नक्कीच वैद्यांची वा डॉक्टरांची मदत घ्यावी. अस्तु.
तर अशा पद्धतीने आपण आहाराबाबत आत्तापर्यंत जे काही जाणून घेतले त्याचे पालन जर प्रत्येकाने काटेकोरपणे व प्रामाणिकपणे व न कंटाळता केले तर निश्चितच आपल्याला सुदृढ व निरामय आरोग्य लाभेलच तसेच आपले जीवन सुद्धा आनंदी होईल ह्यात शंकाच नाही.
==============
-- आयुर्वेदाचार्य वैद्य ओम्कार धुमाळे
dr_omkarkd@yahoo.com