पुणे, दि. २७ मे २०२६ :
"हिंदू आणि हिंदुत्व या संकल्पना सर्वकालिक आणि वैश्विक आहेत. त्यांना एखाद्या विशिष्ट संप्रदायाच्या संकुचित चौकटीत बसवणे योग्य नाही. आपण नेमके कोण आहोत, या स्वत्वाची जाणीव हिंदूंना झाल्यास समाजातील सर्व प्रकारचे भेदाभेद आपोआप संपुष्टात येतील," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. परकीय आक्रमणांमुळे आपण आपली व्यापक जीवनदृष्टी विसरलो आणि संकुचिततेमध्ये अडकलो. हा विसरलेला पाया पुन्हा मजबूत करून समाजात एकात्मता निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असल्याचेही भैय्य्जी म्हटले.

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे लिखित ‘समाज संघटनेचा वारसा आणि संघ’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवारी (दि. २६) भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात संपन्न झाला. भारतीय विचार साधना प्रकाशनातर्फे आयोजित या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून भय्याजी जोशी बोलत होते. व्यासपीठावर भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप तथा दादा रावत, भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व कार्यवाह काशीनाथ देवडर उपस्थित होते.
भैय्याजी जोशी पुढे म्हणाले, "रमेश पतंगे यांच्यासारख्या कर्मशील व्यक्तीने संघ स्थापनेची एक वेगळी आणि अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकातून केली असून, हे संदर्भ भविष्यात मार्गदर्शक ठरतील. हिंदू हा संप्रदाय नसून ती एक जीवनदृष्टी आहे. त्यावर आधारित ऋषीमुनींनी दिलेली जीवनमूल्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांसाठी एकच आहेत. आपली भाषा, देव, तीर्थक्षेत्रे आणि धर्मग्रंथ हे कोणत्याही जातीने दिलेले नसून ते सर्वांचे सामायिक आहेत. परंतु, 'आम्ही अमुक एका जातीचे' या संकुचित भावामुळे एकसंध असलेला समाज विस्कळीत झाला. संकुचित संकल्पनांमुळे या समाज-इमारतीचे झालेले क्षरण रोखण्याचे काम वेळोवेळी संतांनी केले. तोच वारसा पुढे चालवत डॉ. हेडगेवारांनी संघाच्या माध्यमातून 'आपण सगळे एक आहोत' हा भाव समाजात रुजवला. परस्परपूरकता आणि परस्परावलंबन हाच भारतीय चिंतनाचा पाया असून 'भारतमाता की जय' या एका घोषणेतून सर्व प्रांतीय व जातीय संकुचितता दूर होते. संघ हे समाजापेक्षा वेगळे संघटन नसून तो समाजाचेच अंग आहे."

पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांनी आपल्या मनोगतातून लेखनप्रवासाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने 'आम्ही संघात का आहोत?' हे पुस्तक आले, त्याचाच पुढचा भाग म्हणून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. सामाजिक समरसता मंचाचे काम करताना झालेल्या प्रदीर्घ वाचनातून मला संघकार्याची व्याप्ती आणि खोली समजत गेली. भगवान बुद्धांनी ज्याप्रमाणे भारतीय ज्ञानमार्गाने ज्ञान प्राप्त करून सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले आणि मोजक्या लोकांतून संघ सुरू केला, तसेच साम्य डॉ. हेडगेवारांच्या संघ स्थापनेत दिसते. बुद्धांनी समृद्धीच्या काळात समाजाला 'अथ्थ दीपो भव' (तूच तुझा दिवा हो) हा संदेश दिला. बुद्धांनंतर निर्माण झालेली पोकळी पुढे नाथपंथ, गोरखनाथ आणि वारकरी-धारकरी संप्रदायाने भरून काढली. हाच वैचारिक प्रवास गुरु नानकदेव, स्वामी दयानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. हेडगेवार असा पुढे आला आहे. या संपूर्ण वैचारिक परंपरेचे दर्शन जनमानसाला व्हावे, म्हणूनच या पुस्तकाची निर्मिती केली आहे."
दादा रावत म्हणाले, "आजच्या संघ विचाराचे प्राचीन विचार आणि प्रबोधनयुगातील विचार असे दोन प्रमुख स्रोत आहेत. आपली ही परंपरा वारकरी आणि धारकरी परंपरेमुळेच टिकून राहिली, ज्याच्या बळावर आपल्याला १००० वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष करता आला. हिंदू समाजाला द्रष्टा विचार देणारे महापुरुष लाभल्यामुळेच हिंदू समाज आणि राजकीय हिंदुत्व टिकून आहे. स्वामी दयानंदांनी सुरू केलेला विचार पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शत्रू बोधाच्या अभ्यासाने पुढे नेला. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले, तसेच प्रयोग डॉ. हेडगेवारांनी संघात केले. या सर्व समाजपुरुषांच्या प्रयोगांचा आणि परंपरेचा उत्कृष्ट आढावा रमेशजींनी या पुस्तकात घेतला आहे."
परिचय आणि प्रास्ताविक डॉ. गिरीश आफळे यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह काशीनाथ देवधर यांनी केले, तर मिलिंद भणगे यांनी आभार मानले.
-----------
खूप छान, अप्रतिम आयोजन... भारत माता की जय ????️????????
श्री अक्षयकुमार धुळूगडे
27 May 2026 12:27