महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार करता सोलापूर जिल्ह्याचा इतिहास फार मोठा आणि महत्त्वपूर्ण ठरतो. ज्याप्रमाणे या जिल्ह्याच्या इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाला महत्त्व मिळते, त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील मंदिरे, शिल्पे, मशिदी आणि ख्रिस्ती प्रार्थनास्थळांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. इथले किल्ले, गढ्या, तटबंदी आणि वाडे यांचे स्थान मोठे आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी, वतनदारांनी आणि राज्यकर्त्यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत या जिल्ह्यासाठी योगदान दिले आहे, त्या सर्वांचा इतिहास विचारात घेणे आवश्यक आहे.
लेखक: प्रशांत देशपांडे (मुक्त पत्रकार, लेखक आणि अभ्यासक)

मध्ययुगीन सोलापूर आणि सत्तासंघर्ष
मध्ययुगीन काळात सोलापूर शहरात अनेक ऐतिहासिक घराणी नावारूपाला आली होती. यामध्ये वतनदार म्हणून देशमुख, देशपांडे आणि शेटे यांना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व होते. इ.स. १४९० पर्यंत सोलापूरवर बहामनी साम्राज्याची सत्ता होती. त्यानंतर मात्र बहामनी साम्राज्याचे विकेंद्रीकरण सुरू झाले आणि दक्षिणेत पाच उपशाखा निर्माण झाल्या:
१) बिदरची बिदरशाही
२) वराडची इमादशाही
३) अहमदनगरची निजामशाही
४) विजापूरची आदिलशाही
५) गोवळकोंडाची कुतुबशाही
इ.स. १४८९ मध्ये विजापूरचा सुभेदार युसूफ आदिलशहाने स्वतंत्र आदिलशाहीची स्थापना केली. सोलापूरच्या महत्त्वामुळे या किल्ल्यावर मालकी हक्क मिळवण्यासाठी निजामशहा, आदिलशहा आणि इमादशहा यांच्यात वाद सुरू झाले. यातूनच इ.स. १४९७ मध्ये राज्यवाटणीचा तह झाला आणि सोलापूर निजामशाहीकडे गेले. तरीही सोलापूर जिल्हा आणि किल्ल्यासाठी निजामशाही व आदिलशाही यांच्यात सतत संघर्ष सुरू राहिला. इ.स. १५१० ते इ.स. १५२३ पर्यंत हा संघर्ष चालूच होता. पुढे जवळजवळ चाळीस वर्षे या सत्ता सोलापूरसाठी लढत राहिल्या.
इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरची निजामशाही बुडाली आणि दक्षिणेतील बरेच गड-कोट, किल्ले आदिलशहा व मोगलांनी वाटून घेतले. यामध्ये सोलापूर जिल्हा व किल्लाही विजापूरकरांच्या ताब्यात गेला.
मराठ्यांचे राज्य आणि पेशवाई
औरंगजेब इ.स. १७०७ मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याच्या कैदेत असलेल्या छत्रपती शाहूंची सुटका झाली आणि मोगलांनी त्यांना दिलेल्या भूप्रदेशामध्ये सोलापूर जिल्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. अशा प्रकारे, सोलापूरवर मराठ्यांची सत्ता इ.स. १७०७ पासून सुरू झाली. इ.स. १७०७ ते इ.स. १८१८ या प्रदीर्घ काळात मराठी सत्ता सोलापूर जिल्ह्यात नांदत होती. याच्याही बऱ्याच खुणा सोलापूर जिल्ह्यामध्ये आजही दिसतात.

इ.स. १७१३ पासून पुण्यामध्ये पेशवाई सुरू झाली होती, त्यामुळे पेशव्यांचे सोलापूरमध्ये येणे-जाणे होत असे. मराठी कालखंडात पेशवे आणि निजाम या दोनच सत्तांचा संघर्ष सोलापूरसाठी चाललेला दिसतो. तथापि, किल्ल्यासह सोलापूर बराच काळ मराठ्यांच्या ताब्यात होते. छत्रपती शाहूंच्या ताब्यात अक्कलकोट, पंढरपूर इत्यादी ठाणी होती. नानासाहेब पेशवे आणि माधवराव पेशवे यांचे सोलापूरमध्ये येणे-जाणे होते. पेशवे वाडा ही इमारत सोलापूरमध्ये होती. थोरल्या माधवराव पेशव्यांनी सोलापुरातील माधव पेठ (उर्फ मंगळवार बाजार) वसवल्याचा पुरावा मिळतो. नाना फडणवीससुद्धा सोलापुरात येत असत. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सोलापूर शहर आणि किल्ला पेशव्यांचे फार मोठे स्थान बनले होते.
इंग्रजांनी मराठी राज्य बुडवण्याचा चंग बांधला होता. इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई इ.स. १८१८ साली किल्ले सोलापूरजवळ झाली. याच लढाईत पेशव्यांचा पराभव होऊन महाराष्ट्रात इंग्रजी राज्य आले.
आधुनिक कालखंड आणि स्वातंत्र्य चळवळ
इ.स. १८१८ ते इ.स. १९४७ हा सोलापूरचा आधुनिक कालखंड ठरतो. या काळात इंग्रजांनी सोलापूरवर ताबा तर मिळवलाच, पण शहराचे आधुनिकीकरणही केले. रेल्वे, कापड गिरण्या, विविध सामाजिक व औद्योगिक संस्था, बँका, विमा कंपन्या, दळणवळणाची साधने, दवाखाने, बाजारपेठा इत्यादी क्षेत्रांत इंग्रजांनी चांगली प्रगती केली. यामुळे सोलापूरचा चेहरामोहरा बदलून गेला.
प्रगतीसोबतच इंग्रजांनी काही प्राचीन परंपरांचेही जतन केले. यामध्ये ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांची यात्रा, गणेशोत्सव आणि विविध देवस्थानांच्या परंपरांचा समावेश होतो.

सोलापूरचा गणेशोत्सव आणि मानाचे वाद
मध्ययुगीन काळात वतनदारांना आपापल्या परगण्यात बरेच धार्मिक अधिकार दिले जात असत. गावातील प्रमुख देवतांच्या पूजेचा आणि यात्रेतील विधींचा पहिला मान मुख्य वतनदार म्हणून देशमुख यांना दिला जाई. अशा मान-सन्मानावरून मध्यवर्ती सत्तेकडे अनेक तक्रारी जात असत आणि मोठे दावे दाखल केले जात. गावातच हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जाई, त्यासाठी साक्षी-पुरावे म्हणून अनेक कागदपत्रे (उदा. महजर) तयार केली जात.
सोलापुरातील मान-सन्मानाबद्दल झालेला एक महजर १६ ऑगस्ट १६९० च्या विजापूरहून पाठवलेल्या पत्राद्वारे स्पष्ट होतो. सोलापूर काही काळ निजामशहाच्या अधिकाराखाली होते, त्यामुळे देशमुखांकडील काही कागदपत्रांमध्ये निजामशहाचा उल्लेख मिळतो. संदलापूर (म्हणजेच सोलापूर) परगण्यातील गणेशोत्सवात गणपतीच्या मानावरून देशमुख आणि शेटे यांच्यात वाद होता. परगण्यातील गणपतीचा पहिला मान देशमुखांना होता. त्यासाठी हा महजर तयार झाला होता. पुन्हा झालेल्या न्यायालयीन निर्णयाला सोलापूर परगण्यातील पेठेच्या शेटे यांनी हरकत घेतली आणि गणपतीचा पहिला मान आपलाच आहे अशी तक्रार केली. निजामशहाने या तक्रारीची चौकशी केली आणि तत्कालीन लोकांना बोलावून साक्ष घेतल्या. त्यात देशमुखांचा मान पहिला असल्याचे सिद्ध झाले. आजही गणेशोत्सवात मिरवणुकीत देशमुखांचा गणपती पहिला आणि शेटेंचा (म्हणजेच आजोबा गणपती) गणपती शेवटी विसर्जित होतो.
- शेटेंचा गणपती ते आजोबा गणपती प्रवास
इ.स. १८ व्या शतकात शुक्रवार पेठेतील पेशव्यांचे वतनदार असलेल्या श्री. रामचंद्रपंत शेटे यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. रामचंद्रपंत हे निस्सीम गणेशभक्त होते. त्यांचा हा गणेशोत्सव शुक्रवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानासमोर होत असे. कालांतराने उत्सवाची व्याप्ती वाढू लागली, तेव्हा ब्रिटिश सरकारने संभाव्य धोके ओळखून हा उत्सव बंद करण्याचे प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले.
त्यानंतर इ.स. १८८५ मध्ये शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बसवेश्वर तरुण मंडळ (आजोबा गणपती) ची प्रतिष्ठापना केली. मल्लिकार्जुन शेटे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुन कावळे, संगनबसय्या नंदिमठ, देवबा मंठाळकर, पारकर, मल्लिकार्जुन देशमुख, गणेचारी, आवटे या घराण्यांतील प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेऊन हा गणेशोत्सव पुन्हा सुरू केला. सुरुवातीस शेटे यांच्या घरासमोर आणि नंतर काही वर्षे त्रिपुरांतकेश्वर मंदिरात हा गणपती बसवत होते.
एकदा लोकमान्य टिळक सोलापुरात कै. आप्पासाहेब वारद यांच्याकडे आले असता, श्री. पाटील यांनी त्यांना आजोबा गणपतीच्या उत्सवात आमंत्रित केले. तेथील गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप, मिरवणूक आणि लोकांचा संघटितपणा पाहून टिळकांनी सांगितले की, भारतीय समाजाला एकत्र आणून स्वातंत्र्य चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हे एक चांगले माध्यम आहे. याचाच अर्थ, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना आजोबा गणपतीपासून मिळाली.
सुरुवातीच्या काळात आजोबा गणपती सर्व जाती-धर्मांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जात होते. माणिक चौकातील सुफी संत मगरीबशा बाबा अत्यंत श्रद्धेने गणपतीचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत असत. आजही ही ऐक्याची भावना पाहायला मिळते. या प्रेरणेतूनच लोकमान्य टिळकांनी इ.स. १८९३ मध्ये पुण्यातील केसरी वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव स्वातंत्र्य संग्रामाचे प्रमुख केंद्र बनले.
बसवेश्वर तरुण मंडळ ते श्रद्धानंद समाज -
१८ डिसेंबर १९२६ रोजी थोर हिंदुत्ववादी नेते स्वामी श्रद्धानंद यांची दिल्ली येथे मुस्लिम धर्मांध व्यक्तीने हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संध्याकाळी शुक्रवार पेठेतील सिद्रामप्पा फुलारी, रेवणसिद्ध खराडे, पंचप्पा जिरगे, शंकर शिवदारे, मलप्पा धनशेट्टी, इरय्या कोरे, नागप्पा शरणार्थी, नागप्पा धोत्री इत्यादी मंडळी त्रिपुरांतकेश्वर मंदिरात एकत्र जमली आणि त्यांनी बसवेश्वर तरुण मंडळाऐवजी 'श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती' असे नामकरण केले.

या कार्यकर्त्यांनी केवळ गणेशोत्सव साजरा न करता विविध सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतले. तरुणांमध्ये देशप्रेम आणि धर्मप्रेम जागृत व्हावे यासाठी त्यांनी स्वसंरक्षणार्थ लाठी, तलवार, दांडपट्टा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आणि कुस्त्यांचे धडे दिले. देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून त्यांना संघटित केले. परंतु काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी श्रद्धानंद समाजाच्या कार्यावर बंदी आणली आणि सर्व कागदपत्रे जाळून टाकली.
६ मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. ही बातमी वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली. वातावरण तणावपूर्ण झाले, बाजारपेठा बंद झाल्या आणि कडकडीत हरताळ पाळला गेला. शहरात ठिकठिकाणी तिरंग्यासह मोर्चे काढण्यात आले.
मिठाचा सत्याग्रह आणि जंगल सत्याग्रहाच्या धर्तीवर सोलापुरात काहीतरी करावे असे श्रद्धानंद समाजाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले. यात पंचप्पा जिरगे, रेवणसिद्ध खराडे, बाबूराव कावळे, इरय्या स्वामी, विठ्ठल वडापूरकर आणि सिद्रामप्पा फुलारी यांच्यासह ३०-३५ तरुण कार्यकर्ते होते. त्यांनी रुपाभवानीजवळील शिंदीची झाडे तोडण्याची कल्पना मांडली. ६ मे रोजी १४ कमानीजवळील ६० ते ७० झाडे तोडून सत्याग्रह केला.
८ मे १९३० रोजी वातावरण अधिक स्फोटक झाले. मिरवणुका निघाल्या, आंदोलने झाली. 'वंदे मातरम्,' 'भारत माता की जय,' 'महात्मा गांधीजी की जय' अशा घोषणांनी सोलापूर दुमदुमून गेले. रुपाभवानी परिसरात गर्दी वाढू लागली. पोलिसांनी हवेत गोळीबार करण्याचा आदेश दिला, तरीही जमाव शांत झाला नाही. त्यांनी दगड-विटांचा वर्षाव सुरू केला. त्यावेळी एक तरुण राष्ट्रीय निशाण घेऊन पुढे धावला, तेव्हा सार्जंटने गोळी झाडली आणि तो जागेवरच धारातीर्थी पडला. तो होता सोलापूरचा पहिला हुतात्मा शंकर शिवदारे.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, जमाव अधिकच भडकला. मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ जमाव संतप्त झाला. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मल्लप्पा धनशेट्टी यांनी पुढे होऊन कलेक्टर व इतर दोनशे पोलिसांचा जीव वाचवला.
९ मे ते १२ मे या काळात सोलापूर शहर पोलीसमुक्त होते, तरीही जनता शांत झाली नव्हती. गोळीबाराने त्यांची माथी भडकली होती. श्रद्धानंद समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस चौक्या जाळल्या, पोलिसांना मारहाण केली आणि सरकारी साहित्याची नासधूस केली. कोर्टाला आग लावण्यात आली. इंग्रज अधिकाऱ्यांच्या अविचारी वागण्यामुळे सोलापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरने चार दिवस स्वातंत्र्य अनुभवले, हा एक मोठा इतिहास आहे.

मार्शल लॉ आणि हुतात्मे
१९३० मध्ये देशात एकमेव मार्शल लॉ सोलापुरात लावला गेला. स्वातंत्र्य चळवळीतील हे सोलापूरचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. या काळात श्रद्धानंद समाजाचे व्यवस्थापक कै. मल्लप्पाकाका धनशेट्टी यांच्यासह कै. जगन्नाथ शिंदे, कै. श्रीकिसन सारडा आणि कै. कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांना फाशीची शिक्षा झाली. कै. सिद्रामप्पा फुलारींसह अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले.
श्रद्धानंद समाजाचे पुनरुत्थान
१९३० मध्ये लष्करी कायद्याचा अंमल झाल्यावर समाजाचे काम थंडावले. परंतु इ.स. १९३७ मध्ये कै. सिद्रामप्पा फुलारी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सलग ७२ तास काठी फिरवून विखुरलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणले आणि श्रद्धानंद समाजाच्या कार्याला नवी दिशा दिली.
सिद्रामप्पा फुलारी, पंचप्पा जिरगे, रेवणसिद्ध खराडे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह शुक्रवार पेठेतील युवकांनी १९४२ मध्ये श्रद्धानंद तालीम ची स्थापना केली. या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीचे कार्य स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत जोमाने सुरू राहिले. श्रद्धानंद समाजाने हैद्राबाद मुक्ती संग्रामातही मोलाची कामगिरी बजावली. आजही शुक्रवार पेठेत ही तालीम पाहायला मिळते. थोडक्यात, शुक्रवार पेठ हे सांस्कृतिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते.
स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान -
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही श्रद्धानंद समाजाने राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्वासाठी मोठे कार्य केले. कै. सिद्रामप्पा फुलारी, कै. माधवराव दीक्षित, कै. अंबण्णा शेडजाळे यांच्यासारख्या युवकांनी स्वसंरक्षणासाठी लाठी, तलवार, दांडपट्टा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आणि कुस्त्यांचे धडे दिले. त्या काळात कवी कुंजबिहारी यांचा ‘नूतन महाराष्ट्र मेळा’ आणि दिगंबर आवटे व तम्मा हुमनाबादकर यांचा ‘बालवीर मेळा’ प्रचंड गाजला.

श्रद्धानंद समाजाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. कै. सिद्रामप्पा फुलारी नगराध्यक्ष, तर कै. विश्वनाथप्पा बनशेट्टी सोलापूरचे महापौर झाले. कै. चंद्रशेखर म्हमाणे यांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि नंतर ते नगरसेवक व महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष झाले. ज्येष्ठ नेते मा. श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्रीपद भूषवले. आजोबा गणपती मंडळाचा लेझीमचा ताफा प्रचंड लोकप्रिय होता. श्रद्धानंद तालमीच्या पैलवानांचा लेझीमचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यांतून लोक मिरवणुकीसाठी येत असत.
- ट्रस्टची स्थापना
१९८५ साली श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टची स्थापना झाली. कै. अॅड. गौरीशंकर फुलारी हे ट्रस्टचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांच्याच कार्यकाळात १९९४ साली मानाच्या आजोबा गणपतीचे भव्य मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर कै. चिदानंद वनारोटे यांनी अध्यक्षपद भूषवले. सध्या (या वर्षाचे) ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून सोलापूरचे माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष श्री. शिवानंद मेंडके, सचिव श्री. अनिल सावंत, खजिनदार श्री. चंद्रकांत कळमणकर, सहसचिव श्री. कमलाकर करमाळकर आणि समस्त कार्यकारिणी सदस्य मंडळाचे कार्य करत आहेत.