राष्ट्रपुरुषः छत्रपतिः श्रीशिवाजिमहाराजः'
संस्कृतभारतीचे पिंपरी-चिंचवडचे जनपदाध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी 'राष्ट्रपुरुषः छत्रपतिः श्रीशिवाजिमहाराजः' हे सरळ व सोप्या संस्कृत भाषेत लिहिलेले शिवचरित्र आहे. संस्कृत भारती या अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
छत्रपती श्रीशिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत, असे संस्कार माझ्यावर बालपणापासूनच झाले होते. आंतरजाल माध्यमांतून मला महाराजांविषयी संस्कृतभाषेत लिहिलेली १२ पुस्तके सापडली. मराठीतील पुस्तके अर्थात होतीच. यातूनच अडीच वर्षात हा ग्रंथ सज्ज झाला. संस्कृत भारतीच्या अनेकांनी तो ग्रंथ वाचून बहुमूल्य सूचना दिल्या. संस्कृतभाषेचे जे ज्ञान अमूल्य आहे ते मला विनामूल्य देणाऱ्या संस्थेच्या शिक्षकांचा मी सदैव ऋणी राहीन.
संस्कृत भारती ही संस्था कुणाही इच्छुकाला व्यवहारातील सरळ आणि सोपे संस्कृत बोलता येईल व लिहिता येईल हे विनामूल्य शिकवत असते. त्यामुळे संस्कृत भाषेचे जुजबी ज्ञान असलेल्या व्यक्तीलाही कळेल अशा सरळ सोप्या व संस्कृत भाषेत -संधी व समास सोडवूनच - हा ग्रंथ लिहिला आहे.
या हा ग्रंथ २३२ पानी असून त्यामध्ये १८ अध्याय, ३० रेखाचित्रे, मुद्दाम संस्कृत भाषेत बनवून घेतलेले ३ नकाशे, उपसंहार आणि संदर्भ ग्रंथांची सूची मिळून एकूण २० अध्याय, व एकूण १११ तळटीपा आहेत. संस्कृत भारतीचे अखिल भारतीय श्रीभगवद्गीता शिक्षण प्रमुख शिरीष बेडसगावकर यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. पिंपरी चिंचवड जनपदाचे (म्हणजे जिल्ह्याचे) संस्कृत भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संस्कृत भारतीच्या आठ षण्मासिक (सेमिस्टर) परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर या पुस्तकाचे लिखाण चालू केले.
या ग्रंथात आलेल्या व्यक्तींची आणि स्थळांची कवींद्र परमानंद यांनी योजलेली मूळ संस्कृत भाषेत लिहिलेली नावे व सध्याच्या प्रचलित भाषेत असलेली नावे पुस्तकाच्या प्रारंभीच दिलेली आहेत. कवींद्र परमानंद यांनी संस्कृत भाषेत महाराजांचा जो काव्यात इतिहास लिहिला, त्याच्या सत्यतेविषयी बहुतेक इतिहासकार समाधानी आहेत. तसेच जयराम पिंड्ये यांनी लिहिलेल्या पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या ग्रंथाचे आहे. डॉ. श्री . भा. वर्णेकर यांचे शिवराज्योदयम् हे महाकाव्य, अंबिका दत्त व्यास यांनी लिहिलेले शिवराजविजय हे नाटक अशा एकूण बारा ग्रंथांचे संदर्भ तळटीपांमध्ये दिलेले आहेत. सुहासिनीदेवी शहाजीराव राजेभोसले या महिलेने लिहिलेल्या ग्रंथाचाही लेखकाने उल्लेख केलेला आहे.
पूर्वपीठिका या पहिल्या प्रकरणात इस्लामचे भारतावरील आक्रमण, त्यांचे कौर्य, आणि अन्याय्य राजवट, तसेच अंधारमय शिवपूर्वकाल यांचे केलेले वर्णन अंगावर काटे आणते. क्रूरकर्मा अफजलखानः हतः हा अध्याय खूपच उत्कंठावर्धक लिहिला आहे. उंबरखिंडीत पराभूत झालेल्या कारतलबखानाच्या वकिलाला महाराज कसे दिसले? याचे कवींद्र परमानंदांनी केलेले वर्णन बहारदार आहे. गरुडावर वसलेल्या विष्णूप्रमाणे दिसले (तार्क्षे हरिमिव स्थितम् ।) ही परमानंदांनी दिलेली उपमा खरोखर चित्ताकर्षक आहे. पंडित गागाभट्टांनी लिहिलेल्या 'शिवप्रशस्ती'त शहाजी महाराजांचे वर्णन ते क्षात्रधर्माचे नवीन अवतार होते ("सः क्षात्रधर्मस्य नवावतारः ।") किंवा मातोश्री जिजाबाईंचे गागाभट्टांनीच केलेले वर्णन - जगाला जीवन देणारी (जगजीवनदानहेतुः) आणि सर्व शत्रूंचा नाश करणारी (सकलारिविनाशाय) या गोष्टी मूळ संस्कृतमध्ये किंवा मराठीत वाचणे दोन्हीही आनंददायक आहे. 'स्व'बोधस्य प्रणेता शिवाजिमहाराजः हा १८ वा अध्याय म्हणजे महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे सार आहे. 'स्व'त्वाच्या जागरणामुळे समाज स्वातंत्र्यासाठी कसा पेटून उठला हे लेखकाने मार्मिकपणे दाखवून दिले आहे.
(१)'स्व'धर्मरक्षा - छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले हे सगळ्यात मोठे कार्य आहे. पुणे हे शहाजी महाराजांच्या जहागिरीचे गाव होते. येथे बाल शिवाजी राजे व त्यांच्या मातोश्री म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊसाहेब या कारभार बघू लागल्या. बाल शिवाजी राजांनी पहिले काम कोणते केले असेल तर ते म्हणजे कसबा गणपतीची पुनर्स्थापना
युवराज संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथात शिवाजी महाराजांचा उल्लेख विष्णूचा अवतार असा केला असून कलियुगरूपी भयंकर विषारी सापाने धर्म संकटग्रस्त झाला असता विष्णूने अवतार घेतला असा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. रघुनाथपंत हनुमंते यांनी लिहिलेल्या राज्यव्यवहारकोशाच्या उपोद्घातात महाराजांनी तामिळनाडूत एक किंवा दोन मशिदी पाडून त्या जागी मंदिरे निर्माण केल्याचा उल्लेख केलेला आहे. या मशिदी मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदू मंदिरे पाडून बनविल्या होत्या असा उल्लेखही लेखकाने केला आहे. गोव्यातील नारवे गावातील सप्तकोटीश्वराचे मंदिर आधी आदिलशहाने व नंतर पोर्तुगीजांनी उध्वस्त केले होते. त्याचीही पुनर्स्थापना महाराजांनी केली. अशा सर्वांचे मूळ संस्कृत ग्रंथातील संदर्भ लेखकाने दिले आहेत.
महाराजांनी संत सतपुरुष, सिद्ध पुरुष व गुणी जनांचा नेहमीच सन्मान केला. यामध्ये जगतगुरु संत तुकाराम महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी, चिंचवडचे चिंतामणी देव इत्यादी प्रमुख होते. श्री समर्थ रामदास स्वामींचे कार्यकर्तृत्व शिवाजी महाराजांच्या काळातच घडले होते व त्या दोघांचे हृद्य संबंध होते. परस्परांच्या कार्याविषयी दोघांनाही आदर होता. मार्ग भिन्न असले तरी धर्माची स्थापना हे दोघांचेही समान ध्येय होते. आनंदवनभुवनी आणि निश्चयाचा महामेरू या समर्थ रामदास स्वामींच्या स्फुट काव्याचे राम वेळापुरे यांनी संस्कृत मध्ये केलेले भाषांतरही लेखकाने दिले आहे. ते वाचणे अत्यंत आनंददायी आहे. अन्यत्र "आमच्या अभ्युदयार्थ गोपाळभट्ट यांनी सूर्यानुष्ठान करावे" असे पत्रही महाराजांनी लिहिल्याचे नमूद केले आहे.
जे हिंदू छल बल कपट इत्यादींमुळे वाटून मुसलमान झाले होते अशांना महाराजांनी आग्रहाने परत हिंदू धर्मात प्रवेश करून दिला. बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. कवी भूषण यांनी तर शिवाजी महाराज झाले नसते तर सगळ्यांची सुंता झाली असती असे पद्य लिहिल्याचे - मूळ व्रज भाषेत आणि त्याचे डॉ. पळसुले यांनी केलेले भाषांतर - लेखकाने नमूद केले आहे. याचप्रमाणे स्वबोध या विषयात अंतर्भूत असलेले अन्य बिंदूही लेखकाने लिहिले आहेत - जसे 'स्व'जनांचे संघटन, 'स्व'युद्धनीती (गनिमी कावा), 'स्व'तःची नौसेना, 'स्व'राज्याकडून सुराज्याकडे, स्व'वजनांचे कल्याण, 'स्व'कृषीनीती, 'स्व'मातृभूमीचा अभिमान, ' स्व'अर्थनीती, 'स्व'अस्मिता संवर्धन, संस्कृत भाषेचा प्रोत्साहन देऊन स्वभाषेचे (मराठीचे) केलेले शुद्धीकरण हे विविध बिंदू होत. यात महाराजांनी संस्कृत भाषेला कसे प्रोत्साहन दिले हे विस्तृतपणे लिहिले आहे. मराठी भाषेत घुसलेल्या अरबी फारसी व उर्दू शब्दांच्या जागी नवीन संस्कृतनिष्ठ शब्द तयार करून राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करण्याची आज्ञा महाराजांनी रघुनाथपंत हनुमंते यांना दिल्याचे लेखकाने नमूद केले आहे.
उपसंहारात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची तुलना रामायणातील श्लोकांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामचंद्रांशी केलेली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाची कूटनीती महाराजांमध्ये एकवटली होती हेही लेखकाने सांगितले आहे. उपसंहार या प्रकरणात शिवपूर्वकालात हिंदूंच्या पराभवाची कारणे काय? याचीही चिकित्सा लेखकाने केली आहे. यात एकराष्ट्रीयत्वाचा अभाव, गुप्तचर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसणे, चुकीची युद्ध पद्धती, वर्णभेद जातीयता व अस्पृश्यता, इस्लाम धर्माच्या कार्यपद्धतीचा अभ्यास नसणे, कलियुगात आपल्या नशिबी असेच येणार आहे अशी जनमानसाची समजूत इत्यादी कारणे लेखकाने सांगितले आहे.याच प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती कशी होती? तिचे सिद्धांत काय होते? हेही लेखकाने सांगितले आहे. हे स्वराज्य हिंदूंचे (हिंदवीय) आहे याविषयी त्यांच्या मनात कोणती शंका नव्हती. त्याचप्रमाणे हे कार्य ईश्वरीय (श्रींचे म्हणजेच शंभू महादेवाचे) आहे अशी ही त्यांची ठाम श्रद्धा होती. हिंदू हेच सर्वधर्मसमभावी (सेक्युलर) असल्यामुळे त्यांनी उठ सूट मुस्लिम समाजाच्या कत्तली करणे, मुस्लिम स्त्रियांची अब्रू लुटणे असे निंद्य प्रकार कधीही केले नाहीत. या महामंगल आणि पुण्यभूमीसाठी आत्मबलिदान करण्यासाठी महाराज स्वतः सदैव सज्ज असत. त्यामुळेच बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, सूर्याजी काकडे, तानाजी मालुसरे, नागोजी जेधे, रामाजी पांगेरे यांसारखे वीर स्वराज्यसाठी बलिदानास नित्यसिद्ध झाले. या वीरांची संस्कृत भाषेत लिहिलेली वर्णने अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू आणल्याखेरीज राहत नाहीत. आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे रक्षण करून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते नित्य कटिबद्ध होते आणि हे व्रत त्यांनी जन्मभर पाळले. साक्षात तुळजाभवानी महाराजांच्या सहाय्याला आल्याचे वर्णन लेखकाने दोन ठिकाणी केले आहे. त्याकाळी उच्च नीचतेसारख्या खूप चुकीच्या प्रथा समाजात रूढ होत्या. त्याऐवजी 'हिन्दवः सोदराः सर्वे न हिंदुः पतितो भवेत् । मम दीक्षा हिन्दुरक्षा मम मन्त्रः समानता ।' हे तत्व महाराजांनी व्यवहारात आणले.
डॉ.गिरीश आफळे
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांविषयी स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते, याविषयी मलपृष्ठावर लिहिलेला एक प्रसंग अत्यंत वाचनीय ठरतो.