पदार्थ विज्ञानातील क्रांतिकारक संशोधन; डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील सूक्ष्मस्फटीकाचा शोध. पुण्यातील विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (IISER PUNE) शास्त्रज्ञांचे संशोधन....

इलेक्ट्रॉनिक उपकरणे असोत किंवा सोलर सेल त्यामध्ये सिलिकॉन डिटेक्टर नक्की वापरला जातो. सध्या जेवढी चर्चा सेमिकंडक्टर चिपची आहे, तेवढेच मत्त्व या फोटो डिटेक्टरला इलेक्ट्रॉनिक जगतात आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेलमध्ये सिलीकॉन फोटोडिटेक्टर्सचा वापर होतो. मात्र त्याला काही मर्यादा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची कार्यक्षमता, वेग आणि उत्पादकता वाढविण्यासाठी जगभरात पेरोस्काईट (सीझियम लीड ब्रोमाइड) या नव्या पदार्थावर संशोधन चालू आहे. मात्र, उच्च तापमानाला त्याची स्थिरता टिकत नसल्याने शास्त्रज्ञांना यश मिळत नव्हते. अखेरिस पुण्यातील शास्त्रज्ञांनी सीझियम लीड ब्रोमाइडचा मायक्रोक्रिस्टर बनविण्यात यश आले असून, तो सिलिकॉन डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. अतिकुर रेहमान यांच्या नेतृत्त्वात गोकुळ अनिलकुमार यांनी हे संशोधन केले. आयसर पुणेचे प्रा. पवन कुमार, आयसर मोहालीचे डॉ. गौतम शीट आणि अमेरिकेतील ब्रुकहेवन नेशनल लेबोरेटरीचे डॉ. सूयोन ह्वांग यांचाही शोधात मोठा वाटा आहे. सीझियम लीड ब्रोमाइडचा सूक्ष्म स्फटीक बनविण्यासाठी शास्त्रज्ञांच्या या गटाने नवीन पद्धत विकसित केली आहे. त्यांचे हे संशोधन नुकतेच एडव्हान्स मटेरिअल्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.
काय आहे सीझियम लीड ब्रोमाईड ः
- हे एक प्रकारचे पेरोस्काईट मटेरिअल आहे
- प्रकाशाच्या बाबतीत अतीसंवेदनशील असलेल्या या पदार्थात उत्कृष्ट ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स गुण असतात
- मात्र, आजवर उच्च तापमानाला स्थिर राहत फेरोइलेक्ट्रिक गुण आणि अल्ट्रा डार्क करंट मिळत नव्हते. नव्या संशोधनातून त्यावर मात करण्यात आली आहे.
संशोधनाचे वैशिष्ट्ये काय ?
- सॉल्वोथर्मल संश्लेषण पद्धतीचा वापर करत सीझियम लीड ब्रोमाईडची निर्मिती
- वातावरणीय तापमानालाही याची निर्मिती करणे शक्य
फायदा काय ?
- प्रथमच उच्च तापमानाला आवश्यक गुण दर्शवणाऱ्या पेरोस्काईट निर्मितीच्या प्रक्रियेचा शोध
- फेरोइलेक्ट्रीक प्रॉपर्टीज दर्शविणारे हे मायक्रोक्रिस्टल्स इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची क्षमता वाढविणार
- नव्या पिढीतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेल बनविण्यासाठी उपयुक्त
- कमी खर्चात जास्त कार्यक्षम डिटेक्टर्सची निर्मिती शक्य
----

“उच्च-गुणवत्तेच्या सीझियम लीड ब्रोमाईड मायक्रोक्रिस्टल्स वाढवण्याची क्षमता ही या संशोधनाची प्रमूख उपलब्धी आहे. पदार्थ विज्ञानामध्ये हा एक मैलाचा दगड असून, नवीन पिढीतील ऑप्टोइलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामळे अधिक कार्यक्षम एलईडी आणि प्रकाशासाठी अतिसंवेदनशील सेन्सर विकसित होतील.
- डॉ. अतिकुर रहमान, शास्त्रज्ञ, आयसर पुणे