•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

भारतीय पत्रकारितेचा प्रणेता : देव नारद

मनोहर कुलकर्णी 30 days ago
व्यक्तिविशेष  

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा जगात सर्वश्रेत्र मानली जाते. भारतीय मानसिकतेचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या विजाराचा केंद्रबिंदू हा आध्यात्मिकता आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की आध्यात्मिकता हा भारताचा आत्मा आहे (Spirituality is the soul of India). आणि या आत्मसूत्राला केंद्रित धरूनच भारतीय प्राचीन साहित्याची निर्मिती झाली आहे. वेद-पुराण, रामायण-महाभारत अशा प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान आणि धार्मिक ग्रंथातून आपल्या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्यांचा उल्लेख ठायी ठायी आला आहे. या जीवनमूल्यांचा अवलंब करणाऱ्या आदर्श अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख त्यात आवर्जून येतो. त्यातीलच एक श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे आद्य पत्रकार देवर्षी नारद होत.

देवर्षी नारद म्हटले की त्रैलोक्यात अखंड संचार करणारा, माहितीची देवाण घेवाण करणारा, सर्व घडामोडींची इत्थंभूत माहिती ठेवणारा, प्रसंगी कळ लावणारा म्हणजे आजच्या सांप्रत युगातील पत्रकार म्हणूनच प्रतिमा डोळ्यापुढे येते. प्राचीन देवासुरांच्या साम्राज्य‌कालात प्रणयकलहापासून युद्धापर्यंतच्या अनेक घटनांचे नारद हे साक्षी आहेत. त्यांनी योजनापूर्वक संघर्ष निर्माण करून जगत्कल्याणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे, तर प्रसंगी जगाचा विनाश करणाऱ्या शक्तिशाली अस्त्रांचा उपयोग करण्याचा मोहापासून अनेक योद्ध्यांना रोखले आहे. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य उद्देश एका वाक्यात सूत्रबद्ध करावयाचा झाल्यास 'परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम्' असे म्हणता येईल. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश या उद्देशानेच त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमाचा प्रभावी वापर केला.


नारदांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. संवाद कलेतील पारंगतता  हा एक पैलू झाला. पण त्याहीपेक्षा इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नीतीशास्त्र, धर्मशास्त्र यांचे ते ज्ञाते आहेत. ते वेदशास्त्रसंपन्न आहेत. तत्त्ववेत्ते आणि भविष्यवेत्ते आहेत. संगीताचाही त्यांचा व्यासंग दांडगा असून वीणा या वाद्य प्रकाराचे ते प्रवर्तक मानले जातात. ते आद्य कीर्तनकार आहेत. ईश्वरभक्तीच्या माध्यमातून व्यक्ती, समाज व राष्ट्रनिर्मितीचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्यातून त्यांचे द्रष्टेपण प्रखरतेने नजरेस येते. जागतिक पत्रकारितेचा इतिहास पाश्चात्य दृष्टिकोनातून प्रामुख्याने मांडला जातो. गुटेनबर्गने मुद्रणकला व छापखान्याचा शोध लावला तेथून मुद्रित माध्यमाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. पण भारतीय संस्कृती व प्राचीन साहित्याचा अभ्यास केला तर त्यात मौखिक व शाब्दिक संवादाची परंपरा फार पूर्वीपासून अस्तित्वात होती, असे दिसून येते. देवर्षी नारद हे सृष्टीकर्ता प्रजापती ब्रम्हाचे मानसपुत्र मानले जातात. त्यामुळे स्वाभाविकच तेव्हापासून त्रैलोक्य भ्रमणातून माहितीच्या अदान प्रदानाचे कार्य करणारे नारद हे संचार-संवाद कामाचे आद्य प्रवर्तक, प्रथम पुरुष ठरतात.

 

मानवी जीवनाच्या आजपर्यंतच्या प्रवासात दोन महत्वा मूळ आधार राहात आले आहेत. एक जिज्ञासा आणि दुसरे संवाद. जे अज्ञात आहे ते जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा मानवी मेंदूमध्ये प्रश्नांना जन्म देते. जेव्हा या प्रश्नांची उत्तरे मिळतात त्याला त्याला माहिती व ज्ञान म्हटले जाते. जिज्ञासेप्रमाणेच संवाद साधणे ही मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. एखादे रहस्य, माहिती किंवा ज्ञान मिळाल्यानंतर माणूस तो स्वतःजवळच ठेवत नाही. तो ते इतरांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. हा व्यक्तिगत संवाद पुढे चालून अनेकांशी संपर्क साधल्यावर जनसंवाद होतो. आणि हा जनसंवाद ज्या माध्यमांद्वारे केला जातो त्यासच आजच्या भाषेत पत्रकारिता म्हटले जाते. आणि नारदांनी आपल्या जीवनात सदोदित संचार करून संवाद साधला. हाच त्यांचा स्थायीभाव होता. नारदांच्या कार्याचा उल्लेख पुरातन काळापासून अनेक ठिकाणी आला आहे. बातमी हे शक्तिशाली अस्त्र असल्याचे ओळखणारे नारद हे आद्य पुरुष होत. ईश्वरभक्तीच्या माध्यमातून समाज व राष्ट्रहित जोपासण्याचे कार्य त्यांनी केले. संवाद कलेची एक श्रेष्ठ परंपरा नारदांनी निर्माण केली. आदर्श राजनितीज्ञ म्हटले की रामाचे मान घेतले जाते, सत्यवचनासाठी राजा हरिश्चंद्राचा उल्लेख केला जातो तसेच कूटनीती शास्त्राचा उल्लेख आला की चाणक्याचे नाव अपरिहार्यपणे घेतले जाते. तसेच जनसंवाद क्षेत्रात नारदांचे कार्य आहे व स्थान आहे. हे त्यांचे महत्व ध्यानात घेऊन भारतीय जनसंवाद क्षेत्रात नारदांचा आदर्श व आदरार्थी उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे.

 

भारतातील हिंदी भाषेतील पहिले नियतकालिक 'उदन्त मार्तंड' हे असून दि. 30 मे 1826 रोजी कलकत्ता येथून त्याचे प्रकाशन सुरू झाले. तो दिवस नारदजयंतीचा होता, त्यादिवशीच्या पहिल्या अंकाच्या प्रथम पृष्ठावर नारदांचे चित्र देऊन व त्यांना अभिवादन करून अंकाचा शुभारंभ संपादकांनी केला. तसाच एक एक उल्लेख आढळतो तो १९४८ साली दादासाहेब आपटे यांनी सुरु केलेल्या हिंदुस्थान समाचार या भारतीय वृत्तसंस्थेच्या शुभारंभ प्रसंगात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपालांनी आपटे यांना पत्र लिहून वृत्तसंस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या पत्रात त्यांनी पत्रकार नारद हे पत्रकारितेचे पितामह असून त्यांच्यापासूनच पत्रकारितेचा प्रारंभ झाला, असे नमूद केले होते. डॉ. सिद्धेश्वरशास्त्री  चित्राव यांनी भारतीय प्राचीन चरित्र कोशात नारदाचा वार्ताहर म्हणून उल्लेख केला आहे. ज्येष्ठ अभ्यासक पां. कृ. सावळापूरकर यांच्याही ग्रंथात नारदांबद्दल असाच उल्लेख आहे. त्यामुळे नारदांचा आद्य पत्रकार म्हणून गौरवाने दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. 'रोल मॉडेल' म्हणून त्यांचे नित्यनेमाने स्मरण करणे आवश्यक ठरते.

कुशल संवादपटू, भक्तिशास्त्राचा भाष्यकार, व्यासंगी तत्त्वचिंतक, मर्मज्ञ संगीतकार म्हणून नारदांची ओळख आहेच परंतु त्यांनी विपुल ग्रंथनिर्मितीही केली. नारद पुराण, नारद स्मृती, नारद पंचरात्र, नारद भक्तिसूत्र आणि नारद श्रुती हे त्यांचे पाच ग्रंथ विशेषत्वाने सर्वत्र चर्चिले जातात. त्यांनी स्वतः लेखन करण्याबरोबरच इतरांनाही देखनाची प्रेरणा दिली. वाल्मिकी, व्यास यांना रामायण - महाभारताची रचना करण्याची प्रेरणा नारदांनी दिली, असे सांगितले जाते. नारदांनी सातत्याने संचार करून सर्वांशी संपर्क ठेवला. ते एका जागी कधीच स्थिर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांचे इतर ऋषी-मुनींप्रमाणे मठ, आश्रम कधीच स्थापन झाले नाहीत. नारदांचा संवाद समाजनेतृत्वाशी होता, सर्वत्र त्यांचा आदर केला जात असे. ते कुठल्या जाती वर्ग, समुदाय संप्रदायांशी संबंधित राहिले अशी त्यांची प्रतिमा कधीच बनली नाही. नारदांच्या माहितीवर कुणी कधी प्रश्नचिन्ह लावले वा शंका घेतली असे घडले नाही. प्रचंड विश्वासार्हता हा त्यांच्या पत्रकारितेचा आत्माच म्हटला पाहिजे. अनेक प्रसंगात पार्वतीने शंकरापेक्षा नारदांवर विश्वास ठेवणे पसंत केले, हे यांच्या विश्वासार्हतेचे उत्तम प्रतीक म्हटले पाहिजे.

 

नारदांच्या चौरासी भक्ती सूत्र ग्रंथातील उद्‌बोधन हे भगवान आणि भक्त यांच्या आदर्श संबंधासंदर्भात आहे. पण त्याचा नीट अभ्यास केल्यास आजच्या माध्यमांची ती आचारसंहिता ठरू शकते. कुठल्याही विषयावर मतभिन्नता असणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्यात वावगे काही नाही. भक्ती- कार्यातही अनेक मतभेद आहेत, असतात. परंतु त्यात भक्ती हे स्थायी तत्त्व असून मार्गांबद्दल मतभिन्नता असू शकते. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही आहे. वेगवेगळी मते मांडणे गैर नाही पण शेवटी त्याचे स्थायी तत्त्व विश्वकल्याण, मानवकल्याण आहे हे विसरता कामा नये. तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदात असे नारदांनी म्हटले आहे ते याचसंदर्भात. नारदांच्या साहित्याचा अभ्यास यासंदर्भात नव्याने झाला पाहिजे, यासाठी त्यांचे स्मरण केले पाहिजे. आज नारद जयंती निमित त्यांना नम्र अभिवादन! ट


- मनोहर कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार


- मनोहर कुलकर्णी

  • narad
  • देवर्षी नारद
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

मनोहर कुलकर्णी

 साहित्य (1), इतिहास (3), सामाजिक (3), रा. स्व. संघ आणि परिवार (1), माध्यमे (2), संस्कृती (1), राजकारण (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.