कै. केशवराव नांदेडकर यांच्या जीवनातून समर्पित वृत्तीची प्रेरणा : दिलीप क्षीरसागर

पुणे, दि. २ सप्टेंबर (वृत्तसेवा):
समर्पित वृत्तीने सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा कै. केशवराव नांदेडकर यांच्या जीवनातून मिळते, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी काढले. रा. स्व. संघाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. मूळचे धुळे येथील व सध्या सिंहगड रस्ता परिसरात वास्तव्यास असलेले संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. नांदेडकर यांच्या स्मृतींना या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उजाळा दिला.
दिलीप क्षीरसागर पुढे म्हणाले की, संघटन व समाज परिवर्तन या दोन्ही क्षेत्रांत कै. नांदेडकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे पूर्णवेळ संघ प्रचारक म्हणून काम केल्यानंतर गृहस्थ जीवनात धुळे जिल्हा व देवगिरी प्रांतात त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांची संघटना बांधण्यात संस्थापक म्हणून त्यांचा मोठा वाटा होता, तर निवृत्तीनंतर त्यांनी मिझोरामसारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय विचारांचे काम उभे केले. धुळे परिसरातील विविध संस्थांमध्येही त्यांनी पदाधिकारी म्हणून योगदान दिले असून, अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आदर्श स्वयंसेवकांसमोर कायम राहील.
या वेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कै. नांदेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी डॉ. लीना मेहेंदळे यांनी नांदेडकर कुटुंबाशी असलेल्या तीन पिढ्यांच्या स्नेहाचा उल्लेख करत कौशलम् न्यासाला त्यांचे कायम सहकार्य लाभल्याचे सांगितले. 'नॅशनल मेडिको ऑर्गनायझेशन'चे (NMO) डॉ. शरद अगरखेडकर यांनी कै. केशवराव यांच्या राष्ट्रीय संघटन बांधणीतील व विशेषतः उत्तरांचल येथील कार्याचा गौरव केला. विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संघटनेचे काम पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे डॉ. अगरखेडकर यांनी नमूद केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया सहकारी परिवाराच्या वतीने विश्वास कुलकर्णी यांनी, निवृत्तीनंतर कै. केशवराव यांनी निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना संघटित करून विधायक कार्यासाठी प्रेरित केल्याची आठवण सांगितली. पुण्यातील धुळेकर बांधवांच्या वतीने विश्वास ओढेकर यांनी कै. नांदेडकर यांच्या संघकार्यासह क्रीडा व व्यायाम प्रेमाचे विविध पैलू उलगडले. नांदेडकर कुटुंबियांच्या वतीने त्यांचे पुत्र आशुतोष नांदेडकर यांनी वडिलांचे मार्गदर्शन व पाठबळ आपल्या पाठीशी कायम राहिले असल्याचे सांगत भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. कीर्ती कस्तुरे यांनी भजने सादर केली, तर शंकराचार्य रचित 'निर्वाणषट्कम्' पठणाने सभेचा समारोप झाला. या श्रद्धांजली सभेस सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे, विवेकानंद नगर संघचालक दिलीप कस्तुरे, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, डॉ. शरद कुंटे, कै. नांदेडकर यांची कन्या अनघा आठल्ये यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.