आत्मविश्वासाने जग जिंकणाऱ्या रेखाताई
जन्मानंतर अवघ्या काही वर्षांतच रेखाताई यांना पोलिओमुळे पाय गमवावे लागले..तिथूनच जगण्याच्या लढाईतील संघर्ष सुरु झाला.पण रेखा हारणाऱ्यांमधील नव्हत्या. त्यांनी जिद्दीने बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले. लग्नाआधी आई-वडीलांना हातभार लावण्यासाठी ब्युटी पार्लर चालविले. लग्नानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरी सुरु केली. मैत्रिणिंबरोबर त्यांनी चक्क व्हिलचेअर बास्केटबॉल आणि शुटींगमध्ये प्राविण्य प्राप्त केले असून, त्या आता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून नावाजल्या गेल्या आहेत.
रेखा पडवळयांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात झाला. बालपणी एकदा प्रचंड ताप आला आणि त्यातच रेखाताई यांचे दोन्ही पाय निकामी झाले. रोजच्या जगण्यासाठी त्यांना आता आधाराची गरज भासू लागली. पण शिक्षण घेण्याची जिद्द काहीकायम होती.. आपण सर्वगुणसंपन्न असायलाच पाहीजे असे नाही तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक आपल्यात हवी, अशी शिकवण त्यांच्या आईने त्यांना दिली. रेखा ताई यांना तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने पुढचे शिक्षण थांबवावे लागले. 2016 मध्येत्यांचे लग्न झाले आणि पुण्यातील कोथरूडमध्ये त्या राहायला आल्या. सासरच्या मंडळींनी त्यांना पाठींबा दिला.मात्र,आपल्याकडे पदवी असताना कुटुंबासाठी काही करायला हवे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी सासुबाईंच्या मदतीने अनेक ठिकाणी नोकरी शोधली. अखेरीस त्यांना विमाननगर मध्ये अॅमेझॉन कंपनीत नोकरी मिळाली.
दिव्यांग असतानाही रेखा यांनी नोकरी मिळविण्यापर्यंत केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. लहानपणापासून एक खेळाडू बनण्याचे स्वप्न त्यांना खुणावत होते. नेहमीच्या चौकटीबाहेर जात त्यांनी मैत्रिण किरणच्या मदतीने खेळायचे ठरवले. खेळू इच्छिणाऱ्या मैत्रिणींचा त्यांनी एक व्हॉट्सअप गृप केला. व्हिलचेअर बास्केटबॉलचा त्यांनी सराव सुरू केला. पण ही सुरूवात सहज शक्य नव्हती. खेळाला मैदान मिळविण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. अखेरिस मेघना मुनोत यांनी त्यांना आपल्या सोसायटीत खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. रेखा यांच्या स्वप्नांना आता चांगलेच बळ प्राप्त झाले होते. फेसबूकद्वारे त्यांनी मुंबईत राहणारे प्रशिक्षक कॅप्टन लुईस जॉर्ज यांची ओळख करून घेतली. त्यांना आपले कोच बनण्याची विनंती केली. कॅप्टन लुईस जार्ज, मेघना मुनोत आणी सुवर्णा लिमये यांच्याद्वारे प्रत्येकी शनिवार व रविवारी पी.वाय.सी हिंदू जिमखाना डेक्कन इथे त्यांनी सराव केला. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि दोन महिन्याच्या सरावाने व्हिलचेअर बास्केटबॉल टीमने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत सहभाग घेतला. काही ठिकाणी पदके प्राप्त केली.
बास्केटबॉलपर्यंतच रेखाताई यांचा प्रवास थांबला नाही. तर त्यापुढे जात त्यांनी दोन वर्षांपूर्वी रायफल शुटींग खेळाची तयारी सुरू केली. दहा मिटर रायफल शुटींगसाठी त्या राष्ट्रीय स्तरावर सहभागी झाल्या. आता दरवर्षी त्या बास्केटबॉल बरोबरच शुटींगमध्येही खेळतात. 1 डिसेंबर 2023 ला त्यांची खेलो इंडिया या राष्ट्रीय खेळासाठी निवड झाली आणि त्यांनी पदकही पटकावले.
खेळामुळे आत्मविश्वास वाढला...
दिव्यांगत्व आल्यावर रेखाताई काही काळ निराश होत्या. लोकांनी दयेच्या नजरेने पाहण्यापेक्षा आम्हाला बरोबरीची सन्मानाची वागणूक द्यावी, असे त्यांना वाटायचे. हळूहळू त्यांनी स्वतःतील आत्मविश्वास वाढविला. पोलिओमुळे निकामी झालेला पाय आता उपचारानंतर निदान उभे राहण्याचे तरी सामर्थ्य देत आहे. त्यांच्या इच्छाशक्तीमुळे दिवसेंदिवस आता परिस्थिती सुधारत आहे. कुणाच्या तरी आधाराने त्या आज उभ्या राहू शकतात. नोकरी, खेळाचा सराव आणि घरातील स्वयंपाक आज त्या स्वतःच्या हिमतीवर पार पाडत आहेत. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, असा विश्वास रेखा यांनी व्यक्त केला.
रेखा यांचे जीवनसूत्र
कोणत्याही सबबी सांगू नका.
प्रयत्न करत रहा.एकतर पराभूत व्हाल किंवा जिंकाल. पण प्रयत्नच केले नाही, हे शल्य राहणार नाही.
परभवातून नवे शिकायला मिळेल आणि जिंकल्यावर नवी उमेद मिळेल
मरणाच्या भितीने रडत राहण्यापेक्षा काही तरी करत रहावे
आपल्यामध्ये काहीच कमी नाही. आत्मविश्वासाच्या जोरावर जग जिंकता येते.
सम्राट कदम