मढीचे मंदिर, येसूबाईंचा नवस आणि भटक्यांची पंढरी
मढीची कानिफनाथ महाराजांची यात्रा ही केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर शतकानुशतके जपली गेलेली परंपरा, नाथ संप्रदायाच्या सिद्धयोगाचा वारसा आणि ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. होळीपासून मढीच्या यात्रेला सुरुवात होते आणि गुढीपाडव्याला सांगता होते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील हजारो भाविक, नाथपंथीय साधक आणि पर्यटक इथे हजेरी लावतात. यंदा १३ ते ३० मार्चपर्यंत ही यात्रा चालणार आहे. पाहूया या यात्रेचे महत्व, मान्यता आणि वैशिष्ट्य...
कानिफनाथ यात्रा दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी (रंगपंचमी) ते चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढी पाडवा) पर्यंत भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी मढी येथे संजीवनी समाधी घेतली, अशी आख्यायिका आहे.
- कोण होते संत कानिफनाथ?
कानिफनाथ हे एक हिंदू संत आहेत. त्यांना वेग-वेगळ्या नावांनी ओळखले जाते, त्यातील कान्होबा हे एक. ते नवनाथ संप्रदायाच्या नऊ महायोगींपैकी एक आहेत. कानिफनाथ हे कल्पित कवी कान्हापाद या नावाची महाराष्ट्रीय आवृत्ती आहे, असे काही इतिहासकार मानतात. नव नारायणातील एकामध्ये प्रबुद्ध नारायणांचे अवतार म्हणून कानिफनाथ मानले जातात. ह्या प्रबुद्ध नारायणाने हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले, अशीही एक आख्यायिका आहे. ‘भागवत पुराणात’ त्यांना ऋषभदेव असे संबोधिले आहे.
नाथ पंथाचे कार्य करत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि नगर जिल्हातील मढी या गावी राहिले. ज्या टेकडीवर कानिफनाथांनी समाधी घेतली, तेथील मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे आहे.
- मढीतील मंदिर ः ऐतिहासिक महत्व
या मंदिराचे बांधकाम मराठा राणी येसूबाईंनी केले असे म्हटले जाते. येसूबाई आणि बाळराजे शाहु महाराज (पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते, तेव्हा येसूबाईंनी कानिफनाथास नवस केला होता. “भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि पाच दिवसांच्या आत येसुबाई आणि युवराज शाहुराजे यांची सुखरूप सुटका झाली. तेव्हा हा नवस फेडण्यासाठी येसूबाई यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्याठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले,” असे म्हटले जाते.
समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदीत तेवणारा नंदादीप मराठे सरदार कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे, असे इ.स. १७४३ मध्ये दिलेल्या सनदित उल्लेख आहे.
‘श्री चैतन्य’ कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची समाधी आहे. सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत, असे सांगितले जाते. समोरच एक होमकुंड आहे, आणि नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला विष्णूचे मंदिर आहे. समाधी मंदिराच्या दक्षिणेला मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे, आणि तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथांच्या मंदिराचे दर्शन होते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल-रखूमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे, जेथे जाण्याकरीता एक भुयार आहे जो मध्यकालीन स्थापत्यशात्राचा एक आदर्श नमूना आहे.
- मढीची यात्रा
तीन टप्यात पार पडत असलेल्या मढी यात्रेत रंगपंचमी हा नाथयात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. पण त्या पूर्वी महिना भर त्याची तयारी होत असते. पारंपरिक पद्धतीनुसार महिनाभरपूर्वी देवाला तेल लावले जाते आणि हा कालावधी ग्रामस्थांच्या दृष्टीकोनातून दुखावट्याचा असतो. या कालावधीमध्ये ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाहीत, पलंग, गादी, इ. वापरत नाहीत. एकूणच ग्रामस्थ या काळात दुःखवटा पाळतात.
रंगपंचमीच्या दिवशी श्रीकानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारों भक्तांची अलोट गर्दी होते. नाथसिद्धांचे आखाडे तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या मानाच्या काठ्या आणि पालख्या मोठ्या उत्साहात मढीत दाखल होतात. मानाच्या काठ्या वाजत-गाजत मंदिराच्या कळसाला लावल्या जातात, तर भाविक भक्तांकडून मंदिरावर रेवड्यांची उधळण केली जाते.
नाथांच्या समाधीला गलफ (वस्त्र), पुष्पहार, दवना, सुगंधी अत्तर, रेवडी आणि मलिद्याचा (चपाती, गूळ, तूप व बडिशेप मिसळलेला) प्रसाद अर्पण केला जातो. संपूर्ण मंदिर परिसर नाथांच्या जयघोषाने आणि डफ, ढोल-ताशांच्या निनादाने दुमदुमून जातो. तसेच, येथील गाढवांचा बाजारही विशेष आकर्षण असतो. याच दरम्यान फुलोरबाग यात्रा पार पडते. पैठण येथून भक्त कावडीने गंगेचे पाणी आणून नाथांच्या संजीवन समाधीला अभिषेक करतात. गुढीपाडव्याच्या पहाटे समाधीची महापूजा व अभिषेक करून चंदनाचा लेप (मळी) लावला जातो. सूर्योदयापूर्वी समाधीवर वस्त्र, फुले, अत्तर अर्पण करून भक्तिमय वातावरणात महाआरती केली जाते.